कोल्हापूर : क्रीडा प्रतिनिधी
पुढील वर्षी अर्जेंटिना येथे होणार्या युवा ऑलिम्पिक स्पर्धेत देशासाठी पदक मिळवून क्रीडानगरी कोल्हापूरच्या नावलौकिकात भर घालण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा निर्धार नवोदित आंतरराष्ट्रीय नेमबाज शाहू माने याने याने व्यक्त केला. जपान येथे झालेल्या ‘एशियन एअरगन शूटिंग चॅम्पियनशिप’ स्पर्धेत शाहू माने याने 10 मीटर रायफल शूटिंग प्रकारात वैयक्तिक कांस्य पदकाची कमाई करत ‘युवा ऑलिम्पिक’ स्पर्धेसाठीच्या भारतीय संघात स्थान मिळविले. या यशाबद्दल त्याचे जंगी स्वागत आणि उत्साही मिरवणूक सोमवारी कोल्हापुरात काढण्यात आली.
स्पर्धा यशस्वी करून परतलेल्या शाहूचे आगमन पुण्यातून सोमवारी सकाळी कोल्हापुरात झाले. कसबा बावडा मार्गे कोल्हापुरात येणार्या शाहूचे स्वागत त्याच्या सेंट झेवियर्स शाळेसमोर करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत टाळ्या आणि जयघोषणात लाडक्या ‘शाहू’चा कौतुक सोहळा झाला.
मुख्याध्यापक जेम्स थोरात यांच्या हस्ते शाळेच्या प्रांगणात शाहूचा सत्कार करण्यात आला. यानंतर ऐतिहासिक दसरा चौकात कोल्हापूरच्या शतकी क्रीडा परंपरेचा भक्कम पाया रोवणार्या लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन करण्यात आले. या ठिकाणी अनेकांनी शाहू मानेचा गौरव केला. यानंतर खुल्या जीपमधून शाहूची मिरवणूक काढण्यात आली. कोल्हापुरी फेटा बांधून विविध प्रकारची मेडल्स गळ्यात घालून ‘व्हीक्ट्री’चा इशारा करत शाहू कोल्हापूरकरांना अभिवादन करत होता. पारंपरिक वाद्याचा गजर, जयघोष करणारे खेळाडू-विद्यार्थी आणि पालक हे जयघोष करत मिरवणुकीत सहभागी झाले होते. दसरा चौक, शिवाजी चौक, निवृत्ती चौक मार्गे शिवाजी पेठ असा मिरवणुकीचा मार्ग होता.
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, शिवसेना शहरप्रमुख दुर्गेश लिंग्रस, हर्षल सुर्वे, प्रा. अमर सासने, रविकिरण इंगवले, कोल्हापूर जिल्हा मेन-वुमेन रायफल असो.चे अजित पाटील, क्रीडाशिक्षक किरण साळोखे, तुषार माने, सौ. आशा माने, अरुण माने आदी उपस्थित होते.