Fri, Jul 19, 2019 05:43होमपेज › Kolhapur › मराठा आरक्षणासाठी टेंबलाईला साकडे

मराठा आरक्षणासाठी टेंबलाईला साकडे

Published On: Aug 04 2018 1:34AM | Last Updated: Aug 04 2018 12:10AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

‘एक मराठा, लाख मराठा... मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे... आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं... जय जिजाऊ-जय शिवराय...’ या घोषणांना शुक्रवारी पीऽ ढबाक्सह हलगी-घुमके-कैचाळीसह ‘टेंबलाई देवीच्या नावानं चांगभलं...’ या घोषणेची साथ मिळाली. कोल्हापूरचे ग्रामदैवत असणार्‍या त्र्यंबोली तथा टेंबलाई देवीच्या यात्रेनिमित्त मराठा समाजाला तातडीने आरक्षण मिळू दे, असे साकडे घालण्यात आले. सजविलेल्या कळशांमधून देवीच्या चरणी वाहण्यासाठी नदीचे नवे पाणी घेऊन महिला-मुलीही आंदोलनस्थळी आल्या होत्या.    

ऐतिहासिक दसरा चौकात आरक्षणाचे जनक लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मारकाच्या साक्षीने गेल्या दहा दिवसांपासून सुरू असणार्‍या सकल मराठा क्रांती ठोक ठिय्या आंदोलनास त्र्यंबोली यात्रा साजरी करणार्‍या तालीम-संस्था-तरुण मंडळांनीही पाठिंबा दिला. टेंबलाई यात्रेनिमित्त निघणार्‍या नव्या पाण्याच्या मिरवणुकीसह तालीम-मंडळांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. 

दरम्यान, शुक्रवारी सकाळपासूनच जिल्हाभरातून ग्रामीण भागातील लोक आपापले व्यवहार बंद ठेवून कोल्हापुरात दाखल होत होते. दुचाकी-चारचाकी वाहनांतून आबालवृद्ध, महिला, तरुण यांचा सहभाग प्रत्येक मोर्चात होता. भगवे ध्वज, आरक्षणाच्या मागणीचे फलक घेऊन लोक दसरा चौकात येऊन ठिय्या आंदोलनात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत होते.  

सोमवार पेठेतील कै. नारायणराव मेढे तालमीसह लहान-मोठ्या तालीम-मंडळांनी त्र्यंबोली यात्रेची मिरवणूक आंदोलनस्थळाकडे वळवली होती. राजर्षी शाहू स्मारकाला अभिवादन करून त्यांनी आंदोलनाला आपला पाठिंबा दिला. ‘टेंबलाई देवीच्या नावानं चांगभलं...’ या घोषणेबरोबरच आरक्षणाच्या घोषणाही त्यांनी दिल्या. यामुळे धार्मिक परंपरेला सामाजिक कार्याची जोड मिळाल्याचे चित्र निर्माण झाले होते. जाती-धर्म भेदभाव विसरून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी बहुजन समाज आणि मुस्लिम धर्मीय बांधवांनीही ठिय्या आंदोलनात आवर्जून सहभाग घेतला. 

प्रत्येक नागरिकाच्या संबंधित असणारा नोटाबंदीचा निर्णय शासनाने तातडीने घेतला. मग बहुसंख्येने असणार्‍या महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाला विलंब का? अनेक वर्षे सुरू असणार्‍या लढ्याची दखल घेऊन सरकार निर्णय घेणार का? असे सवाल   नागरिकांनी व्यक्त केले.