Wed, Jul 24, 2019 06:49होमपेज › Kolhapur › ‘गौण खनिजा’ची प्रचंड लूट

‘गौण खनिजा’ची प्रचंड लूट

Published On: Apr 17 2018 1:53AM | Last Updated: Apr 16 2018 11:10PMकोल्हापूर : प्रतिनिधी

सरकारी कामाच्या नावाखाली गौण खनिजाची लूट केली जात आहे. मात्र, ही लूट थांबवण्यासाठी आता जिल्हा प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. सरकारी काम करताना गौण खनिज उत्खननाची प्रत्यक्ष रॉयल्टी भरून घेतली जाणार आहे. याकरिता जिल्ह्यातील 18 कार्यालयांच्या अधिकार्‍यांची जिल्हाधिकार्‍यांनी बैठक बोलावली आहे.गौण खनिजाची रक्‍कम परस्पर जमा करून घेतली जात असल्याने संबंधित कंत्राटदाराला रानच मोकळे मिळाल्याचे चित्र आहे. शासकीय कामाच्या नावाखाली आणि गौण खनिजाच्या भरलेल्या रकमेच्या आधारे अनेकजण बेसुमार उत्खनन करत असल्याचेही चित्र आहे. रक्‍कम यापूर्वीच भरली असल्याने उत्खनन आणि त्याच्या वाहतुकीसाठी कोणत्याही प्रकारचा पास नसतो, या सर्वाचा फायदा घेत काही कंत्राटदार आपले उखळ पांढरे करत आहेत. यामुळे गौण खनिजाचे उत्खनन तर होतेच; पण महसूलही बुडत आहे.  

या वर्षभरात शासकीय कामांसाठी झालेल्या उत्खननात संबंधित कार्यालयाच्या म्हणण्यानुसार, सव्वा आठ कोटी रुपयांच्या गौण खनिजचा वापर झाला. यापैकी सुमारे 80 लाख रुपयांचा निधी जिल्हा खनिज प्रतिष्ठानकडे वर्ग होणे अपेक्षित होते. मात्र, या प्रचलित पद्धतीमुळे ते झाले नाही. या निधीवर पाणी सोडण्याची वेळ जिल्हा प्रशासनावर आली आहे. भविष्यात गौण खनिज उत्खननावर आळा बसावा, त्याची योग्य रॉयल्टी सरकारकडे जमा व्हावी, त्यावर खनिज प्रतिष्ठानचाही निधी मिळावा आणि अवैध उत्खनन रोखून पर्यावरणाचा होणारा र्‍हास कमी व्हावा, यासर्व पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने आता सरकारी कामांसाठी लागणार्‍या गौण खनिजाच्या रॉयल्टीची रक्‍कम आपल्याकडेच भरून घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याकरिता 18 कार्यालयांतील अधिकार्‍यांची बैठक आयोजित केली आहे.

Tags : Kolhapur, Massive, robbery, minor, minerals