Thu, Jul 18, 2019 16:45होमपेज › Kolhapur › भावांनो... आपल्या भाषेत जादू हाय!

भावांनो... आपल्या भाषेत जादू हाय!

Published On: May 10 2018 1:35AM | Last Updated: May 10 2018 12:40AMकोल्हापूर : विजय पाटील 

अरे भावा... काय विशेष... बरा आहेस ना! असं बोललं की, हे शब्द आपोआप काळजात शिरतात. कारण, ही आपली भाषा आहे. मायबोली आहे; पण आपल्याकडे सर्रास हाय फ्रेंडस्, हाऊ आर यू! या... या... ओके... असं बोलणार्‍यांचे प्रमाण वाढताना दिसतं. चार-पाच मराठी माणसं एकत्र असली की, हमखास यातील एखादा बढाईखोर आव आणून इंग्लिश झाडण्याचा प्रयत्न करतोच. हे नित्याचे होत आहे. म्हणूनच मराठी भाषा जगावी आणि टिकावी म्हणून शासनाने मराठी भाषा सक्‍तीची केली, हे बरे झाले. या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत होतेय. अगदी ‘हिंग्लिश’ भाषा बोलणार्‍या समाज माध्यमांतूनही (सोशल मीडिया) या निर्णयाचे ‘आपल्या भाषेत ‘फिल’ आहे, या शब्दांत कौतुक सुरू आहे. 

मराठी भाषा 1,300 वर्षांहून अधिक काळ प्रचलित बोलीभाषा आहे. एखादी बोलीभाषा ही समृद्ध भाषा म्हणून निर्माण व्हायला शेकडो वर्षांचा कालखंड लागतो. साहित्य, कलेसह संतांची आणि समाजसुधारकांची मोठी परपंरा मराठीला लाभली आहे. त्यामुळे मराठीला फार मोठा वसा आणि वारसा आहे; पण दुसर्‍याचं ते उत्तम आणि आपलं ते देशी, अशी प्रवृत्ती अलीकडे वाढत चालली आहे. आपल्याकडच्या कोंबड्यापेक्षा चिनी आणि विदेशी कोंबड्या अनेकांना उगीचच भारी वाटतात. तर देशी कुत्र्यांपेक्षा जर्मन शेफर्ड, लॅब्रेडॉर असे परदेशी कुत्रे लोक मायेने पाळू लागले आहेत. आपलं ते बुरसट आणि कालबाह्य, असा काहींचा मोठा गैरसमज तयार झाला आहे. परकं म्हणजे ब्रँडेड अशा या आत्मघातकी वृत्तीचा परिणाम जसा भूमिपुत्रांच्या संस्कृतीवर होतोय, तसाच तो भाषेवरसुद्धा झाला आहे. मराठी भाषेला हेच मारक ठरत आहे. मराठी मुलखातच मराठी भाषा बचाव म्हणून चळवळ उभारण्यासारखे दुर्दैव दुसरे काय असू शकेल.

ज्ञानोबा-तुकोबांची, छत्रपती शिवरायांची ही भाषा अभिमानानेच बोलली पाहिजे. दुस-या बाजूला इतर भाषेंचाही तितकाच आदर ठेवायला हवा. कारण भाषा तयार झाली ती माणसे जोडण्यासाठी हे मर्म लक्षात ठेवायला हवे. हिंदी, इंग्रजी इतर भाषा या  ज्ञानभाषेत अग्रणी झाल्याने या भाषेसह इतर भाषाही गरजेप्रमाणे शिकल्या पाहिजेत याबाबत दुमत असण्याचे कारण नाही. कारण ती काळाची गरज आहे.  इतर भाषांचा वापर करुन प्रगती साधताना आपली आई असणारी मराठी भाषाही त्यातुलनेने अधिक श्रेष्ठ करत राहिले पाहिजे. 

समाज माध्यमांमुळे जगभरातील लहान भाषा नष्ट होत आहेत. एक भाषा नष्ट झाली की हजारो वर्षाचा मानवी इतिहास कायमचा संपतो हे वास्तव आहे. भाषा ही स्थानिक माती आणि मानवी नाती यांचा अजोड संगम असतो. त्यामुळं आता मराठी माणसांशी बोलताना उगीच आव आणून मराठी माणसाने इतर भाषा बोलायची गरज नाही. कारण मराठी माणूसच मराठी बोलणार हे समजून घ्यायला हवे. इंग्लड, अमेरिकेतील येऊन कोणी मराठी बोलणार नाही किंवा ही भाषा टिकवा म्हणणार नाही. त्यामुळे आपल्या पुर्वजांचा हा श्रींमत ठेवा आपण अधिक समृध्द करत राहू इतकाच यानिमित्तानं निर्धार करुया. कारण भावांनो...आपल्या भाषेतच जादू हाय! 

ही पहा श्रीमंती

वर्षाला आता शंभरावर मराठी चित्रपट निर्माण होतात. चांगल्या मराठी चित्रपटांचा व्यवसाय हा पंचवीस कोटींपासून शंभर कोटीपर्यंत जावून पोहचला आहे. देशात सर्वात जास्त नाटक मराठीतच तयार होतात आणि पाहिली जातात. बालसाहित्याच्या बाबतीत मराठी साहित्य देशात अग्रेसर आहे. अलीकडच्या हिंदी चित्रपट आणि डेलीसोप मालिकांचे निरीक्षण केले तर यामध्ये ‘मराठी’ला मानाचे पान दिले जात असल्याचे दिसते. यापूर्वी हे चित्र कधीही दिसले नाही. प्रचंड गाजलेल्या सिंघमच्या दोन्ही   चित्रपटात मराठी संस्कृती आणि भाषेचा खुलेआम वापर केला. बहुतेक हिंदी चित्रपटाची कथा ही मराठी कुटुंबाला केंद्रीभूत ठेवून दाखवण्याचे प्रमाण वाढले आहे. तेलगु, तमिळ चित्रपटांमध्ये तर महाराष्ट्राची संस्कृती दाखवण्याची चढाओढ दिसून येते.  परभाषिकांना मराठीहे अनिवार आकर्षन असताना आपल्या घरातही तीचा दणकेबाज सन्मान ठेवला पाहिजे. 

अभिमानाने बोला मराठी....

जागतिक क्रमवारीत  बोलणा-या भाषांमध्ये मराठी भाषा 15 व्या क्रमांकावर आहे. भारतात ती 4 थ्या क्रमांकाची बोलली जाणारी भाषा आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या बारा कोटी असून येथे दहा कोटींहून अधिक लोक मराठी बोलतात. गोव्यातही मोठ्या प्रमाणात मराठी बोलतात. बेळगांव, निपाणी, बिदरल भालकी आदी सीमाभागात तीस लाखांहून अधिक लोक मराठी बोलतात. मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर, देवास, इंदूर या परिसरातही मराठी भाषिकांचे प्रमाण मोठे आहे. कर्नाटकातील बंगळूरमध्ये मोठ्या संख्येने मराठी वसाहती आहेत. तामिळनाडूमधील तंजावरमध्ये मराठी भाषेचा अजूनही प्रभाव आहे. अलीकडे हरियाना राज्यातील सोनपत व पानिपत जिल्ह्यांतील रोड मराठा समुहाची महाराष्ट्रीयन ही ओळख पक्की झाली. येथे वीस लाखांहून अधिक रोड मराठा लोक राहतात. अलीकडे ही मंडळी अभिमानाने आपली भाषा म्हणून मराठी शिकत आहेत. भाषेची इतकी व्यापकता आहे तर मग महाराष्ट्रात तर अभिमानाने मराठी बोललं पाहिजे. 

सोशल मीडियावरूनही आवाहन

मराठी भाषिकांनी सोशल मीडियावर  कमेंट करताना किंवा लिहिताना आपल्या भाषेतच करावी, असे जाहीर आवाहन केले जात आहे. यासाठी सोपे फाँट सुचवले जात आहेत.