Thu, Apr 25, 2019 06:04होमपेज › Kolhapur › दै.पुढारी कस्तुरी क्लबच्या वतीने महिला दिनानिमित्त मीरा बोरवणकर, पंकजा मुंडे यांची खास मुलाखत

दै.पुढारी कस्तुरी क्लबच्या वतीने महिला दिनानिमित्त मीरा बोरवणकर, पंकजा मुंडे यांची खास मुलाखत

Published On: Mar 05 2018 1:42AM | Last Updated: Mar 05 2018 12:10AMकोल्हापूर : प्रतिनिधी

जागतिक महिला दिनानिमित्त दै. पुढारी कस्तुरी क्लबच्या वतीने निवृत्त पोलिस अधिकारी मीरा बोरवणकर आणि ग्रामविकास, महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे तसेच अभिनेत्री व डबिंग आर्टिस्ट मेघना एरंडे यांच्या खास मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. महिला जगतात वेगळा ठसा निर्माण करणार्‍या या तिघींना ऐकण्याची संधी हॉटेल सयाजीमध्ये 9 आणि 10 मार्चला कोल्हापुरातील महिलांना मिळणार आहे. हा कार्यक्रम फक्त महिलांसाठीच आहे.

पहिल्या दिवशी शुक्रवारी (दि. 9) सायंकाळी पाच वाजता मीरा बोरवणकर व मेघना एरंडे यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम होईल. विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील हे मीरा बोरवणकर यांची मुलाखत घेतील. शनिवारी (दि. 10) सकाळी 11 वाजता ग्रामविकास तसेच महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांची मुलाखत आमदार प्रणिती शिंदे घेणार आहेत.

आयपीएस अधिकारी म्हणून महाराष्ट्र पोलिस दलात वेगळा ठसा निर्माण केलेल्या शिस्तबद्ध आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून मीरा  बोरवणकर प्रसिद्ध आहेत. पोलिस दलातील प्रदीर्घ कारकीर्द आणि सामाजिक व वैयक्तिक जीवन यांची उत्तमरीत्या सांगड घालणार्‍या बोरवणकर यांच्या आयुष्यातील विविध पैलू या मुलाखतीच्या निमित्ताने उघड होणार आहेत. कोल्हापुरातून पोलिस सेवेची सुरुवात करणार्‍या बोरवणकर यांनी नंतर विशेष पोलिस महानिरीक्षक, विविध मोठ्या शहरांचे पोलिस आयुक्तपद, तुरुंग महानिरीक्षक तसेच पोलिस महासंचालक पदापर्यंत झेप घेतली. या संपूर्ण सेवाकाळात त्यांना आलेले विविध अनुभव या मुलाखतीच्या माध्यमातून कोल्हापुरातील महिलांसमोर येणार आहेत.

अभिनयाबरोबरच छोट्यांच्या आवडत्या कार्टून विश्‍वाला आवाज देणार्‍या मेघना एरंडे यांचा जीवनप्रवासही तितकाच महत्त्वाचा आहे. एकीकडे अभिनयाच्या माध्यमातून मनोरंजन आणि दुसरीकडे कार्टूनला आवाज देत त्यांच्यात जीव निर्माण करणार्‍या मेघना यांना ऐकणे म्हणजे एक वेगळाच अनुभव असेल. चॅनेल्सच्या पडद्यावर कार्टून विश्‍वाने दबदबा निर्माण केला आहे. लहान मुलांच्या अत्यंत आवडीचा हा विषय जगभर गाजतो. या कार्यक्रमातील लहानग्यांपासून त्यांचे मित्र-मैत्रिणी, आई-बाबा यांचा आवाज काढून चित्रांमध्ये जीव निर्माण करण्याची कला मेघना एरंडे यांनी आत्मसात केली. त्याद्वारे त्यांनी एक वेगळे विश्‍व निर्माण केले. ते करीत असताना त्यांना करावे लागणारे कष्ट आणि घ्यावी लागणारी मेहनत, याची माहिती यानिमित्ताने मिळणार आहे.

शनिवारी (दि. 10) सकाळी 11 वाजता पंकजा मुंडेे यांची मुलाखत आ. प्रणिती शिंदे घेणार आहेत. राजकीय भक्कम वारसा लाभलेल्या या दोघीही महाराष्ट्रातील राजकारणाच्या स्टार लेडीज म्हणून ओळखल्या जातात. माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली जाण्याने निर्माण झालेली पोकळी पंकजा मुंडेे यांनी भरून काढलीच, शिवाय राज्यातील ग्रामविकास आणि महिला व बालकल्याण या दोन महत्त्वाच्या खात्यांच्या मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळत असताना वैयक्तिक, सामाजिक आणि राजकीय असे वेगळे पैलू त्यांच्या जीवनात आले.

बालपणानंतर युवा उंबरठ्यावर असतानाच त्यांना राजकीय अशा अतिसंवेदनशील क्षेत्रात पदार्पण करावे लागले. ही जबाबदारी अगदी लिलया पेलत राजकीय जीवनातील गमती-जमतींची माहिती पंकजा मुंडे यांच्या मुलाखतीतून ऐकायला मिळणार आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे या ही मुलाखत घेणार आहेत. राजकारणाचे बाळकडू मिळालेल्या या दोघींची मुलाखतीच्या माध्यमातून चौकार, षटकार खेळी ऐकून घेण्याचा हा दुर्लभ योग दै. ‘पुढारी’ कस्तुरी क्लबने जुळवून आणला आहे.

या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक झी युवा चॅनेल असून सहयोगी प्रायोजक तनिष्क टाटाची पेशकश, हॉस्पिटॅलिटी पार्टनर हॉटेल सयाजी आणि रेडिओ पार्टनर टोमॅटो एफ.एम. 94.3 आहेत. कार्यक्रमासाठी मोफत पास दिले जाणार आहेत. सोमवारपासून (दि. 5) बागल चौक येथील टोमॅटो एफ.एम.94.3 या रेडिओ कार्यालयात आणि भाऊसिंगजी रोडवरील दै.‘पुढारी’च्या कार्यालयात हे पास उपलब्ध आहेत. 
संपर्क : 0231-2533943, 6625943. तसेच झी युवा या चॅनेलच्या  महिला सेलिब्रेटींच्या खास मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे.