Sun, May 19, 2019 14:24
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › शिष्यवृत्ती शंभर रुपये, तीही वेळेवर नाही

शिष्यवृत्ती शंभर रुपये, तीही वेळेवर नाही

Published On: Aug 27 2018 1:14AM | Last Updated: Aug 26 2018 11:15PMकोल्हापूर : विकास कांबळे

शासनातर्फे अपंग विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणार्‍या शिष्यवृत्तीची रक्कम अपुरी येत असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित रहावे लागत आहे. जिल्ह्यात साधारणपणे सव्वादोन हजार अपंग विद्यार्थी आहेत. गेल्या तीन वर्षांमध्ये जास्तीत जास्त 402 विद्यार्थ्यांना एका वर्षी शिष्यवृत्ती दिल्याची नोंद जिल्हा परिषदेच्या अपंग विभागाकडे आहे.पहिली ते चौथीपर्यंत महिन्याला 100 रु. शिष्यवृत्ती मिळते.

अपंग विद्यार्थ्यांकरिता शासन शालांत पूर्व शिष्यवृत्ती योजना राबवते. याचे तीन गट करण्यात आले आहेत. पहिली ते चौथीपर्यंत महिन्याला 100 रुपये पाचवी ते सातवी 150 आणि आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना महिन्याला 200 रुपये एवढी कमी रक्कम शिष्यवृत्ती दिली जाते. तरीदेखील या विद्यार्थ्यांना द्यावी लागणारी शिष्यवृत्तीची पूर्ण रक्कम शासनाकडून मिळत नाही. त्यामुळे शासनाकडून आलेल्या रकमेतून गेल्यावर्षी राहिलेल्या विद्यार्थ्यांना प्रथम शिष्यवृत्ती दिली जाते. त्याचा परिणाम अन्य विद्यार्थ्यांना पुढील निधी येईपर्यंत प्रतीक्षा करावी लागते.

त्याचप्रमाणे शिष्यवृत्तीसाठी देण्यात येणारा निधी वेळेवर कधी मिळत नाही. 2014 पासून शासनाने कधीही वेळेवर आणि पुरेसा निधी दिलेला नाही. त्यामुळे दरवर्षी थोड्या, थोड्या विद्यार्थ्यांच्या नावावर रक्कम जमा केली जाते. पूर्वी शिष्यवृत्तीची रक्कम शाळेच्या मुख्याध्यापकांच्या नावाने जमा केली जायची. नंतर शाळेमार्फत ती विद्यार्थ्यांना दिली जायची. यामध्ये घोटाळा होऊ लागल्याने शासनाने वैयक्तिक लाभाच्या योजनेमध्ये डीबीटी सुरू केले. म्हणजे लाभाची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या नावावर जमा करण्यात येऊ लागली. त्यासाठी विद्यार्थ्यांना बँकेमध्ये खाते उघडावे लागले. शिष्यवृत्तीचा अर्ज भरताना त्यामध्ये बँकेचा खाते क्रमांक व आयएफसी कोड याचा उल्लेख करावा लागतो. यात आयएफसी कोड अनेकवेळा लाभार्थ्यांकडून चुकीचा लिहिला जातो. त्यामुळे देखील त्याची शिष्यवृत्ती बँकेत जमा होऊ शकत नाही. वेळेवर निधी नाही, आला तर अपुरा येतो, आलेला निधी बँकेत जमा करताना येणार्‍या अडचणी यामुळे विद्यार्थ्यांना गरजेच्या वेळी कधीच शिष्यवृत्ती मिळू शकत नाही.