Tue, Mar 26, 2019 02:04होमपेज › Kolhapur › ‘दिलबहार’ला नमवून ‘पीटीएम’ अंतिम फेरीत

‘दिलबहार’ला नमवून ‘पीटीएम’ अंतिम फेरीत

Published On: May 03 2018 1:41AM | Last Updated: May 03 2018 12:23AMकोल्हापूर : क्रीडा प्रतिनिधी 

मध्यंतरापर्यंत दिलबहार तालीम मंडळाकडून झालेली चिवट खेळी फोल ठरवत पाटाकडील तालीम मंडळाने त्यांचा 2-0 असा पराभव करून ‘महापौर चषक फुटबॉल’ स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली. सामन्यातील दोन्ही विजयी गोल पीटीएमचा स्टार खेळाडू ऋषिकेश मेथे-पाटील याने करून फुटबॉलप्रेमींची मने जिंकली. 

कोल्हापूर महानगरपालिका आयोजित ही स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू आहे. महाराष्ट्रदिनानिमित्त 27 एप्रिल ते 1 मे अशा पाच दिवसांच्या विश्रांतीनंतर स्पर्धेतील दुसरा उपांत्य सामना बुधवारी खेळविण्यात आला. दिलबहार तालीम विरुद्ध पाटाकडील यांच्यातील सामन्यात मध्यंतरापर्यंत दिलबहारने पाटाकडीलला अटीतटीची झुंज दिली. पीटीएमकडून वृषभ ढेरेची फ्री कीक दिलबहारचा गोलरक्षक आशिष गवळीने झेलली. अकिमने मारलेला डाव्याचा पायाचा फटका गोलीने उत्कृष्टरित्या रोखला. दिलबहारकडून करण चव्हाण-बंदरे, निखिल जाधव यांनी केलेल्या चढायांना अपयश आले. यामुळे मध्यंतरापर्यंत सामना गोलशून्य बरोबरीत होता.

उत्तरार्धात सामन्यावर पाटाकडीलचा कब्जा होता. सामन्याच्या 58 व्या मिनिटाला झालेल्या चढाईत ऋषिकेश मेथे-पाटील याने पुढे आलेल्या गोलरक्षकाला हुलकावणी देत गोलपोस्टचा अचूक वेध घेत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. पाठोपाठ 72 व्या मिनिटाला झालेल्या खोलवर चढाईत ऋषिकेशने वैयक्तिक व संघासाठी दुसरा गोल नोंदवत आघाडी 2-0 अशी भक्‍कम केली. अकिम आणि ऋषिकेशच्या अनेक चढाया अपयशी ठरल्या. दिलबहारकडून गोल फेडण्यासाठी करण, निखिल, इमॅन्युअल, जावेद जमादार यांनी केलेल्या लागोपाठ चढाया दिलबहारच्या भक्‍कम बचावामुळे फोल ठरल्या. बचावफळीत सैफ हकीम, अक्षय मेथे-पाटील, ओबेलो आणि गोलरक्षक विशाल नारायणपुरे यांनी उत्कृष्ट खेळ केला. यामुळे एकाही गोलची परतफेड दिलबहारला करता आली नाही.  

तृतीय क्रमांकासह, मैत्रिपूर्ण सामना आज स्पर्धेतील तृतीय क्रमांकासह मनपा पदाधिकारी व अधिकारी यांच्यातील मैत्रिपूर्ण सामना गुरुवारी दि. 3 मे रोजी रंगणार आहे. 

दुपारी 3 वाजता, बालगोपाल विरुद्ध दिलबहार तालीम यांच्यात दुपारी 3 वाजता तृतीय क्रमांकासाठीचा सामना होणार आहे. यानंतर सायंकाळी मैत्रिपूर्ण सामना होणार असून यात मनपाचे पदाधिकारी, नगरसेवक, कर्मचारी सहभागी होणार आहेत. यावेळी क्रीडाप्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.