Sat, Sep 22, 2018 09:26



होमपेज › Kolhapur › सीमा प्रश्‍नातील वकिलांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

सीमा प्रश्‍नातील वकिलांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

Published On: Jul 27 2018 1:25AM | Last Updated: Jul 27 2018 12:53AM



कोल्हापूर : प्रतिनिधी

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍नी सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राची बाजू मांडणार्‍या वकिलांची पुढील आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दिल्लीत बैठक घेण्याचा निर्णय गुरुवारी मुंबईत झालेल्या तज्ज्ञ समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

सीमाप्रश्‍नी ज्येष्ठ नेते डॉ. प्रा. एन. डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ समिती स्थापन करण्यात आली आहे. याप्रश्‍नी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या दाव्याची सद्यस्थिती व पुढील कार्यवाही करण्याबरोबरच राज्याचे नूतन मुख्य सचिव व इतरांना वस्तुस्थिती समजावी, यासाठी ही बैठक गुरुवारी मुंबईत झाली. बैठकीला मुख्य सचिव डी. के. जैन, सामान्य प्रशासन विभागाचे अप्पर मुख्य सचिव बिपिन मलिक यांच्यासह मध्यवर्ती एकीकरण समितीचे दीपक दळवी, माजी आमदार अरविंद पाटील, मालोजी अष्टेकर, प्रकाश मरगाळे, अ‍ॅड. शिवाजीराव जाधव, समन्वय अधिकारी तथा निवृत्त पणन संचालक दिनेश ओऊळकर आदी उपस्थित होते.

सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेला हा दावा काढून टाकावा, असे पत्र कर्नाटक सरकारने दिल्याने यावरील सुनावणी प्रलंबित आहे. या दाव्यात महाराष्ट्राची बाजू ज्येष्ठ वकील अ‍ॅड. हरिश साळवे मांडत आहेत. पुढील सुनावणी लवकर घेण्याबरोबरच, ज्या आठ साक्षीदारांच्या साक्षी प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करायच्या आहेत, त्यावर आजच्या बैठकीत चर्चा झाली.