होमपेज › Kolhapur › मराठा सेवा संघ लिंगायत समाजाच्या पाठीशी : अ‍ॅड. खेडेकर

मराठा सेवा संघ लिंगायत समाजाच्या पाठीशी : अ‍ॅड. खेडेकर

Published On: Aug 21 2018 1:36AM | Last Updated: Aug 21 2018 1:28AMकोल्हापूर : प्रतिनिधी

लिंगायत धर्माला शासनाकडून संविधानिक मान्यता मिळावी, या मागणीसाठी मराठा सेवा संघाच्या वतीने 20 वर्षांपूर्वी समर्थन दिले आहे. या आंदोलनात संपूर्ण ताकदीनिशी पाठीशी राहू, असा विश्‍वास मराठा सेवा संघाचे संस्थापक अ‍ॅड. पुरुषोत्तम खेडेकर यांनी व्यक्‍त केला. बहुजन समाजातील महत्त्वाचा घटक म्हणजे लिंगायत समाज होय. लिंगायत समाजाच्या प्रत्येक प्रश्‍नात मराठा सेवा संघ त्यांच्या पाठिशी राहिला आहे, यापुढेही लिंगायत धर्माला शासनाकडून मान्यता मिळेपर्यंत पाठीशी राहू असेही त्यांनी सांगितले.  

लिंगायत समाजाला केंद्र शासनाने संविधानिक धर्माचा दर्जा द्यावा, तसेच अल्पसंख्यांकांचा दर्जा द्यावा, यासह अन्य मागण्यांसाठी राज्य लिंगायत संघर्ष समिती व कोल्हापूर जिल्हा लिंगायत समाज संघटनांच्या वतीने येथील दसरा चौकात बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. आंदोलनाचा सोमवारचा 6 वा दिवस होता. आंदोलनास राज्यातून पाठिंब्याचा ओघ सुरू राहिला. सोमवारी नाशिक, नंदूरबार, धुळे, जळगाव, अहमदनगर या उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांतील लिंगायत संघर्ष समितीच्या कार्याकर्त्यांनी कोल्हापुरात येऊन पाठिंबा दिला. 

दरम्यान, सोमवारी सकाळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी आंदोलनाच्या ठिकाणी येऊन पाठिंबा दिला. तसेच मुस्लिम समाजातील कार्यकर्ते आणि मुस्लिम बोर्डिंगचे पदाधिकार्‍यांनी लिंगायत समाजाच्या आंदोलनास पाठिंबा दिला. यावेळी मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर, कादर मलबारी, रफिक शेख, बापूसाहेब मुल्‍ला, हमीद महात, हमजेतखान शिंदी आदी उपस्थित होते. 

संघर्ष समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर दंदणे म्हणाले, लिंगायत समाजाच्या मागण्यांसाठी गेली सहा दिवस आंदोलन सुरू आहे. शासनाने या आंदोलनाची दखल घ्यावी, अशी आमची अपेक्षा आहे. जर आंदोलनाची दखल न घेतल्यास राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समितीच्या कार्याध्यक्षा सरलाताई पाटील, व समन्वयक काका कोयटे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दंदणे यांनी दिला.

आंदोलनात संघर्ष समितीच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. सुशीलाताई आंधळकर, ज्ञानेश्‍वरआप्पा खर्डे, भगवान तिळकरी, देवीदास उंचे, राजेश कोठाळे (औरंगाबाद), सदाशिव तुपद, जगदिश घोडके, राजेश डोंबरे, अंबादास आंदळकर (नाशिक), धुळ्याचे दिनेश डोंबरे  आदी सहभागी झाले होते.