Tue, Jul 23, 2019 06:48होमपेज › Kolhapur › आरक्षण घेतल्याबिगर थांबायचं नाय

आरक्षण घेतल्याबिगर थांबायचं नाय

Published On: Aug 10 2018 12:57AM | Last Updated: Aug 10 2018 12:12AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

‘हक्‍कासाठी मराठ्यांनो, आज लढायचं... आरक्षण घेतल्याबिगर थांबायचं नाय...’ अशा शाहिरी कवणांतून आणि ‘या या सरकारनं बरं नाही केलं गं बया...मराठ्यांना फसवलं गं बया....’ अशा भारूड गीतातून मराठा आरक्षण आंदोलनाची धार अधिक तीक्ष्ण केली. ऐतिहासिक दसरा चौकात आरक्षणाचे जनक लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मारकाच्या साक्षीने ‘शाहूनगरी’ कोल्हापुरात गेल्या 15 दिवसांपासून सकल मराठा आरक्षण ठोक मोर्चातर्फे ठिय्या आंदोलन सुरू आहे. या अंतर्गत क्रांतिदिनी (गुरुवारी) झालेल्या मराठा आरक्षण सभेत स्फूर्तीदायी पोवाड्यांमुळे वातावरण निर्मिती झाली. 

शिवाशाहीर दिलीप सावंत, रंगराव पाटील, आझाद नायकवडी आणि त्यांच्या सहकायार्‍यांनी डफ-तुणतुणं, टाळ-दिमडी यासह सूरकर्‍यांच्या साथीने विविध विषयांवरील कवणं आणि भारूडाचे सादरीकरण करून उपस्थितांत स्फूर्ती निर्माण केली. 

राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. शाहीर आझाद नायकवडी यांनी ‘हिरे माणके सोने उधळा.. जय जय कार करा जय राजर्षी शाहू राजा तुजला हा मुजरा...’, ‘जय-जय महाराष्ट्र माझा...’ या गीतांचे सादरी करण केले. शाहीर दिलीप सावंत यांनी, ‘चार वर्ष झालं, फसवतया शासन, अश्‍वासन देऊन करतया आमचं शोषण...58 मोर्चांना ठेग्गा त्यांनी दावून, मराठा आरक्षण दिलंय कोर्टात ढकलून...’, ‘तुम्ही -आम्ही शिवबांचे वीर सच्चे मावळे, मराठ्यांनो हक्‍कासाठी एक होऊया सगळे, लबाड फसवणारे सरकार बगळे.... संयमाचा बांध मराठ्यांचा फुटला रं, आरक्षणापायी बांधव बळी गेला रं...शपथ शिवबाची आता कोण नाही मरणार, मरण बास आता माराय शिकायचं... आरक्षण घेतल्याबिगर नाही थांबायचं’, या ‘मराठा आरक्षण गीतातून’ शाहिरी जागर केला.

‘दोन महिन्यांची चार वर्षे झाली, आरक्षण कोर्टात अडकवलं, नोटाबंदी करताना ना विचारलं जनतेचं रिकाम खिसं केलं... आंदोलन गुंडाळायचंं स्वप्न यांनी पाहिलं यांच्या स्वप्नांचा चुरा झाला गं बया मराठ्यांना फसवलं ग बया...’ अशा शब्दात शाहीर दिलीप सावंत यांनी लोकभावना जागृत केल्या.