Fri, Jul 19, 2019 00:55होमपेज › Kolhapur › आरक्षण: शिवाजी पेठेतर्फे भव्य मोर्चा

आरक्षण: शिवाजी पेठेतर्फे भव्य मोर्चा

Published On: Aug 21 2018 1:38AM | Last Updated: Aug 21 2018 1:38AMकोल्हापूर : प्रतिनिधी

मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यास पदांचे राजीनामे देऊन समाजासोबत रस्त्यावर उतरू, अशी घोषणा आ. चंद्रदीप नरके व पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सोमवारी केली. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी शिवाजी पेठेच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चासमोर नरके व जाधव बोलत होते.

आ. नरके म्हणाले, मराठा समाजाने आरक्षणासाठी राज्यभर 58 मोर्चे काढले. या मोर्चांनी जागतिक रेकॉर्ड केले. शांतता व संयम काय आहे, हे जगाला दाखवून दिले; पण तरीही शासनाने या मागणीची दखल घेतलेली नाही. आरक्षणाशिवाय आता हे आंदोलन थांबणार नाही. ही वादळापूर्वीची शांतता आहे, शासनाने तातडीने निर्णय घ्यावा. ही मागणी पूर्ण झाली नाही, तर आमदारकीचा राजीनामा देऊन विधानसभेवर समाजासोबत धडकू.

महेश जाधव म्हणाले, आरक्षणात पहिल्यापासून शिवाजी पेठेचा पुढाकार राहिला आहे. अलीकडे एक-दोन निवडक लोक पुढे झाले आहेत, त्यांना आपणच हे आंदोलन करत असल्याचे वाटत आहे. मराठा मारतोय, मरत नाही, म्हणून मी भाजपचा असलो, तरी मराठा आरक्षणाच्या बाजूने ठाम आहे. पालकमंत्री पाटील यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी हा निर्णय तातडीने घेण्याचे आवाहन करत आहे. यापुढे या आंदोलनाचे नेतृत्व शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिर येथून होईल. आरक्षण न मिळाल्यास सर्व पदांचा त्याग करून समाजासोबत खांद्याला खांदा लावून काम करू.

माजी आमदार सुरेश साळोखे म्हणाले, सरकारने मोर्चांची दखल घेतली नाही; पण या आंदोलनाची तरी दखल घ्यावी. जे शिवाजी पेठेत घडते, ते कोल्हापुरात आणि कोल्हापुरातील महाराष्ट्रात घडते. आता पेठेची सटकली आहे, आम्ही आता शांत बसणार नाही. तातडीने आरक्षणाचा निर्णय शासनाने घ्यावा.

प्रास्ताविक भाषणात रवीकिरण इंगवले म्हणाले, हा मोर्चा कोणत्याही पक्षाचा नाही. हा पेठेचा मोर्चा आहे. शिवाजी महाराज यांच्याच नावाने ही पेठ आहे. या प्रश्‍नावर जाणीवपूर्वक पालकमंत्री पाटील यांची बदनामी केली जात आहे. आरक्षणाचा निर्णय झाला नाही, तर त्यांच्याही घरासमोर शिवाजी पेठेतील लोक उपोषण करतील; पण त्यांची बदनामी खपवून घेतली जाणार नाही.

यावेळी महापौर सौ. शोभा बोंद्रे, माजी नगरसेवक अजित राऊत, माजी महापौर सई खराडे, सुजित चव्हाण यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन लालासाहेब गायकवाड यांनी केले.मोर्चातील दहा महिलांच्या हस्ते जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी व्यासपाठीवर माजी महापौर सुनीता राऊत, बाजीराव चव्हाण, सागर चव्हाण, उपमहापौर सतीश सावंत, माजी उपमहापौर विक्रम जरग, माजी नगरसेवक इंद्रजित बोंद्रे, उत्तम कोराणे, दत्ता टिपुगडे, नगरसेविका जयश्री चव्हाण, तेजस्विनी इंगवले, अजित नरके, अ‍ॅड. अशोकराव साळोखे आदी उपस्थित होते.

बोलू नका, करून दाखवा

मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यास राजीनामा देण्याची घोषणा आ. नरके व महेश जाधव यांनी केल्याचा संदर्भ देत माजी महापौर सई खराडे यांनी, बोलू नका, करून दाखवा, असे सुनावले. नोव्हेंबरपर्यंत नको, आताच आरक्षण पाहिजे, असेही त्या यावेळी म्हणाल्या.