Mon, Sep 24, 2018 17:38होमपेज › Kolhapur › थर्माकोल बंदीमुळे अनेक कारागीर बेकार

थर्माकोल बंदीमुळे अनेक कारागीर बेकार

Published On: Jul 20 2018 1:11AM | Last Updated: Jul 20 2018 12:10AMगवसे ः वार्ताहर

राज्यात प्लास्टिकबरोबरच अनेक सजावटीसाठी उपयुक्‍त असणार्‍या थर्माकोलवरती बंदी घातल्याने या थर्माकोलपासून विविध आकाराची सजावट करणार्‍या कारागिरांना मात्र यावेळी बेकारीला तोंड द्यावे लागणार आहे. काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या आकर्षक सजावटीसाठी थर्माकोल नसल्याने अनेक कारागिरांच्या कलेवर गंडांतर येणार आहे.

एखाद्या मंगलमय कार्यक्रमाच्या सजावटीसाठी थर्माकोलपासून आकर्षक सजावट ही नेहमीचीच ठरलेेली असते. एखाद्या विवाह प्रसंगी वधू-वराचे आकर्षकपणे थर्माकोलने रेखाटलेले नाव सर्वांच्याच नजरा वेधून घेते. तर नामकरण सोहळा, साखरपुडा किंवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमात थर्माकोलपासून आकर्षक सजावट त्या कार्यक्रमाची शोभा वाढवते. काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवात थर्माकोलपासून विविध सजावटीच्या वस्तूने आरासाची शोभा वाढायची. थर्माकोलपासून तयार करण्यात आलेल्या आकर्षक मंदिरांना राज्याबरोबरच परराज्यांतही मोठी मागणी असायची. 

अनेक कारागिरांचे हात दिवस-रात्र या आकर्षक मंदिराच्या तयारीसाठी राबायचे. अनेक कारागिरांना यामुळे चांगली कमाईदेखील व्हायची. अनेकांच्या संसाराचा गाडा या कारागिरीवर व्यवस्थित चालायचा; पण थर्माकोल निसर्गाला हानीकारक असल्याचा दाखला देत यावरती बंदी घातली आहे. त्यामुळे हजारो कारागीर यामुळे बेकार होणार आहेत. त्यांच्या कलेवर गंडांतर येणार आहे. गणेशाच्या आरासाची सजावट यावेळी थर्माकोलशिवाय करणे सर्वांनाच अवघड जाणार आहे.