Fri, Jul 19, 2019 17:44होमपेज › Kolhapur › मराठा आरक्षण दहा दिवसांत देता येईल

मराठा आरक्षण दहा दिवसांत देता येईल

Published On: Aug 25 2018 1:14AM | Last Updated: Aug 25 2018 12:59AMकोल्हापूर : प्रतिनिधी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनात आणले तर दहा दिवसांत मागासवर्ग आयोगाचा अहवाल जाहीर करता येईल. तसेच आरक्षणासाठी घटनादुरुस्तीसुद्धा केंद्र सरकार सात दिवसांत करू शकते. कारण मराठा आरक्षणाला कुणाचाच विरोध नाही. त्यामुळे दहा दिवसांत मराठा समाजाला  आरक्षण देता येईल. परंतु, जशी काँग्रेस-राष्ट्रवादीने मराठा आरक्षणाची क्रूर चेष्टा केली. त्याचप्रमाणे भाजप सरकारसुद्धा आरक्षणाबाबत जाणीवपूर्वक चालढकल करत असल्याचा आरोप आम आदमी पार्टीचे राज्याध्यक्ष ब्रिगेडीयर सुधीर सावंत यांनी शुक्रवारी केला. 

मुस्लिम बोर्डिंग येथे पत्रकार परिषदेत सावंत बोलत होते.  ते म्हणाले, देशात आता जाती-धर्माच्या नावावर दंगली घडवण्याची फॅशन बनविली जात आहे. सरकार आरक्षणाच्या नावावर लोकांच्यात संघर्ष निर्माण करत आहे. लोकांचे लक्ष जाती-धर्माकडे वळवले जात आहे. त्यामुळेच राफेल घोटाळ्यासारख्या घटनांकडे दुर्लक्ष झाले आहे. काँग्रेस पन्नास वर्षे सत्तेत असताना त्यांनी आरक्षण दिले नाही. आता मागील चार वर्षांपासून भाजप सरकारही फसवणूक करत आहे. मराठा, लिंगायत समाजासह सर्वच समाजांना आरक्षण मिळू शकते. 

मराठा आरक्षणासाठी नोव्हेंबर महिना कशासाठी? असा सवाल करत सावंत म्हणाले, सरकारला आरक्षण द्यायचेच नाही. नोव्हेंबर महिन्यांत दुसराच विषय निर्माण केला जाईल. जसे यापूर्वीच्या सरकारने नारायण राणे यांच्या खोट्या अहवालाच्या माध्यमातून आरक्षण देऊन फसवणूक केली. कारण ते आरक्षण अडकले. तसेच भाजप सरकारही करेल, असे वाटते. मागासवर्ग आयोगाचा अहवाल तत्काळ जाहीर करावा.  यानंतर राज्य सरकारने केंद्र सरकारकडे आरक्षणाच्या घटनादुरुस्तीसाठी प्रस्ताव पाठवावा. भाजपचे केंद्रात स्पष्ट बहुमत असल्याने घटनादुरुस्ती करता येईल. यावेळी इंद्रजित सावंत, वसंत मुळीक, दिलीप देसाई, सचिन तोडकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.