Wed, Jul 17, 2019 12:25होमपेज › Kolhapur › काय सांगताय, आंब्यामुळे मराठी वृत्तपत्राच्या रद्दीचा भाव वाढला!

काय सांगताय, आंब्यामुळे मराठी वृत्तपत्राच्या रद्दीचा भाव वाढला!

Published On: Apr 23 2018 1:14AM | Last Updated: Apr 23 2018 10:33AMकोल्हापूर : सुनील कदम

कोकण वगळता केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशाच्या अन्य कोणत्याही भागात पिकलेल्या आंब्याला यापुढे ‘हापूस’ हे नाव वापरता येणार नाही. तसा निर्वाळाच देशाच्या कंट्रोलर जनरल ऑफ पेटंट यांनी दिला असला तरी कर्नाटकातील बनेल आंबा व्यापार्‍यांनी आपल्या भागातील सरसकट आंबे मराठी वर्तमानपत्रांच्या रद्दीत गुंडाळून कोकणी किंवा कर्नाटकी हापूस म्हणून ग्राहकांच्या माथी मारण्याचा सपाटा लावल्याचे आढळून येत आहे. त्याचा परिणाम म्हणून कोकण किनारपट्टी भागात चक्‍क मराठी वर्तमानपत्रांच्या रद्दीचा भाव भलताच वधारला आहे. कर्नाटकातील व्यापार्‍यांनी चालविलेली ही बनवाबनवी सरळ सरळ विक्रेता कायद्याला हरताळ फासणारी आहे.

हापूस या नावाबद्दल गेल्या काही वर्षांपासून देशाचे कंट्रोलर जनरल ऑफ पेटंट यांच्यापुढे परस्परविरोधी वाद सुरू आहेत. कोणत्या आंब्याला हापूस म्हणायचे, अशा स्वरूपाचा हा वाद आहे. त्यावर नुकताच निर्णय होऊन कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर आणि ठाणे या पाच जिल्ह्यांतच पिकणार्‍या आंब्याला यापुढे हापूस म्हणून संबोधता येईल, असा निर्वाळा कंट्रोलर जनरल यांनी दिलेला आहे. हापूस आणि कोकण यांचे नाते अगदी पुरातन स्वरूपाचे आहे. कोकण किनारपट्टीवरील विशिष्ट भागात पिकणार्‍या आंब्यालाच पूर्वीपासून अगदी सातासमुद्रापारपर्यंत हापूस म्हणून मान्यता आहे. मात्र, गेल्या जवळपास दहा-बारा वर्षांपासून कर्नाटक, तामिळनाडूसह देशाच्या अन्य काही भागातील आंबे त्या त्या भागातील ‘हापूस’ या नावाने बाजारात येऊ लागले आहेत. त्यामुळे ग्राहक मात्र संभ्रमात पडताना दिसत आहेत. याबाबत  कंट्रोलर जनरल ऑफ पेटंट यांनी निर्वाळा देऊन एकदाचा हा वाद संपुष्टात आणला आहे.

मात्र, कर्नाटकी आणि अन्य भागातील कोणतेही आंबे हापूस म्हणून ग्राहकांच्या माथी मारायला सोकावलेल्या त्या त्या भागातील बनेल व्यापार्‍यांनी यंदापासून एक भलतीच हातचलाखी सुरू केल्याचे दिसत आहे. कर्नाटकसह अन्य भागातून येणारे  हे असले बनावट हापूस प्रामुख्याने मराठी वर्तमानपत्रांच्या रद्दीत गुंडाळून बाजारात आणले जात आहेत. त्याहूनही विशेष म्हणजे त्यासाठी मराठी वर्तमानपत्रांची रद्दीसुद्धा प्रामुख्याने कोकण किनारपट्टीच्या भागातूनच खरेदी केली जात आहे, जेणेकरून या रद्दीतसुद्धा कोकणचे प्रतिबिंब उमटलेले ग्राहकांना बघायला मिळेल आणि हा कोकणातून आलेला हापूस आंबाच आहे, अशी ग्राहकाला खात्री वाटावी. बाजारात अनेक ग्राहक या हातचलाखीला बळी पडताना दिसत आहेत.

आज बाजारात अस्सल आणि जातिवंत हापूस आंब्याचे डझनाचे दर  400 रुपयांपासून ते 1200 रुपयांपर्यंत  आहेत. तर ‘कर्नाटकी हापूस’ म्हणून बाजारात मिरवणार्‍या काही आंब्यांचे डझनाचे दर 300 रुपयांपासून 700 रुपयांपर्यंत आहेत. मात्र, या कर्नाटकी आंब्यालाच काही बनेल व्यापार्‍यांनी  मराठी रद्दीचा ‘हापूस मुलामा’ दिल्याचे दिसत आहे. याबाबत व्यापार नियंत्रकांनी आणि स्थानिक बाजार समित्यांनीही कारवाई करण्याची गरज आहे.

असा ओळखा खरा हापूस!

जातिवंत हापूस आंब्याचा रंग हा केशरी असतो, अन्य आंबे हे साधारणत: लाल-पिवळवर असतात. हापूस आंब्याचा टोकाकडील भाग हा गोल असतो तर अन्य आंब्यांचा हा भाग निमुळता असतो. देठाच्या ठिकाणी काहीसा खोलगट भाग दिसून येतो. देठाजवळ वास घेतला की त्याच्या चवीचा छान सुगंध येतो. आंब्यामध्ये धागे किंवा केसरे नसतात.

रद्दीचा भाव वधारला!

आजकाल मराठी वर्तमानपत्रांच्या रद्दीचा भाव प्रतिकिलो 15 रुपयांच्या आसपास आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून प्रामुख्याने कोकण किनारपट्टी भागात या रद्दीचा भाव सरासरीपेक्षा दुपटी-तिपटीवर गेल्याचे दिसून येत आहे. कर्नाटकी आंब्याला ‘हापूसचा मुलामा’ देण्यासाठी या रद्दीचा वापर होत असल्यामुळे त्याचा दर वधारल्याचे आढळून येत आहे.

Tags : Belgaum, Marathi, Mache, Karnataka, mangoes