Fri, Apr 26, 2019 10:03होमपेज › Kolhapur › पाटाकडील, प्रॅक्टिसचा पुढील फेरीत प्रवेश

पाटाकडील, प्रॅक्टिसचा पुढील फेरीत प्रवेश

Published On: Apr 21 2018 1:00AM | Last Updated: Apr 21 2018 12:40AM•आजचे सामने : बालगोपाल तालीम वि. ऋणमुक्‍तेश्‍वर तालीम, दुपारी 2 वाजता, साईनाथ स्पोर्टस् वि. दिलबहार तालीम ‘अ’, सायं. 4 वाजता.

कोल्हापूर : क्रीडा प्रतिनिधी 

मंगळवार पेठ फुटबॉल क्‍लबची शर्तीची झुंज व्यर्थ ठरवत पाटाकडील तालीम मंडळ ‘अ’ संघाने त्यांचा 4-1 असा पराभव केला. दुसर्‍या सामन्यात प्रॅक्टिस फुटबॉल क्‍लब ‘अ’ संघाने संयुक्‍त जुना बुधवार पेठेवर 4-1 असा एकतर्फी विजय मिळवत ‘महापौर चषक’ फुटबॉल स्पर्धेच्या पुढील फेरीत प्रवेश केला. 

कोल्हापूर महापालिका आयोजित ही स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू आहे. शुक्रवारी दुपारच्या सत्रात पहिला सामना बलाढ्य पाटाकडील तालीम ‘अ’ विरुद्ध नवख्या मंगळवार पेठ तालीम यांच्यात झाला. मंगळवार पेठ संघाने पाटाकडीलला शर्तीने झुंज दिली. सामन्याच्या सुरुवातीपासूनच पीटीएमने आक्रमक पवित्रा घेत आघाडीसाठी प्रयत्न सुरू ठेवले. 10 व्या मिनिटाला झालेल्या चढाईत ओंकार जाधव (गडहिंग्लज) याने गोल नोंदवत संघाला आघाडी मिळवून दिली.

यानंतर 34 व्या मिनिटाला झालेल्या चढाईत त्यांच्या रूपेश सुर्वे याने दुसरा गोल केला. यामुळे मध्यंतरापर्यंत त्यांना 2-0 अशी आघाडी मिळाली. उत्तरार्धात मंगळवार पेठेकडून गोल फेडण्यासाठी जोरदार चढाया सुरूच होत्या. 54 व्या मिनिटाला झालेल्या चढाईत नितीन पोवारने गोलची नोंद करून पीटीएमची आघाडी 2-1 अशी कमी केली. पीटीएमकडून चढाया सत्र सुरूच होते. 62 व्या मिनिटाला रूपेश सुर्वे याने वैयक्‍तिक दुसरा व संघाकडून तिसरा गोल केला. पाठोपाठ 65 व्या मिनिटाला सार्थक राऊत याने चौथा गोल नोंदवत संघाला 4-1 अशी भक्‍कम आघाडी मिळवून दिली. मंगळवार पेठेकडून उर्वरित गोलची परतफेड होऊ शकली नाही. 

प्रॅक्टिसचा एकतर्फी विजय

सायंकाळच्या सत्रात प्रॅक्टिस फुटबॉल ‘अ’ क्‍लब विरुद्ध संयुक्‍त जुना बुधवार पेठ यांच्यात सामना झाला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांकडून जलद खेळाचा अवलंब करण्यात आला. शॉर्ट पासिंगसह आघाडीसाठी चढाया झाल्या. प्रॅक्टिस क्‍लबकडून झालेल्या चढाईत इंद्रजित चौगुलेच्या उत्कृष्ट पासवर कैलास पाटील याने पुढे आलेल्या गोलरक्षकाच्या डोक्यावरून सहज गोल केला. यानंतर त्यांच्या इंद्रजितचा फटका गोलरक्षकाने रोखला. राहुल पाटीलच्या पासवर कैलासने मारलेला फटका गोलपोस्टला लागला.

पाठोपाठ अभिजित शिंदेने फ्री किकवर मारलेला फटकाही गोलपोस्टला लागला. बुधवार पेठेकडून गोल फेडण्याचे जोरदार प्रयत्न सुरू होते. नीलेश सावेकरचा फटका गोलपोस्टला घासून गेला. त्याने मारलेली फ्री कीक प्रॅक्टिसच्या बचाव फळीने फोल ठरविली. कौशिक जाधवची उत्कृष्ट चढाई अपयशी ठरली. यामुळे मध्यंतरापर्यंत प्रॅक्टिस 1-0 आघाडीवर होते. उत्तरार्धात सामन्यावर प्रॅक्टिसचे वर्चस्व होते. 45 व्या मिनिटाला राहुल पाटीलने गोल नोंदविला. पाठोपाठ 62 व्या मिनिटाला राहुलच्या पासवर इंद्रजित चौगुलेने गोल नोंदवत आघाडी 3-0 अशी भक्‍कम केली. 77 व्या मिनिटाला सिद्धार्थ पाटीलने गोल नोंदवत सामना 4-0 असा केला. जुना बुधवारच्या प्रसाद पाटील, किरण कावणेकर यांच्या चढाया प्रॅक्टिसचा गोलरक्षक राजीव मिरीयाला याने फोल ठरवत संघाला 4-0 असा विजय मिळवून दिला.

Tags : kolhapur, kagal news, Mayor Cup, football tournament,