Sat, Apr 20, 2019 16:16होमपेज › Kolhapur › ‘मंगळवार पेठ’कडून ‘प्रॅक्टिस’पराभूत

‘मंगळवार पेठ’कडून ‘प्रॅक्टिस’पराभूत

Published On: Jun 02 2018 2:01AM | Last Updated: Jun 02 2018 1:50AMकोल्हापूर : क्रीडा प्रतिनिधी 

नवोदित संघांनी अनुभवी आणि बलाढ्य  संघांना चिवट झुंज देत मैदान गाजवत फुटबॉलप्रेमींची मने जिंकली. शुक्रवारी झालेल्या बालगोपाल तालीम मंडळ विरोधातील सामन्यात बालगोपाल तालीम मंडळाने त्यांना संपूर्णवेळ गोलशून्य बरोबरीत रोखले. मात्र, टायब्रेकरमध्ये बालगोपालने 4-3 अशा निसटत्या विजयासाह साखळी फेरीत प्रवेश केला. दुसर्‍या सामन्यात मंगळवार पेठ फुटबॉल क्लबने प्रॅक्टिस क्लब ‘अ’ ला बरोबरीत रोखल्याने सामन्याचा निकाल टायब्रेकरवर गेला. यात मंगळवार पेठेने प्रॅक्टिसला 4-1 असा पराभवाचा धक्का देत साखळी फेरीत प्रवेश केला. 

सॉकर अ‍ॅमॅच्युअर इन्स्टिट्यूट (साई) आयोजित ‘चंद्रकांत’ चषक वरिष्ठ व 17 वर्षांखालील गटाची फुटबॉल महासंग्राम स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू आहे. सकाळच्या सत्रातील 17 वयोगटाच्या सामन्यात फुलेवाडीने साईनाथचा एकमेव गोलने पराभव केला. आशिष घाटगेने विजयी गोल केला. दुसर्‍या सामन्यात कोल्हापूर पोलिस संघाने प्रॅक्टिस ‘ब’ संघाचा 7-0 असा धुव्वा उडविला. त्यांच्या सिद्धी बरगेने तीन, यशोवर्धन मोरेने दोन, प्रथमेश गावडे व सिद्धेश वीर यांनी प्रत्येकी एक गोलची नोंद केली. गडहिंग्लजच्या मास्टर स्पोर्टस्ने बालगोपालचा 2-1 असा पराभव करून आगेकूच केली. मास्टर्सच्या ऋतिक शेठ, आयन मुदगी तर बालगोपालच्या स्वयं साळोखे याने एकमेव गोल केले. 

‘बालगोपाल’ला विजयासाठी झुंजविले...
संयुक्त जुना बुधवार पेठेने बालगोपालला कडवी झुंज देत सामना गोलशून्य बरोबरीत राखला. यामुळे निकालासाठी टायब्रेकरचा अवलंब करण्यात आला. यात बालगोपालच्या सुमित घाटगे, रोहित कुरणे, आशिष कुरणे, अतिश घोलप यांच्या स्ट्रोकवर गोल झाले. बबलू नाईकचा स्ट्रोक अभिजित कदमने फोल ठरविला. उत्तरादाखल संयुक्त बुधवार पेठेच्या हरिष पाटील, प्रसाद पाटील, विश्‍वदीप  साळोखे यांच्या स्ट्रोकना यश आले. मात्र, किरण कावणेकरचा फटका गोलरक्षक निखिल खन्ना याने तर निखिल कुलकर्णीचा फटका बदली गोलरक्षक हरिष कुरणे याने रोखला. यामुळे सामना बालगोपालने 4-3 असा जिंकत पुढील फेरीत प्रवेश केला.

‘प्रॅक्टिस’चे आव्हान संपुष्टात...
दुसर्‍या सामन्यात नवख्या मंगळवार पेठ फुटबॉल क्लबने बलाढ्य प्रॅक्टिस क्लब ‘अ’ संघाचा टायब्रेकरमध्ये धक्कादायक पराभव करून स्पर्धेतील त्यांचे आव्हान संपुष्टात आणले. त्यांनी दिलेल्या कडव्या झुंजीमुळे संपूर्णवेळ सामना गोलशून्य बरोबरीत राहिला. निकालासाठी टायब्रेकरचा अवलंब करण्यात आला. यात मंगळवार पेठेच्या भरत पाटील, सोमनाथ निकम, विकी जाधव व नीलेश खापरे यांनी बिनचूक गोल केले. उत्तरादाखल प्रॅक्टिसकडून प्रतीक बदामे याने एकमेव गोलची परतफेड केली त्यांच्या राहुल पाटील व माणिक पाटील यांचे स्ट्रोक गोलपोस्ट बाहेर गेले. यामुळे सामना मंगळवार पेठेने 4-1 असा जिंकत साखळी फेरीत प्रवेश केला. 
आजचा सामना  :   दिलबहार तालीम ‘अ’ विरुद्ध खंडोबा तालीम मंडळ, सायंकाळी 4 वाजता. 

दोन्ही सामन्यानंतर मैदानात तणाव...
दरम्यान, दोन्ही सामन्यानंतर मैदानात तणाव निर्माण झाला होता. प्रेक्षक गॅलरीतील समर्थक व हुल्लडबाजांनी मैदानातील खेळाडूंना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली.  मैदानात कोणीही कोठूनही ये-जा करत होते. कोणत्याही प्रकारची सिक्युरिटी कार्यरत नसल्याने मैदानात हुल्लडबाजांनी मोठ्या संख्येने घुसखोरी केली होती. यामुळे मैदानात मोठा तणाव निर्माण झाला होता.