Mon, Mar 18, 2019 19:17होमपेज › Kolhapur › गाळे सील तरीही कागदोपत्री सुरूच

गाळे सील तरीही कागदोपत्री सुरूच

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

महापालिकेच्या  परवाने नूतनीकरण न केलेले किंवा नव्याने प्रकल्पांमुळे जे गाळे सील करण्यात आले आहेत ते मात्र कागदोपत्री सुरू दाखवून अन्य परवाने घेतले जात असल्याचे प्रकार सुरू आहेत. कोंबडी बजार येथील 42 दुकानगाळे सील करून त्यांना पर्यायी जागा देण्यासाठी अ‍ॅफिडेव्हीटचा नमुना दिला आहे; पण गाळेधारकांकडून त्याला अल्प प्रतिसाद मिळत आहे. कोल्हापूर शहर हद्दीत महापालिकेच्या गाळ्यांमध्ये अनेक वेगवेगळे व्यवसाय केले जातात. या गाळेमालकांकडून भाडेआकारणीबाबत करार केला जातो. गाळ्यांमधील व्यवसायाच्या स्वरूपावरून अन्य शासकीय कार्यालयांचे परवानेही घ्यावे लागतात. यासाठी संबंधित गाळ्यांमध्ये व्यवसाय सुरू असणे बंधनकारक आहे. 

महापालिकेने जानेवारी, फेब्रुवारी महिन्यांत अनेक परवाना फी न भरल्याने अनेक गाळे सील केले आहेत.  कोंबडी बजार येथील गाळ्यांच्या जागेवर व्यापारी संकुल उभा केले जाणार असल्याने तेथील 42 गाळे सील करण्यात आले आहेत; पण काही गाळे धारकांनी आपला व्यवसाय सुरू असल्याचे सांगून अन्य शासकीय कार्यालयांचे परवाने घेतल्याचे समजते.महापालिकेने गाळे सील केले असताना ते सुरू आहेत असे सांगून अन्य परवाने घेणे बेकायदेशीर असल्याचे महापालिकेच्या अधिकार्‍यांनी सांगितले. या परवान्यांचा आधार घेऊन कोणी न्यायालयात दावा दाखल केल्यास महापालिकेकडून कारवाईच्या तारखांचा तपशिल सादर केला जाणार असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. त्यामुळे कोणीही गैर पद्धतीने असे परवाने घेऊ नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे. 

दरम्यान, कोंबडी बजार येथील गाळेधारकांना महापालिकेने अ‍ॅफिडेव्हीटचा नमुना दिला आहे. गाळेधारकांनी हा फॉर्म भरून द्यायचा आहे. यामध्ये सदर जागेबाबत असणारे न्यायालयीन दावे मागे घेतल्यास संबंधित गाळे धारकाला नवीन व्यापारी संकुलात जागा व सध्या तात्पुरत्या स्वरूपात व्यवसायासाठी जागा देण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.  सर्व 42 गाळे धारकांनी हा फॉर्म भरून द्यावा, असे महापालिकेने आवाहन केले आहे; पण मुळातच या कोंबडी बजारमधील व्यावसायिकांचे महापालिकेनेच पुनर्वसन केले होते. आता पुन्हा तेच कारवाई करतात मग त्याच्यावर विश्‍वास ठेवायचा कसा असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

Tags : Kolahpur, Kolhapur News, different, businesses, municipal, spots, Kolhapur Munciple Corporation


  •