होमपेज › Kolhapur › हुपरीत रास्ता रोको; कडकडीत बंद

हुपरीत रास्ता रोको; कडकडीत बंद

Published On: Aug 10 2018 12:57AM | Last Updated: Aug 09 2018 11:28PMहुपरी : वार्ताहर

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आज हुपरी शहर कडकडीत बंद ठेवून प्रचंड मोर्चा काढण्यात आला. आरक्षणासाठी निष्क्रीय ठरलेल्या आमदार, खासदार बकरी बनून मोर्चात सहभागी झाल्याची घोषणा करून त्यांचा अनोख्या पद्धतीने निषेध करण्यात आला. दोन तास रास्ता रोको करून ठिय्या आंदोलनही करण्यात आले. भर पावसात चिटणीस चौकात ठिय्या मारून तेथे सामुदायिक जेवण करण्यात आले. आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी शासनाला सुबुद्धी द्यावी, यासाठी काही दिवसात सामुदायिक महायज्ञ आयोजित केला जाणार असल्याची माहिती अध्यक्ष नेताजी निकम, विनायक विभुते यांनी दिली. 

सकाळपासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ मोठ्या संख्येने मराठा बांधव भगवे ध्वज घेऊन जमू लागले. त्याठिकाणी जय भवानी, जय शिवाजी, एक मराठा, लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, अशा घोषणा देत मोर्चाला प्रारंभ झाला. आमदार, खासदारांना मेंढरं व बकर्‍यांच्या रूपात मोर्चात सहभागी करून घेऊन अनोखा निषेध करण्यात आला. प्रचंड घोषणा देत हजारोंच्या संख्येने आंदोलक जुन्या बसस्थानकाजवळ आले. तिथे रास्ता रोको करण्यात आला. 

यावेळी नगराध्यक्षा सौ. जयश्री गाठ, उपनगराध्यक्ष जयकुमार माळगे, पक्षप्रतोद भरत लठ्ठे, बांधकाम सभापती सौ. सुप्रिया पालकर, महिला बालकल्याण सभापती सौ. अनिता मधाळे, नगरसेविका सौ. पूनम पाटील सौ. लक्ष्मी साळोखे, जि. प. सदस्या सौ. स्मिता शेंडुरे, अण्णासाहेब शेंडुरे, शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव,  नेताजी निकम, माजी जि. प. अध्यक्ष नानासाहेब गाठ,  अमित नरके, बाळासाहेब खैरे, राहुल मोरबाळे, बाळासाहेब गायकवाड, ता. पं. सदस्य किरण कांबळे, माजी सरपंच दिनकरराव ससे व नागरिक उपस्थित होते.