Sun, Jul 21, 2019 05:36होमपेज › Kolhapur › आंब्याजवळ अपघातात दोन तरुण जागीच ठार

आंब्याजवळ अपघातात दोन तरुण जागीच ठार

Published On: Jan 22 2018 1:53AM | Last Updated: Jan 22 2018 1:53AMमलकापूर : वार्ताहर

कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर आंब्याजवळ केर्ले (ता. शाहूवाडी) येथे वाळूच्या डंपरवर मोटारसायकल आदळून झालेल्या अपघातात दोन तरुण जागीच ठार झाले. बबलू जेम्स डेव्हिड (वय 25, रा. दुसरी गल्ली, जयसिंगपूर) व संग्राम अर्जुन चव्हाण (28, मूळ रा. कुमठे, ता. मिरज, रा. धर्मनगर-कोंडिग्रे, ता. शिरोळ) अशी त्यांची नावे आहेत. रविवारी सायंकाळी झालेल्या अपघाताची नोंद शाहूवाडी पोलिसात झाली आहे. बबलू व संग्राम यांच्यासह चौघे मित्र मोटारसायकलने जयसिंगपूरमधून विशाळगडला मलिकरेहान बाबांच्या दर्शनासाठी निघाले होते. केर्ले गावाजवळील नागमोडी वळणावर रत्नागिरीहून वाळू घेऊन कोल्हापूरकडे चाललेल्या 

डंपरवर (एम एच 10 ए डब्ल्यू 8369) बबलू व संग्राम यांची मोटारसायकल आदळली. दोघांच्याही डोक्यास जोराचा मार लागल्याने अतिरक्‍तस्राव होऊन ते जागीच गतप्राण झाले. ही धडक एवढ्या जोराची 
होती की, डंपरने सुमारे तीस फूट मोटारसायकल  खेचत नेली.  दोन मित्र ठार झाल्याचे पाहून त्यांचे मित्र सैरभैर झाले. नागरिकांनी त्यांना धीर देऊन दोघांच्याही घरी माहिती दिली. घरातील लोक घटनास्थळी आले. डेव्हिड लक्ष्मी क्रेन कंपनीत चालक होता व त्याचा मित्र संग्राम त्याच्याबरोबर कामाला होता. मलकापूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून रात्री उशिरा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. अधिक तपास फौजदार श्रीराम पडवळ व कॉन्स्टेबल महेश ढवळे करीत आहेत.