Sat, Sep 22, 2018 07:47



होमपेज › Kolhapur › मराठा समाजाने शांततेने सनदशीर मार्गाने लढा द्यावा

मराठा समाजाने शांततेने सनदशीर मार्गाने लढा द्यावा

Published On: Jul 26 2018 1:33AM | Last Updated: Jul 26 2018 1:19AM



कोल्हापूर : प्रतिनिधी

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाचे आंदोलन सुरू आहे आणि दोन दिवसांपासून त्याचा वणवा राज्यभर पसरला आहे. या आंदोलनादरम्यान मराठवाड्यातील गंगापूर तालुक्यात कायगाव टोका येथे काकासाहेब शिंदे या तरुणाचा बळी गेला, ही अत्यंत दु:खद घटना आहे. मराठा क्रांती मोर्चाने शिस्तीचा, संयमाचा एक आदर्श घालून दिला. मराठा समाजाने सनदशीर मार्गाने केलेल्या या शक्‍तिप्रदर्शनाची सरकारने योग्य दखल घेतली नाही. मराठा समाजाच्या भावना समजून घेण्यात सरकार कमी पडले, त्यामुळेच आंदोलनाला आजचे आक्रमक स्वरूप प्राप्‍त झाले आहे. मराठा समाजाने आपल्या मागण्यांसाठी सरकारशी संघर्ष करायलाच हवा. परंतु, त्यासाठी सनदशीर मार्गाने लढा द्यायला हवा, असे आवाहन करणारे निवेदन प्राचार्य एन. डी. पाटील, उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी. एन. देशमुख, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार आदी मान्यवर, विचारवंतांनी प्रसिद्धीस दिले आहे.

न्यायालयीन पातळीवर अधिक नियोजनबद्धरीतीने लढण्याची गरज आहे. अ‍ॅट्रॉसिटीचा मुद्दा काढून मराठा-दलितांमध्ये, तसेच आरक्षणाच्या निमित्ताने मराठा-ओबीसींमध्ये तेढ वाढवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. त्यापासून सावध राहिले पाहिजे, नाहीतर महाराष्ट्राचे सामाजिक स्वास्थ्य बिघडवल्याचे पातक मराठा समाजाच्या माथी येईल.आर्थिक विपन्‍नावस्थेत ढकलल्या गेलेल्या मराठा समाजाला बाहेर काढण्यासाठी सरकारने मदतीचा हात दिलाच पाहिजे. त्यासाठी आरक्षणाची लढाई लढली पाहिजे. परंतु, चुकीच्या मुद्द्यावर लढाई लढणे म्हणजे स्वत:च्या भवितव्याशी खेळण्यासारखे आहे. मराठा समाजाच्या तरुणांमध्ये प्रचंड ऊर्जा आहे आणि त्या ऊर्जेचा वापर रचनात्मक कामासाठी व्हायला हवा. आपण छत्रपती शिवरायांचे मावळे म्हणवून घेतो, तर आपल्या हक्‍काची लढाई आपल्यालाच लढायची आहे. जलसमाधी, आत्मदहन यासारखे मार्ग अवलंबून आपल्याला ही लढाई अखेरपर्यंत नेता येणार नाही आणि हिंसक आंदोलनाच्या माध्यमातूनही ध्येयापर्यंत पोहोचता येणार नाही, असे निवेदनात म्हटले आहे.

आंदोलनाला हिंसक वळण लागले, तर तो कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न बनतो आणि मग सरकारचे काम सोपे होते. आत्मघातकी मार्ग पत्करून ध्येयापर्यंत पोहोचता येणार नाही. गावगाड्यातील दलित, ओबीसी बांधवांना सोबत घेऊनच मराठा समाजाने व्यवस्था परिवर्तनाच्या लढाईसाठी जोमाने सज्ज झाले पाहिजे. अंतिमतः विजय आपलाच असेल, असे निवेदनात म्हटले आहे.

ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे, कष्टकरी चळवळीचे नेते डॉ. भारत पाटणकर, बीव्हीजी ग्रुपचे चेअरमन हनुमंत गायकवाड, ज्येष्ठ कवी डॉ. विठ्ठल वाघ , ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे,  माजी कुलगुरू डॉ. सुधीर गव्हाणे, अभ्यासक आणि वक्‍ते श्रीमंत कोकाटे, नाटककार जयंत पवार, अभिनेते सयाजी शिंदे, प्रकल्पग्रस्तांचे नेते संपत देसाई, नाटककार संतोष पवार, सामाजिक कार्यकर्त्या मेघा पानसरे, पत्रकार प्रताप आसबे, ज्ञानेश महाराव, विजय चोरमारे आदींचा निवेदन प्रसिद्ध करणार्‍यांत समावेश आहे.