Thu, Jun 20, 2019 06:46होमपेज › Kolhapur › राज्यात ऑक्टोबरमध्ये ‘मेगा’भरती

राज्यात ऑक्टोबरमध्ये ‘मेगा’भरती

Published On: Jul 03 2018 1:51AM | Last Updated: Jul 03 2018 1:19AMकोल्हापूर : अनिल देशमुख

राज्यात शासकीय विभागातील रिक्त जागांच्या भरतीचा धडक कार्यक्रम राबविला जाणार आहे. शासकीय विभागातील गट ‘ब’, ‘क’ आणि ‘ड’ संवर्गातील भरतीसाठी जिल्हा निवड मंडळाची स्थापना केली आहे. या मंडळाद्वारे भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यावर्षी ऑक्टोबर महिन्यात शासकीय ‘मेगा’ भरती होणार आहे. याकरिता सर्व विभागांनी आपल्याकडील रिक्त जागा आणि त्यानुसार भरण्यात येणार्‍या जागा याबाबतची माहिती 10 जुलैपर्यंत जिल्हाधिकार्‍यांना देण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी दिले आहेत.

राज्यसेवेच्या धर्तीवर शासकीय विभागातील रिक्त जागांची भरती जिल्हा निवड सेवा मंडळाद्वारे करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली निवड मंडळाची रचना निश्‍चित केली आहे. या मंडळाकडून दरवर्षी भरतीचा कार्यक्रम राबविला जाणार असून, त्याचा कालावधीही राज्य शासनाने निश्‍चित केला आहे. त्यानुसार दरवर्षी 15 जूनपर्यंत सर्व विभागांना आपल्या विभागातील रिक्त जागा आणि शासनाच्या नियमानुसार त्या तुलनेत भरण्यात येणार्‍या जागा याची माहिती निवड मंडळाला कळवणे बंधनकारक आहे. मात्र, याबाबतचा आदेश 13 जून रोजी काढण्यात आला, तो सर्व विभागापर्यंत वेळेत पोहोचला नसल्याने यावर्षी नव्या रचनेतून भरती प्रक्रिया राबविली जाणार की नाही, याबाबत स्पष्टता नव्हती.

राज्य शासनाने मात्र यावर्षी शासकीय भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. विविध शासकीय विभागातील भरतीवर असलेले निर्बंध उठवण्यात आल्याचे स्पष्ट करत यावर्षी जिल्हा निवड मंडळाकडून भरती प्रकिया राबविण्यात येणार आहे. त्यानुसार जिल्हा निवड मंडळाला दि. 10 जुलैपर्यंत रिक्त जागांची माहिती देण्याचे आदेश सर्व विभागांना दिले आहेत. याकरिता महापरीक्षा कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षाकडे ही सर्व माहिती 17 जुलैपर्यंत एकत्रित केली जाणार आहे. यानंतर दि. 31 जुलै रोजी या सर्व विभागातील भरती केल्या जाणार्‍या जागांची जाहिरात जिल्हा निवड मंडळाद्वारे प्रसिद्ध केली जाणार आहे.

सर्व जागांसाठी एकाच वेळी परीक्षा

जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर जिल्हा निवड मंडळाला दिलेल्या कालबद्ध कार्यक्रमानुसार पुढील प्रक्रिया होणार आहे. ऑक्टोबर महिन्यात या पदांसाठी लेखी परीक्षा होणार आहे. सर्वच जागांसाठी एकाच वेळी परीक्षा घेतली जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या रिक्त जागांसाठीही याच दिवशी परीक्षा घेतली जाणार असून, त्यानुसार नियोजन करण्याचे आदेश ग्रामविकास विभागाला दिले आहेत.