Tue, Apr 23, 2019 19:50होमपेज › Kolhapur › इंधन दरवाढ निषेधार्थ मंगळवारी महापौर-उपमहापौर चालत मनपात

इंधन दरवाढ निषेधार्थ मंगळवारी महापौर-उपमहापौर चालत मनपात

Published On: Jun 03 2018 1:14AM | Last Updated: Jun 03 2018 12:43AMकोल्हापूर : प्रतिनिधी

पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीच्या निषेधार्थ तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार महापालिकेत शनिवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत करण्यात आला. पहिल्या टप्यात सोमवारी महापालिका चौकात निषेध सभा घेण्याचे ठरले. त्यानंतर दरवाढीचा निषेध करण्यासाठी मंगळवारी ‘नो व्हेईकल डे’ पाळण्याचा निर्णय झाला. 

त्याअंतर्गत सकाळी दहाला उभा मारुती चौकातून महापालिका पदाधिकार्‍यांसह नगरसेवक चालत महापालिकेत येणार आहेत. यात महापौर सौ. शोभा बोंद्रे, उपमहापौर महेश सावंत यांंचाही समावेश असेल. दरवाढीविरोधात कोल्हापुरात व्यापक जनआंदोलन उभारण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला. 

महापौर बोंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत बैठक झाली. माजी महापौर आर. के. पोवार, ज्येष्ठ नगरसेवक प्रा. जयंत पाटील, काँग्रेस गटनेता शारंगधर देशमुख, सभागृह नेता दिलीप पोवार प्रमुख उपस्थित होते.

शेजारच्या राष्ट्रातून पेट्रोल, डिझेल स्वस्त मिळत असताना भारतातच एवढी दरवाढ का? आधीच महागाईने हैरान झालेली जनता पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीने होरपळत आहे. तरीही दरवाढीबाबत केंद्र सरकार व भाजप हे जनतेची दिशाभूल करत आहेत, असा आरोप करण्यात आला. अनेकांनी दरवाढीविरुद्ध तीव्र भावना व्यक्त केल्या.
सतीशचंद्र कांबळे, संभाजीराव जगदाळे, अ‍ॅड. पंडितराव सडोलीकर, लालासाहेब गायकवाड, बी. एल. बरगे, लॉरी ऑपरेटर्स असोसिएशनचे सुभाष जाधव, लालासाहेब गायकवाड, बाबुराव कदम, फारूक शेख, चारूलता चव्हाण, किशोर घाटगे, रणजित आयरेकर, बाबा पार्टे आदींनी सूचना केल्या. बैठकीला विविध पक्ष, संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.