होमपेज › Kolhapur › मराठा आरक्षण : चार सप्टेंबरला मुंबईला धडक

मराठा आरक्षण : चार सप्टेंबरला मुंबईला धडक

Published On: Aug 23 2018 1:27AM | Last Updated: Aug 23 2018 1:25AMकोल्हापूर : प्रतिनिधी

मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात 31 ऑगस्टपर्यंत विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवा. त्यात आमच्या मागण्या असल्याचे जाहीर करा; अन्यथा 4 सप्टेंबर रोजी पश्‍चिम महाराष्ट्रासह राज्यातील मराठा बांधव वाहनांसह मुंबईला धडकतील, असा इशारा आज, बुधवारी पश्‍चिम महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आला. मुंबईत गेट वे ऑफ इंडियाजवळ ठाण मांडू, असेही यावेळी सांगण्यात आले.

मार्केट यार्ड परिसरातील मुस्कान लॉन येथे पश्‍चिम महाराष्ट्रातील सकल मराठा समाजातील प्रमुखांची बैठक झाली. त्यानंतर इंद्रजित सावंत यांनी बैठकीतील माहिती पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, आजच्या बैठकीत विविध 19 ठराव करण्यात आले. सरकारने मराठ्यांना आरक्षण देण्यासंदर्भात 31 ऑगस्टपर्यंत विशेष अधिवेशन बोलवण्याची अधिसूचना जाहीर करावी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आरक्षण देण्याबाबत जी वक्‍तव्ये बाहेर केलीत, त्याचीच घोषणा विधानसभा सभागृहात करावी; अन्यथा चार सप्टेंबरपासून पश्‍चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाचे बांधव वाहनांनी मुंबईला जातील. त्यानंतर मुंबईत जे काय होईल, त्या परिणामाची जबाबदारी सरकारची असेल. हे आंदोलन अहिंसक असेल, कोणतीही तोडफोड किंवा दगडफेक होणार नाही; पण मागण्या मान्य होईपर्यंत आमचा मुंबईत ठिय्या असेल.

ते म्हणाले, सुरुवातीला आरक्षण आम्ही देऊ शकत नाही, असे म्हणणारे राज्यकर्ते नंतर ते देऊ, असे म्हणू लागले. आता राज्य मागासवर्ग आयोगाची ढाल करून शासन समाजाला फसवत आहे. आयोगाच्या अहवालानंतर आरक्षण देऊ, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे; पण आरक्षण कशा पद्धतीने देणार ते सांगत नाहीत. आता आमच्याकडेही तज्ज्ञ, अभ्यासू मंडळी आहेत. त्यामुळे आम्ही आता तहात हरण्याची शक्यता नाही. ओबीसीतूनच आम्हाला आरक्षण मिळाले पाहिजे. शासन व आयोगाने समाजातील तरुणांच्या आत्महत्या बघत बसू नये, तातडीने आपला अहवाल दिला पाहिजे.

दिलीप देसाई म्हणाले, मुंबईला जाणार; पण सरकारशी चर्चा करणार नाही. सरकारने आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी अनेक मार्ग अवलंबले; पण समाजाची वज्रमूठ घट्ट असून, शेवटच्या श्‍वासापर्यंत कोणत्याही आमिषाला समाजातील लोक बळी पडणार नाहीत. मराठा महासंघाचे अध्यक्ष वसंत मुळीक म्हणाले, युद्धावर जाणार्‍या योद्ध्यांची जबाबदारी त्यांच्या घरातील महिला घेत होत्या, त्याप्रमाणे कोल्हापुरातील आमच्या आंदोलनाची जबाबदारी आमच्या घरातील महिला घेतील. आरक्षण मिळेपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार.

कोल्हापुरातून 4 सप्टेंबरला किमान 1 हजार वाहने मुंबईला जातील, असे हर्षल सुर्वे म्हणाले. मराठा बांधवांसाठी पाच ट्रकची व्यवस्था करण्याचे आश्‍वासन राजारामपुरीतील संजय जाधव यांनी दिले. यावेळी नगरचे नानासाहेब घाटे, सांगलीचे प्रवीण पाटील, वाईचे किरण खामकर यांनी आपल्या जिल्ह्यातून जास्तीत जास्त लोक यात सहभागी करू, असे आश्‍वासन दिले.

बैठकीला अ‍ॅड. गुलाबराव घोरपडे, सचिन तोडकर, किशोर घाटगे, स्वप्निल पार्टे, सांगलीच्या प्रज्ञा पाटील, नगरचे धनराज राणे, अ‍ॅड. दीपक भोसले, सातार्‍याचे निखिल जाधव आदी उपस्थित होते.