Wed, Jul 17, 2019 12:01होमपेज › Kolhapur › राष्ट्रवादीचे सात नगरसेवक ‘रडार’वर!

राष्ट्रवादीचे सात नगरसेवक ‘रडार’वर!

Published On: May 10 2018 1:35AM | Last Updated: May 10 2018 12:43AMकोल्हापूर : सतीश सरीकर 

विद्यमान महापौर स्वाती यवलुजे यांची मुदत 15 मे रोजी संपत आहे. नूतन महापौर निवडीसाठी महापालिका प्रशासन स्तरावर हालचाली सुरू झाल्या आहेत. परिणामी, सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना व विरोधी भाजप-ताराराणी आघाडी यांच्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. कोणत्याही स्थितीत भाजपचा महापौर करण्यासाठी ‘चंग’ बांधलेल्या विरोधी आघाडीने सत्ताधार्‍यांचे नगरसेवक आपल्या गोटात ओढून ‘बिनआवाजाचा बॉम्ब’ फोडण्याची तयारी चालविली आहे. त्यासाठी सत्ताधारी राष्ट्रवादीतील सात नगरसेवक ‘रडार’वर  असल्याचे सांगण्यात येते. शिवसेनेच्या तीन नगरसेवकांचाही त्यात समावेश असल्याची चर्चा आहे. असे एकूण दहा नगरसेवक ‘रडार’वर आहेत. त्यामुळे महापौरपदासाठी महापालिकेतील घोडेबाजार व सत्तासंघर्ष पेटणार, हे स्पष्ट झाले आहे.  

कोल्हापूर महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आहे. काटावरचे बहुमत  असल्याने कोणतीही ‘रिस्क’ नको म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शिवसेनेच्या चार नगरसेवकांनाही सत्तेत सामावून घेतले आहे. परिणामी, महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना यांची आघाडी आहे. सभागृहात काँग्रेसचे 27 नगरसेवक असून, दोन अपक्षांनी काँग्रेसचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारले आहे. राष्ट्रवादीचे 15 नगरसेवक आहेत. विरोधी भाजपचे 13 नगरसेवक असून, एका अपक्षाने त्यांना पाठिंबा दिला आहे. ताराराणी आघाडीचे 19 नगरसेवक आहेत. 

महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी 41 नगरसेवकांची आवश्यकता आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचे 44 नगरसेवक असून, शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे त्यांची संख्या 48 झाली आहे. भाजप-ताराराणी आघाडीकडे 33 नगरसेवक आहेत. महापौरपदाच्या सत्तेचे गणित जुळविण्यासाठी भाजप-ताराराणी आघाडीला आठ नगरसेवकांची गरज लागणार आहे. परंतु, रिस्क नको म्हणून 10 नगरसेवकांवर निशाणा साधण्यात आला आहे. ठराविक विश्‍वासू कारभार्‍यांवर दोन-दोन नगरसेवकांना आणण्याची जबाबदारी सोपविण्यात आली असल्याची चर्चा आहे. त्यासाठी वाट्टेल ती किंमत मोजण्याची तयारी दर्शविण्यात आल्याचे सांगितले जात आहे. 

काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असल्याने शिवसेनेच्या चार नगरसेवकांना महापालिका राजकारणात तसे फारसे कोणी विचारात घेत नव्हते. परंतु, स्थायी समिती सभापती निवडणुकीत दोन नगरसेवकांना फोडून भाजपने आपला सभापती केल्याने शिवसेनेला पुन्हा ‘डिमांड’ आले आहे. भाजप-ताराराणी आघाडीच्या कारभार्‍यांकडून शिवसेनेच्या तीन नगरसेवकांशी पाठिंब्याविषयी चर्चा झाल्याची चर्चा आहे. उमेदवार कोण असणार? यावर त्यांचा पाठिंबा अवलंबून असेल, असे सांगण्यात येते. तरीही जवळपास त्यांच्याशी वाटाघाटी सफल झाल्याचे सांगितले जात आहे. स्थायी समिती सभापती निवडणुकीत साथ दिलेल्या राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांनाही ‘गळ’ घातण्यात आली आहे. उर्वरित पाच नगरसेवकांना जाळ्यात ओढण्यासाठी कोटीच्या उड्डाणाच्या ऑफर दिल्या असल्याची चर्चा आहे. त्यापैकी तिघे नगरसेवक महासभेच्या पूर्वी झालेल्या राष्ट्रवादीच्या पार्टी मिटिंगला गैरहजर होते, असे सांगण्यात येते. अशाप्रकारे भाजपचाच महापौर करण्याचा निर्धार करण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे. 

काँग्रेसकडून भाजपवर ‘बूमरँग’चा प्रयत्न

स्थायी समिती सभापती निवडीवेळी मोठा दगाफटका झाल्याने महापौर निवडणुकीतही भाजप-ताराराणी आघाडीकडून फोडोफोडीचे राजकारण होणार, हे उघड गुपित आहे. त्यामुळे सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वतीनेही सावध हालचाली सुरू आहेत. 14 मे रोजी शेवटची सभा झाल्यानंतर सर्वांना सहलीवर पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. तसेच भाजप-ताराराणीच्या गळाला काही नगरसेवक लागले असल्याची चर्चा असल्याने काँग्रेसकडूनही भाजप-ताराराणी आघाडीतील नाराजांना हेरले जात आहे. असंतुष्टांना गाठून फोडाफोडीच्या राजकारणाचा ‘बूमरँग’ भाजपवरच उलटविण्याचा डाव काँग्रेसच्या नेत्यांनी आखला असल्याची चर्चा आहे. विरोधी भाजप-ताराराणी आघाडीच्या किमान पाच नगरसेवकांची मते काँग्रेसला मिळतील, असे काँग्रेसचे कारभारी ठामपणे सांगत आहेत.

साम, दाम, दंड, भेद अन् ‘ब्लॅकमेल’

कोल्हापूर महापालिकेच्या पंचवार्षिक सभागृहातील पहिल्या अडीच वर्षांसाठी ओबीसी (इतर मागास प्रवर्ग) महिलांसाठी महापौरपदाचे आरक्षण होते. त्याची मुदत 15 मे रोजी संपत आहे. आता पुढील अडीच वर्षांसाठी सर्वसाधारण (ओपन) प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपदाचे आरक्षण आहे. एकदाच लढायचे, या उद्देशाने विरोधी भाजप-ताराराणी आघाडी रणांगणात उतरणार आहे. त्यासाठी वाट्टेल ते करायची तयारी सुरू असल्याची नगरसेवकांत चर्चा आहे. दोन्हीकडच्या नेत्यांनी महापौरपदाची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे प्रचंड ईर्षा निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रसंगी साम, दाम, दंड, भेद आदी नीतीचाही वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात येते. कुणाचा हात कोणत्या दगडाखाली आहे, हे शोधून त्यानुसार रणनीती आखली जात आहे. त्यासाठी गुन्हे दाखल असलेल्या नगरसेवकांचीही माहिती घेतली जात आहे. त्याद्वारे त्यांना ‘ब्लॅकमेल’ करण्याचा प्रयत्न केला जात आहे.