Wed, Jul 24, 2019 07:58होमपेज › Kolhapur › सदस्यांना हवा पदाधिकारी बदल, मात्र नेत्यांना नको !

सदस्यांना हवा पदाधिकारी बदल, मात्र नेत्यांना नको !

Published On: Aug 25 2018 1:15AM | Last Updated: Aug 24 2018 10:54PMकोल्हापूर : विकास कांबळे

जिल्हा परिषदेतील सध्याचे पदाधिकारी बदलण्याच्या मानसिकतेत जनसुराज्य शक्ती व शिवसेनेचे नेते दिसत नाहीत. त्यामुळे पदाधिकारी बदल अध्यक्षांचा कार्यकाल संपेपर्यंत होणे अशक्य असल्याचे लक्षात आल्यानंतर पदाधिकारी बदलासाठी प्रयत्न करणार्‍यांनी आता आपली धडपड थांबविल्याचे समजते. पालकमंत्र्यांनी पदाधिकारी बदलाचे निर्णय दोन्ही पक्षांच्या नेत्यांवर सोपविले असल्याचे स्पष्टपणे जाहीर केले असतानाही, दोन्ही पक्षांचे नेते यासंदर्भात अद्याप बैठक झाली नसल्याचे कारण सांगत पदाधिकारी बदलाच्या विषयाला बगल देत आहेत.

जिल्हा परिषदेत भाजपने शिवसेना, जनसुराज्य शक्ती व स्थानिक आघाड्यांना एकत्र घेऊन आपली प्रथमच सत्ता स्थापन केली. केवळ काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेपासून रोखण्यासाठी आणि जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकावण्यासाठी भाजपने आघाडी करताना केवळ अध्यक्षपद आपल्याकडे घेतले. अन्य सर्व पदे घटक पक्षांना दिली. पदाधिकारी निवडत असताना अध्यक्षपदासाठी अरुण इंगवलेदेखील इच्छुक होते. हातकणंगले तालुक्यातील ते राष्ट्रवादीचे नेते होते, त्यांना सत्ता आली तर अध्यक्ष करण्याचा शब्द दिला होता. त्यामुळे अध्यक्ष निवडीवेळी भाजपच्या नेत्यांची अडचण झाली होती. त्यातून मार्ग काढण्यासाठी पदाची खांडोळी करण्याचा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षपदासह सर्व पदांचा कार्यकाल सव्वा वर्षाचा निश्‍चित करण्यात आला. तसेच जनसुराज्य शक्ती व शिवसेना यांना प्रत्येकी दोन पदे आणि ताराराणी आघाडी व स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्यात एक समिती असे पदांचे वाटप करण्यात आले.

सव्वा वर्ष झाल्यानंतर पदाधिकारी बदलाची चर्चा सुरू झाली. राजीनामा देण्याची वेळ आली तेव्हा प्रत्येक पदाधिकार्‍यांनी एकमेकांकडे बोट दाखविण्यास सुरुवात केली. पदाधिकारी बदलाची सुरुवात म्हणून महिला व बालकल्याण समिती सभापतींचा राजीनामा घेण्यात आला आणि ठरल्याप्रमाणे त्या ठिकाणी नवीन सदस्याची निवड झाली. ही निवड करत असताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अध्यक्ष न बदलण्याचा निर्णय घेतला आहे. अन्य पदाधिकार्‍यांबाबत संबंधित पक्षांच्या नेत्यांनी निर्णय घ्यावा, असे सांगून अध्यक्ष बदलाच्या चर्चेवर पडदा टाकला. मात्र, त्यानंतर सदस्यांनी पदाधिकारी बदलाचा आग्रह धरल्याने सर्व नेत्यांची बैठक घेण्याचे आश्‍वासन दिले. त्याच्या आतापर्यंत दोन, तीन तारखा झाल्या; मात्र बैठक होऊ शकली नाही. जिल्हा परिषदेत सध्या जनसुराज्य शक्ती पक्षाकडे दोन आणि शिवसेनेकडे उपाध्यक्षपदासह एक समिती आहे. या चार समितीचे पदाधिकारी  बदलण्याच्या मानसिकतेत आता या दोन्ही पक्षाचे नेते नसल्याचे समजते. त्यामुळे  किमान अध्यक्षांचा कार्यकाल संपेपर्यंत बदलाची केवळ चर्चाच होत राहण्याची शक्यता आहे.