Sun, May 26, 2019 19:50होमपेज › Kolhapur › बड्या अधिकार्‍याच्या रूबाबाला अनेकजण भुलले

बड्या अधिकार्‍याच्या रूबाबाला अनेकजण भुलले

Published On: Aug 25 2018 1:15AM | Last Updated: Aug 24 2018 10:51PMइचलकरंजी : बाबासो राजमाने

लाल दिवा असलेली आलिशान गाडी, सोबत बहुरूपी पोलिस गार्ड, गाडीत ‘महाराष्ट्र शासन’ अशी पाटी अशा रुबाबात प्रकाश कल्लेशा पाटील याने जनसामान्यांवर आपली छाप पाडत उपविभागीय अधिकारी सोलापूर, नागपूर कार्यालयीन अधीक्षक, महसूल विभागातील अधिकारी, प्रादेशिक परिवहन अधिकारी, मंत्रालयीन अधिकारी असल्याची बतावणी करीत अनेक सावज हेरले व त्यांना भुरळ पाडली. 

नोकरीचे आमिष, मृत व्यक्तीचा संबंधित असल्याचा दावा, शाळांना अनुदान देण्याची बतावणी यासह अनेक आमिषे दाखवून त्याने चार जिल्ह्यांसह अनेक ठिकाणी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. अनेकांनी अब्रूखातर तक्रार देण्याचे टाळले, तर काही प्रकरणांत योग्य पद्धतीने तपास न झाल्याने प्रकाश पाटील याचे कारनामे वाढतच राहिले. त्यामुळे त्याच्या फसवणुकीची व्याप्तीही लाखोंच्या घरात पोहोचली. तक्रारदारांना शोधण्याबरोबरच फसवणुकीचे पाटील याचे कारनामे उजेडात आणण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. 

प्रकाश पाटील या ठकसेनाने सुरुवातीच्या काही दिवसांत 100 रुपये, 200 रुपये आदी मिळेल ती रक्कम फसवणुकीच्या माध्यमातून खिशात घालण्यास सुरुवात केली. फसवणुकीची कमी असलेली रक्कम यामुळे अनेकांनी तक्रार देण्याचे टाळले. त्याचाच फायदा उठवत प्रकाश पाटील याचे फसवणुकीचे कारनामे आणखीन वाढत गेले. त्यातूनच त्याने नवनवीन फंडे अवलंबत अनेकांना चांगलाच गंडा घातला. अधिकार्‍याचा रुबाब पाडत अनेकांकडे मिळेल त्या पद्धतीने रोकड, दागिने आदी लांबवण्याचा सपाटाच लावला. संजय भोसले, संजय जाधव, सुनील तारवाळ, प्रशांत मोरे, रमेश वाडकर, सुरेश जाधव अशी खोटी नावे धारण करीत त्याने चांगलाच धुमाकूळ घातला. पेठवडगाव येथे कर्ज मंजुरीच्या आमिषाने एका महिलेला दागिने देण्यास त्याने सांगितले. संबंधित महिलेने शेजारी, तसेच नातेवाइकांकडून जमा करून 11 तोळ्यांहून अधिक सोने पाटीलकडे सोपवले. पारगाव (ता. हातकणंगले) येथे प्रकाश पाटील हा जिल्हाधिकार्‍यांचा स्वीय सहायक बनून गेला. एका मोबाईल स्टोअर चालकाला त्याने भुरळ घालत त्याच्याकडून किमती तीन मोबाईल लांबवले. 

सांगली जिल्ह्यातील बिऊर येथे तर त्याने चांगलाच मोठा हात मारला. चंद्रभागा बबन पाटील यांचा मुलगा सुधीर हा सैन्यदलात होता. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मित्र बनत चंद्रभागा यांना भावनिक गळ घालत घर बांधण्यासाठी मदत करतो, असे सांगून त्यांना तब्बल 6 लाख रुपयांना या ठगसेनाने गंडा घातला. नोकरीचे, कर्ज मिळवून देण्याचे आमिष आदींसह विविध फंडे वापरत त्याने पाच हजारांपासून ते 25 हजारांपर्यंत रक्कम लांबवण्याचा अनेक ठिकाणी प्रकार केला. सांगली शहरातील एका भांड्याच्या दुकानात त्याने अधिकारी असल्याचे भासवून धनादेश देऊन दोन संसार सेट घेऊन फसवणूक केली. दुकानातील निम्म्याहून अधिक साहित्याची फसवणूक झाल्याने दुकानदाराचे मात्र चांगलेच नुकसान झाले. अहमदनगर जिल्ह्यातील आष्टी येथे मंत्रालयातील अधिकारी असल्याची बतावणी करून एका शाळेच्या पदाधिकार्‍यांना भेटून त्याने अनुदान देण्याचे आमिष दाखवले होते. मात्र, तेथून त्याला हात हलवत परतावे लागले. मंगळवेढा येथेही त्याने नोकरी लावतो, असे सांगून काहींकडून दीड तोळे सोने, मोबाईल लांबवले आहेत. नोकरीच्या आमिषाने अनेकांकडून कागदपत्रे घेऊन दरवेळी विविध गुन्ह्यांत त्यांचा वापर केला. या माध्यमातून प्रत्येक गुन्ह्यासाठी तो नवीन सिमकार्ड घेत होता, असेही पोलिस तपासात समोर आले आहे. आठ दिवस वेशांतर करून पाळत ठेवल्यानंतर, तसेच हेर्लेतील महिलेच्या सतर्कतेमुळे अनेकांना गंडा घालणारा प्रकाश पाटील पोलिसांच्या जाळ्यात सापडला. आता त्याच्याकडून आणखीन काही गुन्ह्यांची उकल करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. (उत्तरार्ध)