Wed, Sep 26, 2018 10:57



होमपेज › Kolhapur › यवलुजे यांच्या महापौरपदावर आज होणार शिक्‍कामोर्तब?

यवलुजे यांच्या महापौरपदावर आज होणार शिक्‍कामोर्तब?

Published On: Dec 22 2017 1:26AM | Last Updated: Dec 22 2017 12:30AM

बुकमार्क करा





कोल्हापूर : प्रतिनिधी  

महापौर व उपमहापौरपदांसाठी शुक्रवारी निवडणूक होत आहे. महापौरपदासाठी सत्ताधारी काँग्रेसच्या वतीने स्वाती यवलुजे व विरोधी भाजपतर्फे मनीषा कुंभार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादीचे गटनेते सुनील पाटील व ताराराणी आघाडीकडून कमलाकर भोपळे यांनी अर्ज भरले आहेत. निवडीसाठी शुक्रवारी होणार्‍या महासभेत मतदान होईल. 

सभागृहात काँग्रेस-राष्ट्रवादीचे स्पष्ट बहुमत असल्याने यवलुजे व पाटील यांच्या निवडीवर शिक्‍कामोर्तब होईल. दरम्यान, निवडणुकीत आपल्याच पक्षाच्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी सर्वच पक्षांच्या गटनेत्यांनी व्हिप जारी केला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा होईल. निवडणुकीत कोणतीही रिस्क नको म्हणून, सत्ताधारी काँग्रेसचे नगरसेवक गोव्याला सहलीवर गेले आहेत. महापौरपदाची उमेदवारी न मिळाल्याने नाराज उमा बनछोडे, दीपा मगदूम यांच्यासह यापूर्वी स्थायी समिती सभापती निवडीवेळी गैरहजर राहिलेल्या रिना कांबळे यांनाही काँग्रेसच्याच बाजूने मतदान करावे लागणार आहे.

शिवसेनेची मते कोणाच्या पारड्यात?

महापालिकेत शिवसेनेचे चार नगरसेवक आहेत. अद्यापही त्यांना पक्षाकडून कोणतेही आदेश आलेले नाहीत. पक्षाचा आदेश येईल त्यानुसार सभागृहात कार्यवाही करू, असे शिवसेना गटनेता व परिवहन समिती सभापती नियाज खान यांनी सांगितले. दरम्यान, गेल्या वेळी त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बाजूने शिवसेनेने मतदान केले होते. यंदाही ते काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पारड्यातच मते टाकण्याची शक्यता आहे.