Sat, Jul 20, 2019 11:22होमपेज › Kolhapur › महापौर-उपमहापौरांचा आज राजीनामा

महापौर-उपमहापौरांचा आज राजीनामा

Published On: Dec 12 2017 2:05AM | Last Updated: Dec 12 2017 12:18AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

महापौर सौ. हसिना फरास व उपमहापौर अर्जुन माने यांचा वर्षाचा कालावधी संपल्याने मंगळवारी महासभेत ते राजीनामा देणार आहेत. त्यानंतर महापौरपद काँग्रेसकडे, तर उपमहापौरपद राष्ट्रवादीकडे जाणार आहे. परंतु, नूतन महापौरांना 15 मेपर्यंत म्हणजेच किमान साडेपाच महिन्यांचा कालावधी मिळेल. त्यानंतर महापौरपद सर्वसाधारण प्रवर्गातील महिलासाठी राखीव आहे. 

दरम्यान, महापौरपदासाठी काँग्रेसमधून उमा बनछोडे, दीपा मगदूम, स्वाती यवलुजे, निलोफर आजरेकर इच्छुक आहेत. उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादी गटनेता सुनील पाटील इच्छुक आहेत. मात्र, काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील व राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ हेच महापौर व उपमहापौरपदाचे नाव अंतिम करणार आहेत. त्यामुळे इच्छुकांनी नेत्यांकडे पदासाठी फिल्डिंग लावली आहे.

महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आहे. दोन्ही पक्षांनी पाच वर्षांसाठी पदे विभागून घेतली आहेत. त्यानुसार सुरुवातीचे अडीच वर्षे महापौरपद ओबीसी महिलासाठी राखीव आहे. पहिले वर्ष काँग्रेसने महापौरपद घेतल्यानंतर यंदाच्या वर्षी राष्ट्रवादीच्या फरास महापौर झाल्या आहेत. त्यांना वर्षभरासाठी मुदत देण्यात आली असून, 8 डिसेंबरला मुदत संपली. उपमहापौर माने यांचाही वर्षाचा कालावधी संपला असल्याने दोघेही राजीनामा देतील.