Mon, Aug 19, 2019 17:30होमपेज › Kolhapur › नेत्यांकडून नगरसेवकांची कानउघाडणी

नेत्यांकडून नगरसेवकांची कानउघाडणी

Published On: Feb 26 2018 1:15AM | Last Updated: Feb 26 2018 12:43AMकोल्हापूर : प्रतिनिधी

महापालिका स्थायी समिती सभापती निवडणुकीतून उसळलेल्या राजकीय गदारोळाच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते आ. हसन मुश्रीफ व काँग्रेसचे नेते आ. सतेज पाटील यांनी रविवारी शासकीय विश्रामधामवर नगरसेवकांची बैठक घेतली. एकदिलाने काम करा, चौकातील चर्चा बंद करा, अशा स्पष्ट सूचना देत त्यांनी नगरसेवकांची कानउघाडणी केली. काही अडचण असल्यास थेट आमच्याशी चर्चा करा, आम्ही त्याचे निरसन करू, असा सल्‍लाही दिला. स्थायीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे जे दोन नगरसेवक फुटले, त्या प्रकरणात प्रा. जयंत पाटील यांचा कोणताही रोल नाही, असा निर्वाळाही दोन्ही नेत्यांनी बैठकीत दिला.

गेल्या आठवड्यात महापालिका स्थायी समिती सभापतिपदाची निवडणूक झाली. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नगरसेवक अफजल पिरजादे व अजिंक्य चव्हाण या दोन नगरसेवकांनी थेट पक्षाच्या उमेदवाराविरोधात मतदान केले. त्यानंतर शनिवारी राष्ट्रवादीचे नगरसेवक मुरलीधर जाधव यांनी पदाधिकार्‍यांवर नाराजी व्यक्‍त करत राजीनामा देण्याचा इशारा दिला होता. या पार्श्‍वभूमीवर ही बैठक घेण्यात आली.

प्रारंभी आ. मुश्रीफ, आ. पाटील यांनी स्वतंत्र खोलीत बसून नगरसेवकांची मते जाणून घेतली. यावेळी काँग्रसचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, राष्ट्रवादीचे नेते आर. के.पोवार, शहराध्यक्ष राजू लाटकर हेही उपस्थित होते. यावेळी नेत्यांनी नगरसेवक भूपाल शेटे, सौ. सविता मोरे, सुभाष बुचडे, हसिना फरास, वहिदा सौदागर, सीमा बनसोडे आणि नगरसेवक मुरलीधर जाधव यांची मते जाणून घेतली. त्यानंतर नगरसेवकांची बैठक घेतली. 

आ. सतेज पाटील म्हणाले, महापालिकेतील घोडेबाजार थांबविण्यासाठी पक्षीय पातळीवर निवडणूक लढवली आणि महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ता आणली. आघाडीचे नेतृत्व मी आणि आ. मुश्रीफ करत आहोत. आम्हाला आघाडीची सत्ता टिकवायची आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला हक्‍काने सांगू शकतो. स्थायी समिती सभापती निवडणुकीवेळी जे घडले, ते चुकीचे आहे. त्याबाबत आम्ही माहिती घेत आहोत; पण त्याची चर्चा करू नका, कुणाबद्दलही अनुद‍्गार काढू नका. जी चर्चा करायची असेल, त्यासाठी आम्ही दोघे केव्हाही उपलब्ध आहोत. तेव्हा महापालिकेच्या चौकातील चर्चा बंद करा. 

पदाधिकार्‍यांबाबत तुमच्या काही तक्रारी असतील, तर त्या आम्हाला थेट सांगा, त्याचे आम्ही निरसन करू,  असे सांगून शिवसेनेचे चार नगरसेवक आघाडीबरोबर आहेत, त्यांच्याबद्दलही काहीच कुजबुज होऊ नये, याची सर्वांनी दक्षता घ्यावी. महापालिकेतील आघाडीचे संख्याबळ टिकविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. 17 मार्च रोजी याच विषयावर पुन्हा बैठक घेण्यात येईल, असेही आ. पाटील यांनी सांगितले. 

प्रा. जयंत पाटील यांच्याबाबत चर्चा थांबवा

स्थायी सभापती निवडीवेळी जे झाले, त्यात नगरसेवक प्रा. जयंत पाटील यांचा काहीही संबंध नाही, प्रा. पाटील थेट बोलणारे व्यक्‍तिमत्त्व आहे. त्यांना काही करावयाचे असते, तर त्यांनी उघड सांगितले असते; पण त्यांच्याबाबत जी उलटसुलट चर्चा सुरू आहे, त्याच्यावर आमचा विश्‍वास नाही. तो विषय आता संपलेला आहे, तुम्हीही संपवा, अशी सूचनाही आ. पाटील यांनी केली.

गद्दारांचे राजकीय आयुष्य संपवू : आ. मुश्रीफ

आ. मुश्रीफ म्हणाले, परवा ज्या दोन नगरसेवकांनी गद्दारी केली, त्याचे  दु:ख झाले आहे. ज्यांना पक्षाचे तिकीट दिले, निवडणुकीसाठी पैसा दिला, निवडून आणण्यासाठी जीवाचे रान केले, त्यांच्याकडून हा प्रकार घडला, हे मनाला वेदना देणार आहे; पण गद्दारांचे राजकीय आयुष्य संपविल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. 

आम्हाला दरिद्री समजू नका

अशा घटनांनी आम्ही पळून जाणार नाही, भाजपच्या नेत्यांकडे पैसा आहे, म्हणून आम्हाला कोणी दरिद्री समजण्याचा प्रयत्न करू नये, त्या काळात आम्ही थोडे गाफील राहिलो; पण काळ बदलतो. आम्ही अनेक पैसेवाले पाहिले आहेत. सत्ता गेल्यानंतर ते उद्ध्वस्त झालेलेही पाहिले आहेत. तेव्हा सर्वांनी संयमाने घ्यावे, तसेच यापुढे अशा घटना घडणार नाहीत, यासाठी सर्वांनी कटाक्षाने लक्ष द्यावे, अशी सूचनाही आ. मुश्रीफ यांनी केली.

प्रा. जयंत पाटील यांनी सक्रिय व्हावे

आ. मुश्रीफ म्हणाले, महापालिकेत जे निर्णय घेतले ते प्रा. जयंत पाटील यांना घेऊन घेतले. स्थायीच्या निवडणुकीत नगरसेवक फुटल्यानंतर ते प्रथम मला येऊन भेटले, जे घडले त्याची माहिती दिली. त्यातून प्रा. पाटील यांनी काही केलेले नाही, याबद्दल माझी खात्री झाली आहे. आता प्रा. पाटील यांनी सर्व विसरून महापालिकेत सक्रिय व्हावे, अशी सूचना आ. मुश्रीफ यांनी केली. तसेच नगरसेवक मुरलीधर जाधव यांचीही समजूत काढली असून, त्यांनाही ते पटले आहे, असेही ते म्हणाले.