Sun, May 26, 2019 08:56होमपेज › Kolhapur › महापौर, नगरसेवक चालत मनपात

महापौर, नगरसेवक चालत मनपात

Published On: Jun 06 2018 1:42AM | Last Updated: Jun 06 2018 12:12AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

दिवसेंदिवस वाढणार्‍या पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीचा निषेध करण्यासाठी महापालिकेतील सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वतीने मंगळवारी ‘नो व्हेईकल डे’ पाळण्यात आला. महापौर सौ. शोभा बोंद्रे, उपमहापौर महेश सावंत यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादीचे नगरसेवक शिवाजी पेठेतील उभा मारुती चौकातून चालत महापालिकेत आले. यात सर्वपक्षीय कृती समितीचे कार्यकर्तेही सहभागी झाले. निषेधाचे फलक व केंद्र सरकारविरेाधी घोषणामुळे पदयात्रेला मोर्चाचे स्वरूप आले. दरवाढीचा निषेध करणारे फलक व भजनी मंडळाच्या महागाईवरील कवितांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. 

महापौर बोंद्रे यांनी महापालिका कर्मचारी संघाला ‘नो व्हेईकल डे’ पाळण्याबाबत आवाहन केले होते. त्यानुसार महापालिकेचे काही अधिकारी-कर्मचारी वाहने घेऊन आले. काही अधिकारी-कर्मचारी महापालिका इमारतीच्याबाहेर वाहने लावून चालत आत गेले. दुपारपर्यंत महापालिका चौक वाहनाशिवाय रिकामाच होता. दरम्यान, आयुक्‍त डॉ. अभिजित चौधरी यांचा निषेध करण्यावरून मतभेद झाले. त्यानंतर आयुक्‍तांनी वाहन वापरले असले तर त्यांचा निषेध, असे माजी महापौर आर. के. पोवार यांनी सांगितले. मोर्चात अपंग बांधवही सहभागी झाले होते.  

काँग्रेस गटनेता शारंगधर देशमुख, सभागृह नेता दिलीप पोवार, माजी महापौर स्वाती यवलुजे, अश्‍विनी रामाणे, नगरसेविका जयश्री चव्हाण, वृषाली कदम, उमा बनछोडे, श्रीमती दीपा मगदूम, शोभा कवाळे, अ‍ॅड. सूरमंजिरी लाटकर, प्रतीक्षा पाटील,  माधुरी लाड, निलोफर आजरेकर,  रिना कांबळे, महिला व बालकल्याण समिती सभापती श्रीमती सुरेखा शहा, प्रताप जाधव, माजी नगरसेवक मधुकर रामाणे, आदिल फरास, अशोक भंडारे, बाबा पार्टे, दुर्वास कांबळे, किसन कल्याणकर, संभाजी जगदाळे, कॉ. दिलीप पवार आदींसह इतर सहभागी होते..

अच्छे दिन कसले रे बाबा... महागाईनं मारले बाबा..!   

निषेध मोर्चात शिवाजी पेठेतील मरगाई भजनी मंडळाने अच्छे दिन कसले रे बाबा... महागाईनं मारले बाबा..! ही महागाईवरील कवित सादर केली. त्याला उपस्थितांतून चांगला प्रतिसाद मिळत होता. 
शिवशाहीर दिलीप सावंत, सुनिल राऊत, संग्राम पाटील, विजय माने, सुनिल शिंदे, दत्ता माने, तानाजी साळोखे, दिलीप माने, किरण बामणे, महेश ढवळे, दौलत राऊत आदी सहभागी होते. 

आंदोलन सुरूच राहणार : महापौर 

केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळेच पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या किमती गगनाला भिडत आहेत. त्याचा सामान्यांना त्रास होत आहे. महागाईने जगणे मुश्किल होत आहे. त्यामुळेच आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला आहे. इंधनाच्या किमती कमी होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असे महापौर बोंद्रे यांनी सांगितले. आंदोलनाची पुढील दिशा दोन दिवसांत निश्‍चित केली जाईल, असे कृती समितीचे निमंत्रक व माजी महापौर आर. के. पोवार यांनी सांगितले.