Sat, Jul 20, 2019 23:20होमपेज › Kolhapur › अंकामागे दीड रुपया कमिशन द्या

अंकामागे दीड रुपया कमिशन द्या

Published On: Jul 02 2018 1:51AM | Last Updated: Jul 02 2018 1:23AMकोल्हापूर : प्रतिनिधी

वृत्तपत्राची किमान आधारभूत किंंमत 5 रुपये ठरविण्यात यावी, शहरी व ग्रामीण असा भेदभाव न करता वृत्तपत्र विक्रेत्यास 30 टक्के याप्रमाणे दीड रुपया कमिशन मिळावे, अशी मागणी रविवारी वृत्तपत्र विक्रेता व एजंट कृती समितीच्या वतीने मेळाव्यात करण्यात आली. यावेळी याबाबतचा ठरावही संमत करण्यात आला.राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये वृत्तपत्र विक्रेता, एजंट यांच्यासाठी कल्याणकारी मंडळ स्थापन व्हावे, या व इतर मागण्यांसाठी पश्‍चिम महाराष्ट्र वृत्तपत्र विक्रेता व एजंट कृती समितीच्या वतीने मेळाव्याचे आयोजन केले होते. आ. सुरेश हाळवणकर प्रमुख उपस्थित होते.

आ. हाळवणकर म्हणाले, कामगारांच्या कल्याणकारी मंडळात  विविध उद्योगातील 122 घटकांचा समावेश केला आहे. यामध्ये वृत्तपत्र विक्रेत्यांचा  समावेश आहे. या मंडळाची 4 जुलैला नागपूर येथे बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत वृत्तपत्र विक्रेते, शेतमजूर, घरेलू कामगार या असंघटित घटकांचा कामगार म्हणून उल्लेख करावा, यासाठी आग्रही राहणार आहे. तसेच इचलकरंजी येथे वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी कामगार भवनची उभारणी करणे, विक्रेत्यांना ओळखपत्र देणे, राज्य कामगार कल्याण मंडळावर सल्लागार मंडळात विक्रेत्यांना प्रतिनिधित्व देणे यासाठी कार्यरत राहणार आहे.  एस.टी. स्टॅण्ड, प्रत्येक शहरात गाळे उपलब्ध करून देणे यासाठीही प्रयत्नशील राहणार आहे. राज्यात 8 कोटी असंघटित क्षेत्रातील कामगारांची संख्या आहे. त्या कामगारांना विविध सुविधा मिळवून देण्यासाठी त्या उद्योगावर, उत्पादनावर सेस लावण्याचा शासनाचा मानस आहे. 

यावेळी पश्‍चिम महाराष्ट्र वृत्तपत्र विक्रेता व एजंट कृती समितीचे पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष शिवगोंडा खोत यांनी वृत्तपत्र विक्रेते, वृत्तपत्रात काम करणारे कर्मचारी, वाहतूकदार यांच्यासाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ शासनाने स्थापन करावे, अशी मागणी केली. त्यासाठी रस्त्यावरील लढाईलाही तयार रहावे, असे आवाहन केले. कॉ. रघुनाथ कांबळे यांनी सध्या महागाई वाढल्यामुळे विक्रेत्यांच्या कमिशन वाढीच्या मागणीकडे दुर्लक्ष करू नये. 10 जुलैपर्यंत ही वाढ देण्यात यावी, अशी मागणी केली. मारुती नवलाई यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांवर अतिक्रमणाच्या नावाखाली कारवाई न होता  विक्रीसाठी नियोजित जागा, ओळखपत्र, मोफत बसपास  देण्याची अपेक्षा व्यक्त केली.

सचिन चोपडे व उत्तम चौगले (सोलापूर ) यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांच्या कमिशनमध्ये वाढ झाली पाहिजे तसेच विके्रत्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न झाले पाहिजेत, असे सांगितले. रवी लाड यांनी वृत्तपत्राकडून नेमण्यात येणारे कॅम्पेनर असावेत की नसावेत याबाबत कार्यकारिणीने निर्णय घ्यावा, असे सांगितले. जीवन कोळी यांनी विक्रेत्यांना विविध सोयीसुविधा मिळत नाहीत, त्या त्वरित न मिळाल्यास मतदानावर विक्रेत्यांनी बहिष्कार टाकावा तसेच विक्रेत्यांनी ऑनलाईन व्यवहार अंमलात आणावेत, असे  आवाहन केले. विकास सूर्यवंशी यांनी कल्याणकारी मंडळ स्थापन करावे, विक्रेत्यासाठी भवन स्थापन करावे, अशी मागणी केली. तसेच विक्र्रेत्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन केले. 

यावेळी जिल्हा स्वाभिमानी वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे जिल्हाध्यक्ष किरण व्हनगुत्ते, राज्य कार्यकारिणीचे सदस्य भाऊसाो सूर्यवंशी, राजेंद्र माळी (सातारा), मिलिंद भंडारी (कराड), रमेश जाधव (कोल्हापूर), परशुराम सावंत, प्रशांत जगताप (सांगली), सचिन चोपडे, श्रीपती शियेकर (कोल्हापूर), आण्णासाो गुंडे (इचलकरंजी) यांच्यासह वृत्तपत्र विक्रेत्यांची मोठी उपस्थिती होती. आभार रणजित आयरेकर यांनी मानले.

डॉ. योगेश जाधव यांच्या अभिनंदनाचा ठराव

उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाच्या अध्यक्षपदी दैनिक ‘पुढारी’चे व्यवस्थापकीय संपादक डॉ. योगेश जाधव यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मेळाव्यात करण्यात आला. कॉ. रघुनाथ कांबळे यांनी डॉ. जाधव यांच्या नियुक्तीमुळे विकासकामांना अधिक गती येणार आहे, असे सांगून अभिनंदनाचा ठराव मांडला. सर्व वृत्तपत्र विक्रेते, एजंट, वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे पदाधिकारी यांनी तो एकमताने मंजूर केला.