Wed, Aug 21, 2019 15:32होमपेज › Kolhapur › दुसर्‍या दिवशीही दूध संकलन ठप्‍प; गोकुळला छावणीचे रूप

दुसर्‍या दिवशीही दूध संकलन ठप्‍प; गोकुळला छावणीचे रूप

Published On: Jul 18 2018 1:53AM | Last Updated: Jul 18 2018 12:06AM
कोल्हापूर : प्रतिनिधी

गायीच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान द्यावे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या आंदोलनामुळे जिल्ह्यात दुसर्‍या दिवशी मंगळवारी दूध संकलन ठप्प राहिले. वारणा दूध संघाच्या सहा टँकरवर सोमवारी मध्यरात्री तुफान दगडफेक करण्यात आली. उदगाव येथील गोकुळ सॅटेलाईट डेअरीला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते.  कोदवडे मार्गावर टेम्पो अडवून दुधाचे कॅन रस्त्यावर ओतले. शिरढोण येथील ग्रामपंचायत कार्यालय चौकात संकलन केलेल्या दुधाने आंघोळ करून कार्यकर्त्यांनी शासनाचा निषेध नोंदवला. 

जयसिंगपूर : प्रतिनिधी

दूध बंद आंदोलनाच्या दुसर्‍या दिवशी मंगळवारी शिरोळ तालुक्यात तणावपूर्ण वातावरण राहिले. गोकुळच्या उदगाव येथील सॅटेलाईट डेअरीला पोलिस छावणीचे स्वरूप आले. पोलिस, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व गोकुळचे कर्मचारी समोरासमोर भिडल्याने तणाव निर्माण झाला. पोलिस बंदोबस्तात  दूधाचे टँकर व लहान गाड्या डेअरीत आणण्यात आल्या. 

दरम्यान, सोमवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास पोलिस बंदोबस्तात जाणार्‍या वारणेच्या सहा दूध टँकरवर उदगाव येथे कार्यकर्त्यांनी दगडफेक करून काचा फोडल्या. मात्र टँकर न थांबता भरधाव वेगाने निघून गेले. एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. वारणा व गोकुळ दूध संघ दुधाचे संकलन करणार, असे वृत्त आल्याने मोठ्या संख्येने स्वाभिमानीचे कार्यकर्ते एकत्रित आले होते. 

‘दूध दर घेणारच, नाही कुणाच्या बापाचे दूध दर आमच्या हक्काचे’, ‘स्वाभिमानीचा विजय असो, राजू शेट्टींचा विजय असो’, ‘एकच गट्टी-राजू शेट्टी’ अशा घोषणा कार्यकर्त्यांनी गोकुळ डेअरीच्या समोर दिल्या. त्यामुळे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. त्यात शिरोळकडून गाड्या येणार अशी माहिती मिळताच 50 वर कार्यकर्ते शिरोळ, जयसिंगपूर व उदगाव बायपास रस्त्यावर केपीटीसमोर एकत्रित आले. त्यामुळे शिरोळ पोलिसांनी बंदोबस्त वाढविला. कार्यकर्त्यांनी घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. परिणामी, जयसिंगपूरचे पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी उदगाव येथील मुख्य चौकात पोलिस बंदोबस्त वाढविला. त्यामुळे चौकालाही पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. दरम्यान तालुक्यात दुसर्‍या दिवशीही आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कोणत्याही गावात दूध संकलन झाले नाही. जयसिंगपूरात सकाळी वारणा दूध केंद्रावर आलेली गाडी रोखण्यात आली. दूधाच्या पिशव्या उतरण्यास विरोध करण्यात आला.  स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी गोकुळच्या सॅटेलाईट डेअरीत जावून दूध संकलन व अन्य अधिकार्‍यांना धारेवर धरले. दूध संकलन न करण्याचा इशारा दिला. गाड्या आत सोडणार नाही तसेच बाहेर आलेल्या गाड्या फोडण्याचाही इशारा देण्यात आला. त्यामुळे जयसिंगपूर व शिरोळ पोलिसांची धावपळ उडाली. 

मात्र पोलिस बंदोबस्तात टँकर आणण्यात आले. चिलींग प्लँटमधून दुधाची निर्यात करण्यात आली. तालुक्यात दूध संकलन बंद असले तरी शहरातील महामार्गावरुन काही दूधाचे टँकर पोलिस बंदोबस्तात जात होते. पुढे मागे पोलिसांच्या गाड्या व मध्ये दूधाचे टँकर असे चित्र होते. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने थेट अनुदानासाठी सोमवारपासून दूध बंद आंदोलनाला प्रारंभ केला आहे. पहिल्या दिवशी दूध संघांनीच दूध संकलन केले नव्हते. मात्र  गोकुळ व वारणेने दूध संकलन करण्याचा निर्धार केल्याने प्रशासन आणि संघटना यांच्याकडून जोरदार तयारी करण्यात आली होती. मंगळवारी सकाळी विविध दूध संघाच्या गावागावातील दूध संस्थानी दूध संकलनाची तयारी केली. याला स्वाभिमानीच्या कार्यकत्यांनी तीव्र विरोध केला. सांगली, मिरज परिसरातील दूधाच्या लहान गाड्या व एक-दोन टँकर पोलिस बंदोबस्तात आणण्यात आले.

सावकर मादनाईक, संदीप पुजारी, शिलकुमार चौगुले, पंचायत समिती सदस्य मन्सुर मुल्लाणी, विजय कोळी, बंडेश साखळे, गुंडू कोरे, विठ्ठल मोरे, सागर चिपरगे, शैलेश आडके, गोमटेश काडगे यांच्यासह 50 वर कार्यकर्ते सॅटेलाईल डेअरीसमोर एकत्रित आले. घोषणाबाजी केली. पोलिसांनी जमावबंदी आदेश असल्याचे सांगून त्यांना पिटाळण्याचा प्रयत्न केला. मात्र कार्यकर्ते ठाम राहिले. त्यामुळे शिरोळ बायपास ते केपीटीपर्यंतच्या मार्गावर पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला.  

प्रचंड घोषणाबाजीने तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. पंचायत समिती सदस्य मन्सुर मुल्लाणी यांना पोलिसांनी ताब्यात घेवून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली. काही ठिकाणी तालुक्यात स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. 

शिरढोण येथे विश्‍वास बालिघाटे, दादू चौगुले, बाहुबली माणगावे, बाबासाहेब माणगावे, आबू चौगुले यांनी सकाळी शासनाचा निषेध नोंदवत दूधाची आंघोळ करण्यात आली. यावेळी कल्लाप्पा शिवमूर्ती, ओंकार बरगाले, शिवराज सलगे, यशवंत चंदूरे उपस्थित होते. 

आंदोलन भडकण्याची शक्यता?

सोमवारी मध्यरात्री वारणेच्या टँकरवर उदगाव येथे दगडफेक करण्यात आली. परिणामी, उदगावच्या मुख्य चौकाला पोलिस छावणीचे स्वरूप आले. मात्र पोलिस बंदोबस्तात येणारे टँकर व गाड्यामुळे स्वाभिमानीचे कार्यकर्ते संतप्त झाले. गोकुळची सॅटेलाईट डेअरी आणि बायपास मार्गावरील केपीटी चौकावर कार्यकर्त्यांनी आंदोलनाचे केंद्र केले. सकाळपासून दुपारी बारापर्यंत तणाव होता. त्यानंतर जयसिंगपुरातील खा.शेट्टी यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर जमलेल्या कार्यकर्त्यासमोर सावकर मादनाईक यांनी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला. निरोप येताच तात्काळ धावत या, अशी सूचना त्यांनी केली. त्यामुळे शांततेत सुरू असलेले आंदोलन भडकण्याची शक्यता नाकारता येत नाही.