होमपेज › Kolhapur › मराठा समाजाची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन

मराठा समाजाची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन

Published On: Jul 26 2018 1:33AM | Last Updated: Jul 26 2018 12:09AMकोल्हापूर : प्रतिनिधी

मराठा संघटना गेली 37 वर्षांपासून न्याय हक्‍कासाठी संघर्ष करत आहे. गेल्या 10 वर्षांपासून या लढ्याचे स्वरूप व्यापक होत आहे. कोपर्डीच्या घटनेमुळे महाराष्ट्र जागृत झाला आणि राज्यात मराठा संघटनांचे 58 मोर्चे निघाले; पण शासन जागे झाले नाही, म्हणून आज मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. शासनाने याची गंभीर दखल घ्यावी, अन्यथा व्यापक आंदोलन करू, असा इशारा मराठा संघटनांच्या वतीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आला. आरक्षण मागणीवरून मराठा युवकांनी आत्महत्या करू नये, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. 

मराठा संघटनांच्या वतीने यापूर्वी स्वर्गीय विलासराव देशमुख, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे यांच्याशी अनेक बैठका घेतल्या. कोल्हापुुरात गोलमेज परिषद आयोजित करून शासनाने मराठा समाजासाठी जाहीर केलेल्या योजना फसव्या आहेत, हे जनतेच्या लक्षात आणून दिले. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांना 16 टक्के  आरक्षण देऊ असे जाहीर केले आहे. पण त्यासाठी कोणताही आधार दिलेला नाही? आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातर्फे मराठा युवकांसाठी जाहीर केलेल्या योजनेतील कर्ज मंजूर झालेली नाहीत. यामुळे मराठ्यांचा सयम सुटत चालला आहे. 

येणार्‍या काळात शासनाने धोरण बदलणे गरजेचे आहे. त्यासाठी मराठ्यांच्या सर्व संघटना मिळून प्रयत्न करू, असेही यावेळी सांगण्यात आले. पत्रकार परिषदेला राजू सावंत, प्रा. मधुकर पाटील, बाळ घाटगे, बाबा महाडिक, फत्तेसिंह सावंत, विक्रम जरग, भरत पाटील, संपत चव्हाण-पाटील, सौ. दिपा पाटील, सौ. सुवर्णा मिठारी, प्रकाश सरनाईक, अवधूत अपराध, रोहित मोरबाळे, चंद्रकांत पाटील, रंगराव तोरस्कर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री, महसूलमंत्र्यांनी माफी मागावी

मराठा समाज संघटनांच्या वतीने सुरू केलेल्या आंदोलनाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जी वक्‍तव्ये केली त्यामुळे मराठा समाज दुखावला जात असून त्यांनी मराठ्यांची जाहीर माफी मागावी, अशी मागणीही पत्रकार परिषदेत करण्यात आली.