Sat, Apr 20, 2019 09:55होमपेज › Kolhapur › एकजुटीच्या बौद्धिक लढ्याचा निर्धार

एकजुटीच्या बौद्धिक लढ्याचा निर्धार

Published On: Aug 23 2018 1:27AM | Last Updated: Aug 23 2018 12:30AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

मराठा समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी भविष्यात एकजुटीने आणि बौद्धिक पद्धतीने लढा तीव्र करण्याचा निर्धार सकल मराठा समाजाच्या बैठकीत करण्यात आला. मराठा समाजातील युवकांच्या आत्महत्येनंतरही आरक्षण आंदोलनाकडे दुर्लक्ष करणार्‍या सरकारबद्दल संतप्त भावना व्यक्‍त करण्यात आल्या. तसेच अनेक वर्षे प्रलंबित असणारे मराठा समाजाचे प्रश्‍न मार्गी लावण्यात अपयशी ठरलेल्या लोकप्रतिनिधींचाही यावेळी निषेध करण्यात आला. 

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या  मागणीसाठी गेली 30 दिवस अखंड ठिय्या आंदोलनासह विविध प्रकारची आंदोलने समाजबांधव रस्त्यावर उतरून करत आहेत. शांतता व लोकशाहीच्या मार्गाने सुरू असणार्‍या आंदोलनाची दखल शासनाकडून घेतली जात नसल्याने आंदोलन तीव्र करून सरकारला जाग आणण्यासाठी आणि आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्याच्या उद्देशाने सकल मराठा समाजातर्फे बुधवारी राजर्षी शाहू मार्केट यार्डमधील मुस्कान लॉनमध्ये व्यापक बैठक झाली. यात कोल्हापूर जिल्ह्यासह पश्‍चिम महाराष्ट्रातील सकल मराठा समाजातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

बैठकीची सुरुवात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आत्महत्या करणार्‍या शहिदांना श्रद्धांजली वाहून करण्यात आली. संजय पोवार-वाईकर यांनी स्वागत केले. बैठकीच्या आचारसंहितेचे वाचन दिलीप देसाई यांनी केले. आंदोलन मोडण्यासाठी सरकारकडून सुरू असणार्‍या प्रयत्नांना न जुमानता आरक्षण मिळेपर्यंत ते सुरू ठेवण्याचे आवाहन केले. यानंतर वसंत मुळीक यांनी आरक्षणाचे जनक असणार्‍या शाहूंच्या नगरीतून मराठा आंदोलनाची धार तीव्र करून कोणत्याही स्थितीत आंदोलन मिळविण्यासाठी सज्ज होण्याचे आवाहन  केले. 

असहकार आंदोलनाने जेरीस आणूया

अनेक वर्षांपासून प्रलंबित असणार्‍या मराठा आरक्षणाच्या मागणीकडे गांभीर्याने न पाहणार्‍या सरकारला असहकार आंदोलनाने जेरीस आणू या, असा निर्धारही यावेळी करण्यात आला. सुनील शेलार (इचलकरंजी) यांनी मूक मोर्चा-ठोक मोर्चानंतर आता आमरण उपोषणाची वेळ आल्याचे सांगितले. मारुती मोरे (आजरा) यांनी 145 मराठा आमदारांनी सरकारला आरक्षणाबाबत अल्टिमेटम द्यावा, यासाठी त्यांच्यावर दबाव आणणे गरजेचे आहे. यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना घराबाहेर पडू देऊ नये. शासकीय-निमशासकीय कार्यालये बंद पाडावीत, असे सांगून ‘मराठे युद्धात आणि तहातही जिंकतात’ हे दाखवून देण्याचे आवाहन केले. सागर धनवडे (नृसिंहवाडी) यांनी सरकारचे कोणत्याही प्रकारचे कर न भरता असहकार आंदोलन तीव्र करण्याचे आवाहन केले. आरक्षणाबाबत मंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलिस प्रशासनाकडे केल्याचेही त्यांनी सांगितले.

50 टक्क्यांबाहेरचे आरक्षण नको

पत्रकार चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबत तांत्रिक माहिती सांगितली. लोकराजा राजर्षी शाहूंनी 1902 ला दूरदृष्टीने आरक्षणाचा कायदा केला. याअंतर्गत मराठा समाजालाही आरक्षण देण्यात आले. पुढे 1935 च्या मुंबई गर्व्हनरच्या आरक्षण कायद्याच्या पात्र घटकात मराठा समाज होता. याअंतर्गत 238 जातींना आरक्षण देण्यात आले होते. यात मराठा समाज 149 व्या स्थानी होता. देशाच्या स्वातंत्र्यानंतरही राजर्षी शाहूंच्या आरक्षण विचाराला महत्त्व देण्यात आले. राज्य घटनेच्या तरतुदीनुसार देशात तीनच प्रकारची आरक्षणे आहेत. यात एससी, एसटी व ओेबीसी यांचा समावेश असल्याचे सांगितले. सरकार मंडल आयोगाकडून केवळ दोन दिवसांत केलेला राज्यभरातील 250 जातींच्या अभ्यासाचा अहवाल ग्राह्य मानते. याउलट अनेक महिने कष्ट करून 12 लाख लोकांच्या अभ्यासाच्या राणे समिती अहवालाला कचर्‍याची टोपली दाखवत असल्याची खंत पाटील यांनी व्यक्‍त केली. गोखल इन्स्टिट्यूटच्या सर्वेनुसार मागासलेल्या मराठा समाजात 35 टक्के ऊसतोड कामगार, 58 टक्के माथाडी, 38 टक्के मालकरणी आणि 48 टक्के आत्महत्याग्रस्त शेतकरी असल्याची भीषणता नमूद केली. 23 मार्च 1994 च्या जीआरनुसार गोपीनाथ मुंडे, छगन भुजबळ व अण्णा डांगे यांनी आरक्षण चोरल्याचा आरोपही त्यांनी केला. यामुळे मराठा समाजाला आरक्षण 50 टक्क्यांच्या आतीलच मिळणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन चाला...

शिवाजी पेठेचा मोर्चा मराठा आंदोलनात फूट पाडण्यासाठी नव्हे तर बळ देण्यासाठी होता, असे स्पष्ट करून माजी नगरसेवक अजित राऊत यांनी जिल्ह्यातील 10 आमदार व 3 खासदारांशी एकत्रित बैठक घेऊन टोलच्या आंदोलनाप्रमाणेच कोल्हापूरकरांच्या पुढाकाराने आरक्षणाचा प्रश्‍न मार्गी लावू, असे आवाहन केले. विजयसिंह पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मूक-ठोक मोर्चानंतर आता तिसरा ‘पायतान’ मोर्चा काढण्याची वेळ आल्याचे सांगून कोल्हापूरी पायतान हातात घेऊन मोर्चा काढावा लागेल, असा इशारा दिला. बजरंग खामकर (शिरोळ) यांनी मराठा आरक्षणाबाबत लोकप्रतिनिधींनी आपली भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन केले. प्रा. जयंत पाटील यांनी आंदोलन सुरू असेपर्यंत आंदोलकांनी वैयक्‍तिक कामासाठीही लोकप्रतिनिंकडे जाऊ नये. कारण, वेगवेगळे अर्थ काढले जात असल्याचे सांगून लोकांचा विश्‍वासघात न करण्याचे आवाहन केले. भैया माने (कागल) यांनी नागपुरातील दुचाकी अपघातात मृत झालेल्या मुलींना प्रत्येकी 10 लाखांची मदत मिळाली. मात्र, मराठा समाजातील आत्महत्याग्रस्तांच्या घरी कोणीही लोकप्रतिनिधी गेला नसल्याची खंत व्यक्‍त केली. 

आंदोलन व्यापक करण्याची मागणी

मराठा आरक्षण व्यापक करण्यासाठी विविध उपाय-योजनाही सुचविण्यात आल्या. डॉ. नंदिनी बाभूळकर यांनी मराठा आरक्षणप्रश्‍नी लोकप्रतिनिधींची स्पष्ट भूमिका विचारण्यासाठी आणि आरक्षणासाठी आत्महत्या करणार्‍यांना न्याय कधी मिळणार, या प्रश्‍नाच्या उत्तरासाठी सरकारने विशेष अधिवेशन बोलवावे. यासाठी प्रसंगी महाराष्ट्र बंद करण्याचे आवाहन केले. माजी जि.प. सदस्य बाबासाहेब देवकर यांनी आंदोलनस्थळी कार्यकर्त्यांचा सतत राबता गरजेचा असल्याचे सांगितले. हर्षल सुर्वे यांनी खेडोपाडी सुरू असणारे आंदोलन देशाची आर्थिक राजधानी आणि राज्याची प्रशासकीय राजधानी असणार्‍या मुंबईपर्यंत पोहोचविणे गरजेचे असल्याचे सांगितले. राक्षसाचा जीव पोपटात असतो त्याचप्रमाणे सरकारचा जीव मुंबईत असल्याचे त्यांनी सांगितले.  जुना बुधवार पेठेतील धनंजय सावंत यांनी भविष्यात गनिमी कावा आंदोलन करण्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले. सुशील भांदिगिरे यांनी आंदोलकांनी निवडणुकीत लाचारी पत्करू नये, असे आवाहन केले. उदय भोसले व कमलाकर जगदाळे यांनी अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा गैरवापराबाबतही सरकारकडून उपाय-योजना व्हावी, अशी मागणी केली. यावेळी सचिन चौगले (वडणगे सरपंच), संभाजी इंजल (आजरा), अरविंद माने, संतोष मोहिते, रणजित जाधव (इचलकरंजी), अमर पाटील (शाहूवाडी), मच्छिंद्र मुंगळे, सचिन भांदिगिरे (भुदरगड), प्रवीण पाटील (सांगली) यांच्यासह अनेकांनी विविध मते मांडली.

केतन किरोडकरवर गुन्हा दाखल करा

मराठा आरक्षणविरोधात याचिका दाखल करून महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेला वेठीस धरण्याचे काम केतन किरोडकर याने केले आहे. इतकेच नव्हे तर 33 मराठा युवकांच्या आत्महत्येसाठी तो कारणीभूत ठरला आहे. यामुळे त्याच्यावर राज्यभरातील पोलिस ठाण्यांमध्ये सामाजिक स्वास्थ्य बिघडविणे, सदोष मनुष्यवध गुन्हा, सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानास कारणीभूत ठरला अशा स्वरुपाचे गुन्हे दाखल करावेत, असे आवाहन अमरसिंह पाटील (वारणा-कोडोली) यांनी केली.