Sat, Jul 20, 2019 23:43होमपेज › Kolhapur › प्राधिकरण बैठक सरपंचांनी उधळली

प्राधिकरण बैठक सरपंचांनी उधळली

Published On: Aug 02 2018 1:58AM | Last Updated: Aug 02 2018 1:15AMकोल्हापूर : प्रतिनिधी

शहरालगत असणार्‍या 42 गावांसाठी स्थापन केलेल्या प्राधिकरणाची माहिती देण्यासाठी आणि सरपंचांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी, बुधवारी बोलावण्यात आलेली बैठक सरपंचांनी उधळून लावली. ‘हटाव हटाव, प्राधिकरण हटाव’, ‘चलेजाव चलेजाव, प्राधिकरण चलेजाव’, ‘मान्य नाही, मान्य नाही, प्राधिकरण मान्य नाही’ अशा घोषणा देत सरपंच बैठकीतून सभागृहातून निघून गेले. सरपंच गेल्यानंतर अधिकार्‍यांनी ग्रामसेवकांची बैठक सुरूच ठेवल्याचे समजताच सरपंच सभागृहात घोषणा देतच घुसले आणि ही बैठक थांबवत अधिकारी व ग्रामसेवकांना त्यांनी सभागृहाबाहेर घालविले. पालकमंत्री व समितीच्या सदस्यांच्या उपस्थितीतच बैठक बोलावण्याची त्यांनी मागणी केली. जिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहू सभागृहात आजची बैठक आयोजित केली होती. प्राधिकरणात समावेश केलेल्या करवीर व हातकणंगले तालुक्यातील सर्व गावांचे 

सरपंच तसेच करवीर व हातकणंगले पंचायत समितीचे सभापती उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील यांनी आजच्या बैठकीमागील हेतू स्पष्ट केला. ते म्हणाले, 25 मे रोजी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत प्राधिकरणाबाबत ग्रामपंचायतींच्या मनामध्ये निर्माण झालेली संभ्रमावस्था दूर करण्यासाठी बैठक घ्यावी, अशी सूचना दिली होती. या बैठकीस 42 ग्रामपंचायतींच्या सरपंच व ग्रामसेवकांना बोलवावे. त्यांना प्राधिकरणाबाबत सविस्तर माहिती द्यावी, असेही सांगण्यात आले होते. त्यानुसार आजची बैठक बोलावण्यात आली आहे. काही हरकती किंवा सूचना असतील, तर लेखी स्वरूपात द्याव्यात. प्राधिकरण स्थापन झाल्यानंतर गावचा कर आकारणीचा तसेच गावाठाणामधील बांधकाम परवाना देेण्याचा अधिकार ग्रामपंचायतीलाच राहील.

आर. ए. पाटील यांनी, प्राधिकरणाबाबत माहिती सांगण्यास सुरुवात केली. राज्यात यापूर्वी सहा ठिकाणी प्राधिकरण स्थापन करण्यात आले आहे. त्यात कोल्हापूर प्राधिकरणाचा समावेश आहे. औद्योगिक वसाहतीच्या धर्तीवर कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण स्थापन करण्यात आले आहे. गावांचे जीवनमान उंचावण्यासाठी व सुधारण्यासाठी तसेच गावांच्या सुनियोजित विकासाकरिताच प्राधिकरण स्थापन करण्यात आले आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली 11 जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीत निमंत्रित सदस्यांमध्ये खासदार धनंजय महाडिक, राजू शेट्टी, छत्रपती संभाजीराजे व आ. सतेज पाटील, आ. अमल महाडिक, आ. राजेश क्षीरसागर, आ. चंद्रदीप नरके, आ. डॉ. सुजित मिणचेकर यांचा समावेश आहे. प्राधिकरणासाठी आकृतीबंध तयार करण्यात आला आहे. लवकरच त्याप्रमाणे पदे भरण्यात येणार आहेत. प्राधिकरण स्थापन करत असताना प्रथम गावच्या हरकती ऐकून घेण्यात येतील, त्यावर तुम्हाला तक्रार करण्यास संधी आहे. लवादासमोर त्याची सुनावणी होईल. लवादाचा निर्णय मान्य नसेल, तर पुढे न्यायाधिकरणाकडे संबंधितांना अपील करण्याची संधी आहे. नागरिकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जमिनी आरक्षित करताना त्यात समतोल साधला जाणार आहे. कोणावरही अन्याय होणार नाही, याची काळजी घेण्यात येईल. प्राधिकरणाने उजळवाईवाडी ते जरगनगरचा रस्ता ताब्यात घेतला आहे.

गोंधळास सुरुवात

प्राधिकरणाची माहिती सांगत असतानाच मध्येच निगवे सरपंंंचांनी माहिती विचारण्याचा प्रयत्न केला. त्यांना थांबविण्यात आले. प्रथम सर्व ऐकून घ्या आणि नंतर प्रश्‍न विचारा, असे  पाटील यांनी सांगितले. येथून गोंधळाला सुरुवात झाली. बांधकामाची परवानगी देण्याचे अधिकार ग्रामपंचायतीकडेच राहतील, मात्र विमानतळालगतच्या बांधकामांबाबत विमान प्राधिकरणाचा ‘ना हरकत’ दाखला घेणे बंधनकारक असल्याचे सांगितले.

जिल्हा परिषद माजी सदस्य एस. आर. पाटील म्हणाले, आजच्या बैठकीस पालकमंत्री उपस्थित राहणार, अशी माहिती आम्हास दिली होती. शिवाय सक्षम अधिकारीही कोणी उपस्थित नाही. उपस्थित जिल्हा परिषद अध्यक्षही सभागृहातून निघून गेल्या. गावांचा विकास झाला पाहिजे, हे आम्हाला मान्य आहे; पण गावातील लोकांच्या जागा ताब्यात घेऊन आम्हाला विकास नको. महापालिकेचा कारभार ऐकून आम्ही हद्दवाढीला विरोध केला. म्हणून आता हे प्राधिकरण आले. यामुळे आमची अवस्था ‘आगीतून उठून..’ या म्हणीप्रमाणे होणार असल्याने प्राधिकरणाचे भूत आमच्या मानगुटीवर बसवू नये, याला आमचा तीव्र विरोध आहे.

जोरदार घोषणाबाजी

वडणगेचे सरपंच सचिन चौगले बोलण्यास उभे राहिले. याचवेळी अनेक गावचे सरपंच बोलण्यासाठी उभे राहिले. यातून गोंधळ वाढत गेला. करवीरचे सभापती राजेंद्र सूर्यवंशी यांनी एकावेळी एकाने बोला, अशी सूचना करण्यासाठी पुढे आले. याचवेळी काही सरपंचांनी जर सभेचे अध्यक्षच उपस्थित नसतील, तर आम्ही आमच्या भावना कोणासमोर व्यक्‍त करायच्या, असे म्हणत आम्हाला प्राधिकरणच नको म्हणत प्राधिकरणाच्या विरोधात घोषणाबाजी सुरू झाली. अमर पाटील म्हणाले, प्राधिकरण स्थापन करण्यापूर्वी आमचे म्हणणे ऐकून घेणे आवश्यक होते. आज ग्रामपंचायतींचे बांधकामाचे अधिकार काढून घेतले आहेत. नगररचना विभागाकडून परवाना मागितला जातो. त्याशिवाय बँक कर्ज देत नाही. बांधकाम करता येत नाही. त्यामुळे या प्राधिकरणाला आमचा विरोध आहे.

करवीरचे सभापती राजेंद्र सूर्यवंशी यांनी, अधिकार काढून घेणारे प्राधिकरण आम्हाला नको. असे म्हणत व्यासपीठावरून खाली उतरत  ते सरपंचांमध्ये सामील झाले. त्यानंतर जोरात घोषणाबाजी सुरू झाली. प्राधिकरणाच्या निषेधार्थ घोषणा देत सर्वच सरपंच सभागृहाबाहेर आले.

बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष शौमिका महाडिक, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी सुषमा देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव, करवीरचे गटविकास अधिकारी सचिन घाटगे, हातकणंगले पंचायत समिती सभापती रेश्मा सनदी, उजळावाईच्या सरपंच सुवर्णा माने, गोकुळ शिरगावचे एम. के. पाटील, कणेरीच्या उज्ज्वला शिंदे, नेर्लीचे प्रकाश पाटील, कासारवाडीच्या शोभा खोत, संभापूरचे प्रकाश झिरंगे, मौजे नागावचे अरुण माळी, मौजे शिरोलीचे शशिकांत खवरे, उचगावच्या मालुताई काळे, टोपच्या रूपाली तावडे, पाडळी खुर्दच्या मंगला तानुगडे, वाडी पीरचे अजित खोत, वाशीच्या गीता लोहार, नंदवाळच्या अस्मिता कांबळे, गिरगावरच्या संध्या पाटील, कोगील खुर्दच्या रेश्मा कांबळे, मौजे निगवेे दुमालाचे विक्रम कराडे, भुयेवाडीच्या अरुणा पाटील, मोरेवाडीच्या सुनंदा कुंभार, पाचगावचे संग्राम पाटील, शियेचे रणजित कदम, मुडशिंगीचे तानाजी पाटील, सरनोबतवाडीचे उत्तम माने, शिंगणापूरचे प्रकाश रोटे, हणमंतवाडीचे दत्ता गावडे, आंबेवाडीचे सिकंदर मुजावर तसेच जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाजीराव पाटील आदी उपस्थित होते.

दरम्यान, सरपंच बाहेर निघून गेल्यानंतर अधिकार्‍यांनी ग्रामसेवक यांच्यासोबत बैठक सुरूच ठेवली. बैठकीत काही सरपंचही असल्याचे समजले. त्यामुळे संतप्त सरपंच पुन्हा सभागृहात घुसले आणि त्यांनी अधिकार्‍यांना बैठक थांबविण्यास सांगत ग्रामसेवकांना बाहेर जाण्यास सांगितले. जर बाहेर गेला नाही तर उद्या गाठ आमच्याशी आहे, असा दमच दिल्याने अधिकारी व ग्रामसेवक सभागृहातून निघून गेले.

सर्व सरपंच बाहेर आले तरी व्यासपीठावर हातकणंगले पंचायत समिती सभापती रेश्मा सनदी व सभागृहात मुडशिंगीचे सरपंच तानाजी पाटील, नागावचे सरपंच माळी उपस्थित होते.
प्राधिकरणाबाबत आम्ही चर्चा करण्यास तयार आहोत. मात्र, या बैठकीस समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील व समितीचे सर्व सदस्य उपस्थित असणे आवश्यक आहे. ते असल्याशिवाय आम्ही बैठकीस उपस्थित राहणार नाही, अशी भूमिका सरपंचांनी घेतली.