Wed, Jul 24, 2019 08:22होमपेज › Kolhapur › देखाव्यांच्या वेळेबाबत जिल्हाधिकार्‍यांना विनंती करू

देखाव्यांच्या वेळेबाबत जिल्हाधिकार्‍यांना विनंती करू

Published On: Aug 30 2018 1:18AM | Last Updated: Aug 30 2018 1:04AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

करवीरनगरीला ऐतिहासिक, सामाजिक, शौर्याची व सामाजिक एकोप्याची परंपरा आहे. यंदा गणेशोत्सव व मोहरम एकत्रित येत आहेत. शहरात रात्री उशिरापर्यंत शहरवासीय रस्त्यावर असतात. अनेक कुटुंबे सुरक्षितपणे वावरत असतात. देखावे पाहण्यास आसपासच्या जिल्ह्यातून लोक येतात. यामुळे देखावे जादा वेळपर्यंत खुले ठेवण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा करून मार्ग काढला जाईल, असे आश्‍वासन पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिले. 

राजारामपुरी पोलिस ठाण्याच्या वतीने इंद्रप्रस्थ हॉलमध्ये आयोजित सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीला महापालिका आयुक्‍त डॉ. अभिजित चौधरी, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, मनपा विरोधी पक्षनेते विलास वास्कर यांच्यासह राजारामपुरीतील नगरसेवक, नगरसेविका यांची प्रमुख उपस्थिती होती. 

मनपा आयुक्‍त डॉ. अभिजित चौधरी म्हणाले, गणेशोत्सव काळात रुग्णवाहिका, अग्‍निशमन बंब यांच्यासाठी पुरेशी जागा सोडून मंडप उभारणी करणे अनिवार्य आहे. काही मंडळे परवाना घेताना वेगळी माहिती देतात तर प्रत्यक्षात वेगळ्या स्वरूपात मंडप उभारतात. खड्डे खुदाई, मंडप, स्वागत कमानी यांची खरी माहिती दिल्यास संघर्ष होणार नाही. सर्व मंडळांनी एक खिडकी योजनेचा लाभ घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी डॉ. चौधरी यांनी केले. 
पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव म्हणाले, राजारामपुरीतील देखाव्यांचे व मिरवणुकीचे वेगळे वैशिष्ट्य असते. आगमनापूर्वी साऊंड सिस्टिमबाबत भूमिका स्पष्ट केल्यास मंडळांचे नुकसान होणार नाही. आवाज मर्यादेचे पालन करणार्‍या मंडळांना साऊंड सिस्टिम लावण्यास परवानगी मिळावी, अशी भूमिका राहणार आहे.

कमलाकर जगदाळे म्हणाले, आगमन मिरवणूक हे राजारामपुरीचे वैशिष्ट्य आहे. गतवर्षी मोठा तणाव झाला. हा प्रकार टाळण्यासाठी प्रशासनाने आपली भूमिका स्पष्ट करावी. साऊंड सिस्टिमला परवानगी मिळाल्यास मंडळे नियमबाह्य वर्तन न करता प्रशासनाला सहकार्य करतील.

शिवसेनेचे शहरप्रमुख दुर्गेश लिंग्रस म्हणाले, राजारामपुरीतील रस्त्यांवर गणेशोत्सवानंतर खड्ड्यांचे प्रमाण वाढते. मनपा प्रशासन खड्ड्यांसाठी पैसे भरून घेते; पण खड्डे भरले जात नाहीत. यामुळे याकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे. 

आ. राजेश क्षीरसागर बैठकीला अनुपस्थित राहिल्याने त्यांनी एक निवेदन पाठविले. याचे वाचन अंकुश निपाणीकर यांनी बैठकीत केले. यामध्ये देखाव्यांना वेळ वाढवून मिळावा, मंडळांनी विनाखड्डे मंडप उभारणी करावी, स्वागत कमानींसाठी योग्य दर आकारावा, गतवर्षी मंडळांचे जप्‍त केलेले साहित्य तत्काळ परत मिळावे, अशा मागण्या करण्यात आल्या. 

बैठकीत रहीम सनदी, महेश उत्तुरे यांनीही मत मांडले. नगरसेविका प्रतिज्ञा उत्तूरे, रूपाराणी निकम, शमा मुल्‍ला, संदीप कवाळे, लाला भोसले, निवृत्त उपअधीक्षक मदन चव्हाण, पोलिस निरीक्षक तानाजी सावंत, औदुंबर पाटील, वसंत बाबर, संजय मोरे, संजय जाधव, दत्तात्रय बनगे, विनायक सूर्यवंशी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते  उपस्थित होते. 

घरात झोपलो होतो, तरीही गुन्हा दाखल
गतवर्षी साऊंड सिस्टिमच्या वापर करणार्‍या मंडळांवर पोलिस प्रशासनाने गुन्हे दाखल केले. यामध्ये राजारामपुरी दुसर्‍या गल्‍लीतील नंदकुमार मगदूम यांचा समावेश होता. बैठकीत बोलताना मगदूम म्हणाले, मागील वर्षी आम्ही घरात झोपलो होतो, अन् तरीही आमच्यावर गुन्हे दाखल झाले. हे आम्हाला समजल्यानंतर धक्‍का बसला. त्यांच्या या वाक्यावर बैठकीत एकच हशा पिकला. 

केरळ पूरग्रस्तांना मदत
जिद्द, मेहनत, मैत्री गु्रपच्या वतीने केरळ पूरग्रस्तांसाठी 5 हजार रुपयांच्या मदतीचा धनादेश प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आला. तर टेंबलाईवाडी मित्र मंडळानेही 2500 रुपयांची मदत बैठकीवेळी देऊ केली. आगामी गणेशोत्सव काळात मंडळांनी अशाच पद्धतीने मदतीचा हात देण्याचे आवाहन यावेळी महापालिका आयुक्‍त डॉ. अभिजित चौधरी यांनी केले.