Wed, Jul 17, 2019 10:07होमपेज › Kolhapur › मराठा तरुणांना बिनव्याजी कर्ज मिळणार कधी?

मराठा तरुणांना बिनव्याजी कर्ज मिळणार कधी?

Published On: Apr 19 2018 1:35AM | Last Updated: Apr 18 2018 10:49PMकागल : बा. ल. वंदूरकर

राज्यभर प्रचंड मोठ्या प्रमाणात मराठा क्रांती मोर्चे निघाले. या मोर्चांच्या मागणीची दखल घेऊन राज्य शासनाने मराठा सुशिक्षित बेरोजगार तरुणांना स्वयंरोजगारासाठी आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत वैयक्‍तिक बिगरव्याजी कर्ज योजना जाहीर केली. मात्र, या योजनेविषयी अद्याप राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखांना वरिष्ठ कार्यालयाकडून कोणत्याही प्रकारच्या सूचना किंवा मार्गदर्शन अद्याप आले नसल्यामुळे शहर व तालुक्यातील मराठा बेरोजगार तरुणांना योजनेचा लाभ मिळेनासा झाला आहे. बँकांमध्ये चौकशी करून तरुण हिरमुसले होऊन परत फिरत आहेत. त्यांच्यामध्ये नाराजी निर्माण होत आहे.

संपूर्ण राज्यभर 58 मराठा क्रांती मोर्चे निघाले. या मोर्च्यांमुळे मराठा समाजामध्ये मोठ्या प्रमाणात जागरूकता निर्माण झाली. त्यामुळेच स्वयंरोजगारासाठी वैयक्‍तिक बिगरव्याजी कर्ज परतावा योजना जाहीर केली. मात्र, पुढे बँकांना यांची माहितीच देण्यात आली नाही.

शासनाच्या घोषनेनुसार कर्ज मागणीसाठी मराठा बेरोजगार तरुण बँकेच्या कार्यालयात जातात तेव्हा त्यांना अशी कोणत्याही प्रकारची योजना अद्याप आपल्याकडे आली नाही किंवा वरिष्ठ कार्यालयाकडून गाईडलाईन्सदेखील आलेले नाहीत, असे स्पष्ट सांगितले जात आहे.शासनाने मुद्रा कर्ज योजना जाहीर केली. त्याच्या नियम आणि अटी आल्या आहेत. इतर महामंडळांच्या कर्ज योजनेबाबतदेखील माहिती आली आहे. मात्र, या महामंडळाच्या नियम आणि अटी कधी येणार याकडे तरुणांचे लक्ष वेधून राहिले आहे. मुद्रा कर्ज योजनेमधून परतफेड करणार्‍यांना मोठ्या प्रमाणात कर्जपुरवठा केला जात आहे. मात्र, त्यांचा पुरेपूर लाभ उठविण्याची गरज आहे.  

10 लाखांपर्यंत कर्जाची तरतूद 

या योजनेअंतर्गत मराठा बेरोजगार तरुणांना 10 लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज देण्याची तरतूद आहे. याचे व्याज शासन भरणार आहे; परंतु या योजनेची माहिती व नियमांचे पत्रकच अद्याप उपलब्ध झाले नाही. त्यामुळे राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखांचे अधिकारी, कर्मचारी याबाबत अनभिज्ञ आहेत. काही बँकांच्या शाखांमध्ये तरुण मुले कर्ज मागणीसाठी जात असतात. माहिती मागतात. मात्र, अशा प्रकारच्या कर्जाची माहिती आपल्याकडे अद्याप उपलब्ध झाली नसल्याचे सांगण्यात येते.