होमपेज › Kolhapur › महापौर निवड २२ रोजी

महापौर निवड २२ रोजी

Published On: Dec 17 2017 1:28AM | Last Updated: Dec 17 2017 1:07AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

महापौर सौ. हसिना फरास यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या पदावर नूतन महापौर निवडण्यासाठी 22 डिसेेंबर रोजी विशेष सभा घेण्यात येणार आहे. याबाबतचा आदेश विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी काढला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांच्या अध्यक्षतेखाली सभा होणार आहे.

सौ. फरास यांच्या राजीनाम्यानंतर नगरसचिव दिवाकर कारंडे यांनी महापौर निवडीच्या तारीख निश्‍चितीसाठी विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव पाठविला होता. त्यानुसार 22 डिसेंबर रोजी विशेष सभा घेण्यात येणार आहे. महापौर, उपमहापौर पदासाठी 18 डिसेंबर रोजी दुपारी तीन ते पाच या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ आहे. 22 डिसेंबर रोजी अकरा वाजता सभा सुरू होताच पात्र उमेदवारांची नावे जाहीर केली जाणार आहेत. त्यानंतर पंधरा मिनिटांच्या कालावधीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. महापौर निवडीनंतर लगेचच उपमहापौर निवड केली जाणार आहे.

महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आहे. दोन्ही पक्षांनी पाच वर्षांसाठी पदे विभागून घेतली आहेत. सुरुवातीची अडीच वर्षे महापौरपद ओबीसी महिलांसाठी राखीव आहे. पहिले वर्ष काँग्रेसने महापौरपद घेतल्यानंतर यंदाच्या वर्षी राष्ट्रवादीच्या फरास महापौर झाल्या होत्या. त्यांनी मंगळवारी 12 रोजी महापौरपदाचा राजीनामा दिला आहे. मुदत संपल्याने उपमहापौर अर्जुन माने यांनीही राजीनामा दिला आहे. आता उर्वरित कालावधीसाठी महापौरपद काँग्रेसकडे, तर उपमहापौरपद राष्ट्रवादीकडे जाणार आहे.

महापौरपदासाठी काँग्रेसमधून स्वाती यवलुजे, दीपा मगदूम, निलोफर आजरेकर, उमा बनछोडे इच्छुक आहेत. उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादी गटनेता सुनील पाटील इच्छुक आहेत. काँग्रेसचे नेते आ. सतेज पाटील व राष्ट्रवादीचे नेते आ. हसन मुश्रीफ हेच महापौर व उपमहपौरपदाचे नाव अंतिम करणार आहेत. त्यामुळे इच्छुकांनी पदासाठी नेत्यांकडे फिल्डिंग लावली आहे. दरम्यान, रविवारी (दि. 17) काँग्रेस सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. यावेळी काँग्रेस नेते आ. सतेज पाटील इच्छुकांची मते जाणून घेणार आहेत.