Wed, Jun 26, 2019 11:24होमपेज › Kolhapur › मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत

मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत

Published On: Jul 17 2018 1:34AM | Last Updated: Jul 16 2018 10:56PMकोल्हापूर : प्रतिनिधी

गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे.

किटवडेत अ‍ॅग्रो फार्मचे शेड उद्ध्वस्त : घरांची पडझड

आजरा : प्रतिनिधी

आजरा तालुक्यामध्ये पावसाने थैमान घातले असून, जोरदार वार्‍यासह झालेल्या पावसामुळे लाखोंची हानी झाली आहे. किटवडे येथे अ‍ॅग्रो फार्मचे शेड कोसळून सुमारे साडेपाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ठिकठिकाणी घरांची पडझड होत असल्याने सर्वसामान्य नागरिक पावसामुळे धास्तावले असून, पाऊस थांबण्याची प्रतीक्षा करू लागले आहेत.पावसामुळे पारपोलीपैकी खेडगे येथील जॉर्ज परसू बार्देस्कर, बबन बाबू बार्देस्कर, संतान बाबू बार्देस्कर, बाबू लुईस बार्देस्कर, शाहू धाकू फर्नांडिस, मिलन इन्सू बार्देस्कर, मायकल बार्देस्कर, मोतेन बार्देस्कर, सुळेरान येथील गोविंद बाळू कांबळे, आजरा शहरातील मुल्ला यासह तालुक्यातील पन्‍नासभर घरांची पडझड झाली आहे. किटवडे येथील सुधाकर प्रभू यांच्या बंदिस्त शेळीपालन फार्मवरील पत्र्याचे शेड वार्‍याबरोबर उडून जाऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले. जुन्या मटण मार्केट इमारतीची भिंत अशोक साळुंखे राहत असलेल्या घरावर कोसळल्याने साळुंखे कुटुंबीयांना तलाठी भवन येथे हलविण्यात आले आहे. आजरा-चंदगड मार्गावरील का. कांडगाव येथे दरड व झाडे कोसळल्याने काहीकाळ या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. पावसाची संततधार कायम असल्याने व प्रशासनाने अतिदक्षतेचा इशारा दिल्याने तालुकावासीयांमध्ये पावसामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
मुरगूड - मुदाळतिट्टा मार्ग बंद; 

निपाणीचा तळ कोकणाशी संपर्क तुटला

मुदाळतिट्टा : प्रतिनिधी

सतत होत असलेल्या मुसळधार पावसामुळे वेदगंगा नदीला महापूर आला आहे. पुराच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. राधानगरी-निपाणी मार्गावर मुरगूड येथील स्मशानशेड म्हणजेच येथील ब्रिटिशकालीन पुलानजीक रस्त्यावर पुराचे पाणी आले आहे. त्यामुळे येथून होणारी वाहतूक बंद झाली आहे. मुरगूड-मुदाळतिट्टा मार्ग बंद झाला असून, निपणीचा तळ कोकणाशी संपर्क तुटला आहे. रस्त्यावर पाणी असताना देखील वाहनधारक या पुराच्या पाण्यातून वाहने चालवित आहेत. रस्त्यावर पाण्याचा वाढता ओघ पाहून विद्यार्थी वर्गाने शाळा सोडून आपल्या घरी जाणे पसंद केले.

कुरणी, सुरूपली, वाघापूर दरम्यान असणार्‍या बंधार्‍यावर गेले दहा दिवस पाणी राहिल्याने येथून होणारी वाहतूक बंद आहे. परिणामी, निढोरी -मुरगूड - कागल अशी वाहतूक सुरू होती. सतत होणार्‍या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुरगूड, शिंदेवाडी, यमगे या तीन गावांना पाणीपुरवठा करणार्‍या सरपिराजीराव तलावामध्ये चांगला पाणीसाठा झाला आहे. एकूण 39 फूट पाणी साठवण क्षमता असणार्‍या या तलावामध्ये आजअखेर 27 फूट पाणीसाठा झाला आहे. गेले आठ दिवस पुराचे पाणी पात्राबाहेर असल्याने नदीकाठावरील पिके पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे पिके कुजण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शेतकरी बांधव पिकाच्या भांगलणीच्या कामात गुंतला आहे. पूरस्थिती असल्यामुळे शाळा, ज्युनिअर कॉलेज, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी संख्या कमी होती.

भुदरगड तालुक्यात अतिवृष्टी; पाटगाव धरणात 

75 टक्के पाणीसाठा; सात बंधारे पाण्याखाली

गारगोटी : प्रतिनिधी

गेले चार दिवस भुदरगड तालुक्यात अतिवृष्टी पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पावसामुळे पाटगाव जलाशयात 75 टक्के पाणीसाठा झाला आहे. वेदगंगा नदीवरील सात बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तालुक्यात दहा घरांची अशंतः पडझड झाली आहे. ठिकठिकाणी झाडांच्या फांद्या विजेच्या तारेवर पडल्याने काही गावातील वीज गायब झाली आहे. 

भुदरगड तालुक्यात चार दिवस मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. वेदगंगा नदीचे पाणी गेल्या चार दिवसांपासून पात्राबाहेर असल्यामुळे नदी काठची पिके पाण्याखाली गेली आहेत. या पिकांना धोका निर्माण झाला आहे. वेदगंगा नदीवरील मानी, आनफ, शेळोली, आकुर्डे, म्हसवे, निळपण, वाघापूर हे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. म्हसवे बंधारा पाण्याखाली गेल्यामुळे या मार्गावरील मिणचे परिसरात होणारी वाहतूक बंद झाली आहे. आकुर्डे बंधारा पाण्याखाली गेल्यामुळे विजय मार्गावरील वाहातूक बंद झाली आहे. ठिकठिकाणी झाडांच्या फांद्या विजेच्या तारेवर पडल्याने काही गावांतील वीज गायब झाली होती. गारगोटीतील घोटणे पेट्रोल पंपाच्या पाठीमागील विजेच्या तारा तुटल्यामुळे हा परिसर रात्रभर अंधारात राहिला. 

पाटगाव येथील मौनी सागर जलाशयाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. 623.30 मीटर पाणी पातळी असून, 78.70 द.ल.घ.मी. पाणी साठा झाला आहे. पाटगाव धरण 75 टक्के  भरले आहे. गेल्या 24 तासांत तालुक्यात सरासरी 67.40 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पिंपळगाव परिसरात 71 मि.मी., कूर 11 मि.मी., कडगाव 95 मि.मी., करडवाडी 85 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. आकुर्डे येथील शशिकांत शंकर सुतार, मारुती नारायण सुतार, मोरेवाडी येथील विजय तात्यासो पाटील, पुष्पनगर येथील शिवाजीराव कालेकर, पाचर्डे येथील आनंदा कांबळे, वासनोली पैकी थड्याचीवाडी येथील धनाजी दत्तू ढेकळे, मठगाव येथील दत्तात्रय सोनवने, मडूर येथील मानसिंग नांदूलकर, मधुकर सुतार, फणसवाडी येथील हिंदुराव साळवी यांच्या घरांच्या भिंती पडून नुकसान झाले आहे. 

पन्हाळा तालुक्यात अनेक गावांचा संपर्क तुटला

पन्हाळा : प्रतिनिधी पन्हाळा तालुक्यात पडत असलेल्या मुसळधार पावसाने पन्हाळा पश्‍चिम भागात जनजीवन विस्कळित झाले असून, रस्त्यावर पाणी आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तालुक्यात गेल्या चोवीस तासांत 248 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पन्हाळा येथे 20 मि. मी. वाडी रत्नागिरी येथे 35 मि. मी. कोडोली येथे 10 मि मी. कळे 37 मि. मी. पडळ 41 मि.मी. बाजार भोगाव 85 मि.मी. कोतोली 37 मि.मी. तालुक्यात आज एकूण 37.86 मि.मी. सरासरी पावसाची नोंद झाली आहे. आजअखेर एकूण 3492 मि. मी. पाऊस पडला आहे. मुसळधार पावसाने मौजे सातवे येथे घराची पडझड होऊन पन्‍नास हजारांचे नुकसान झाले.

कासारी नदीने पाणी पातळीत वाढ होत असून, नदीकाठ धोक्याच्या पातळीकडे जात आहे.  यवलूज-पोर्ले,माजगाव-पोर्ले दरम्यान असणार्‍या पुलावर पुराचे पाणी आल्याने  वाहतूक बंद आहे, पाटपन्हाळा ता पन्हाळा  येथील पुलावर  पुराचे पाणी आले आहे. पाण्याची पातळी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे पाटपन्हाळा, मुगडेवाडी, पिसात्री, वाशी या गावांचा संपर्क गेल्या चार दिवसांपासून बाजारभोगाव पासून तुटलेला आहे. बाजारभोगाव ही मुख्य बाजारपेठ असल्याने  संपर्क तुटलेल्या गावांतील ग्रामस्थांनी जीवनावश्यक वस्तूंचा साठा केला आहे,  असे समजते. पुनाळ-तिरपण रस्त्यावर पुलाच्या दोन्ही बाजूस आलेल्या पाण्याच्या पातळीत वाढ होत असून, कळे-कोतोली वाहतूक पूर्णपणे बंद आहे. वाघवे पैकी उदाळवाडीत पावसाने विहीर कोसळली आहे. कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर लोंघे-किरवे दरम्यान पुराचे पाणी आल्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. वाढत असलेल्या पावसामुळे तालुक्यातील तलाठी, मंडल अधिकारी, कोतवाल, पोलिस पाटील, यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तहसीलदार कार्यालय पन्हाळा येथील आपत्ती व्यवस्थापन कक्ष चोवीस तास सुरू ठेवले असून तालुक्यात पावसाने काही अडचण निर्माण झाल्यास त्वरित 02328-235026 या दूरध्वनीवर संपर्क करावा, असे आवाहन प्रभारी तहसीलदार अनंत गुरव यांनी केले आहे.

बिद्री परिसरात 77.99 मि. मी. पाऊस

बिद्री : प्रतिनिधी

कागल तालुक्यातील पश्‍चिम भागातील बिद्री परिसरात गेल्या चार ते पाच दिवसांत जोरदार पावसाचा जोर वाढला आहे.  गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस कोसळत आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. यामुळे दूधगंगा नदीला पूर परिस्थिती नसली तरी दूधगंगेच्या पाणी पातळीत वाढ सोमवारी सायंकाळी पाणी पात्राबाहेर पडले आहे. 

बिद्री परिसरात चांगला पाऊस होत असून, आतापर्यंत 954. 87 मिलीमिटर पाऊस झाल्याची नोंद आहे. दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला असून बिद्री परिसरात सोमवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत 77.99 मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद आहे. त्याचबरोबर काळम्मावाडी व डोंगर माथ्यावर पर्जन्यमान वाढल्यामुळे दूधगंगा नदीला पूर परिस्थिती नसली  पाण्याची पातळी वाढून पाणी पात्राबाहेर पडले आहे. काळम्मावाडी धरणात पाणीसाठा केला जात असल्यामुळे दूधगंगा नदीत वीजगृहासाठी लागणारे तेवढेच पाणी धरणातून सोडले जाते. त्यामुळे पाण्याची पातळी फारशी वाढू शकली नाही. दूधगंगेवरील बाचणी येथील धरणावर पाणी आले असून येथील वाहतूक बंद आहे. बाकी धरणावरून वाहतूक सुरू आहे.

संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतीची कामे ठप्प झाली आहेत. तसेच नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने कामानिमित्त बाहेर जाणार्‍या नागरिकांना अडचणीचे झाले. ओढे-नाले पाण्याने भरून वाहत असल्यामुळे शाळा दुपारनंतर लवकर सोडण्यात आल्या. आठवडा बाजार असणार्‍या गावांत व्यापारीवर्गास व ग्राहकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. पावसाचा असाच जोर राहिला तर दूधगंगेलाही पूरपरिस्थिती निर्माण  होऊ शकते.