Tue, Mar 19, 2019 11:45होमपेज › Kolhapur › महापौरपदासाठी ‘ताराराणी’कडे उमेदवारी

महापौरपदासाठी ‘ताराराणी’कडे उमेदवारी

Published On: May 21 2018 1:05AM | Last Updated: May 21 2018 12:44AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

कोल्हापूर महापौरपदाच्या निवडणुकीसाठी ताराराणी आघाडीला उमेदवारी देण्याचा निर्णय रविवारी भाजप-ताराराणी आघाडीच्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे या पक्षातून महापौरपदासाठी इच्छुक असलेल्या सौ. तेजस्विनी इंगवले, सौ. स्मिता माने व सौ. रुपाराणी निकम, सौ. सुनंदा मोहिते यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. तीन उमेदवारांपैकी एका उमदेवाराचे नाव नेतेमंडळी निश्‍चित करणार आहेत. त्यानंतर सोमवारी दुपारी तीनला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येईल. दरम्यान, महापौरपद निवडणुकीसाठी भाजपकडे उमेदवारी की ताराराणी आघाडीकडे, यावरून काहीकाळ नगरसेवक व पदाधिकार्‍यांत वादावादी झाल्याचे समजते. 

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव, ताराराणी आघाडी पक्षाचे अध्यक्ष स्वरूप महाडिक, महापालिकेतील गटनेता सत्यजित कदम, माजी महापौर सुनील कदम, भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, स्थायी समिती सभापती आशिष ढवळे, गटनेता विजय सूर्यवंशी आदी उपस्थित होते. बैठकीत महापौरपदासाठीची उमेदवारी भाजपकडे की ताराराणी आघाडीकडे, यावर चर्चा झाली. त्यावेळी ताराराणी आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले. त्यावर भाजपच्या नगरसेवकांनी मग यापूर्वीच तसे का ठरवले नाही? असा आक्षेप घेतला. आम्ही तयारी केली होती, असेही एका नगरसेविकेच्या पतीने सांगितले. परंतु, नेतेमंडळीच ताराराणी आघाडीचा उमेदवार महापौरपदाच्या निवडणुकीसाठी द्यायचा ठरविले असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर ताराराणी आघाडीतील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या.