होमपेज › Kolhapur › वैद्यकीय कचर्‍याची  वाट्टेल तशी विल्हेवाट 

वैद्यकीय कचर्‍याची  वाट्टेल तशी विल्हेवाट 

Published On: Aug 22 2018 12:56AM | Last Updated: Aug 21 2018 11:10PMकोल्हापूर :सतीश सरीकर

कोल्हापूर शहरात दररोज सुमारे आठशे किलो जैव वैद्यकीय कचरा (दवाखान्यातील कचरा) जमा होतो. लाईन बझारमधील सांडपाणी प्रक्रिया केंद्राजवळ असलेल्या जैव वैद्यकीय कचरा प्रक्रिया प्रकल्पात त्यावर प्रक्रिया केली जाते. सद्यस्थितीत महापालिकेच्या वतीने कचर्‍याची विल्हेवाट लावली जात आहे; परंतु अशिक्षित कर्मचार्‍यांकडून वाट्टेल तशी वैद्यकीय कचर्‍याची विल्हेवाट लावली जात आहे. प्रक्रिया सुरू झाल्यानंतर परिसरात सर्वत्र धूर आणि दुर्गंधीही पसरते. परिसरात मोठ्या प्रमाणात हवेचे प्रदूषण होत आहे. नागरिकांना श्‍वसनाचा व त्वचेच्या आजारांचा सामना करावा लागत आहे. परिणामी परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. 

कोल्हापूर शहरातील एक हजारावर क्लिनिक, हॉस्पिटल्स, लॅबोरेटरी आदींची नोंद महापालिकेकडे आहे. महापालिकेच्या पाच वाहनांतून शहरातील सर्वच दवाखान्यातील कचर्‍याचे संकलन केले जाते. त्यानंतर दवाखान्यासह लॅबोरेटरीमधील जैव वैद्यकीय कचरा लाईन बझारजवळील प्रकल्पात नेला जातो. याठिकाणी भस्मीकरण केंद्रात त्याची विल्हेवाट लावली जाते; परंतु ही विल्हेवाट योग्य प्रकारे होत नसल्याने परिसरात सर्वत्र धूर पसरत आहे. तसेच प्रचंड दुर्गंधीही असते. प्रकल्पाजवळून जाणे मुश्किलीचे बनले आहे. 

यापूर्वीच्या ठेकेदाराने अत्यंत निकृष्ट दर्जाने प्लँट चालविल्याचे महापालिका अधिकारी सांगत आहेत. त्यामुळेच त्यांच्याकडून मुदत संपल्यानंतर प्रकल्प महापालिकेने ताब्यात घेतला. एका खासगी कंपनीतील प्रतिनिधीने महापालिकेच्या 12 कर्मचार्‍यांना प्रशिक्षण दिलेले आहे. त्यांच्याकडून शहरातील रुग्णालयातील वैद्यकीय कचरा संकलन करून त्यावर प्रक्रिया केली जात असल्याचे महापालिका अधिकार्‍यांनी सांगितले;
 परंतु संबंधित कर्मचारी अल्पशिक्षित असून आरोग्य विभागातील झाडू कामगार, मुकादम असे कर्मचारी आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमानुसार जैव वैद्यकीय कचर्‍याची विल्हेवाट लावली जात नसल्याचे निदर्शनास येत आहे.  

नागरिकांचा विरोध डावलून प्लँट सुरूच सद्यस्थितीत जैव वैद्यकीय कचरा प्रक्रिया प्रकल्पात फक्त कोल्हापूर शहरातील कचर्‍यावर प्रक्रिया केली जाते; परंतु आता शहराजवळील तीन तालुक्यांत असलेल्या सर्वच दवाखान्यातील आणि पॅथॉलॉजी लॅबमधील जैव  वैद्यकीय कचरा आणून याठिकाणी प्रक्रिया केली जाणार आहे. त्यासाठी घेतलेल्या सुनावणीला स्थानिक नागरिकांनी कडाडून विरोध केला होता; परंतु तरीही नागरिकांचा विरोध डावलून प्लँट सुरूच आहे. आता आणखी तीन तालुक्यांतील कचरा आणल्यास सुमारे दोन हजार किलोच्यावर जैव वैद्यकीय कचरा होणार आहे. त्यातून मोठ्या प्रमाणात हवेचे प्रदूषण होणार आहे. त्यामुळे नागरी वस्तीतील हा प्रकल्प हलविण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे. 

कामकाजातील गंभीर त्रुटीमुळेच आरोग्य विघातक परिस्थिती निर्माण होऊ शकते म्हणून यापूर्वीच्या ठेकेदाराचा ठेका रद्द करण्यात आला होता. संबंधित संस्थेने महापालिकेचे 60 हजार भुईभाडे थकविले असून 53 लाख, 67 हजार, 600 रु. रॉयल्टीही जमा केलेली नाही. त्यामुळे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच जैव वैद्यकीय कचर्‍याचा प्रकल्प महापालिका प्रशासनाने सील करून ताब्यात घेतला. त्यानंतर 29 जूनपासून महापालिका प्रशासनाच्या वतीने त्याठिकाणी शहरातील जैव वैद्यकीय कचर्‍यावर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.