Sun, Feb 23, 2020 09:45होमपेज › Kolhapur › ‘कळंबा’तील जलचरांचे अस्तित्व आले धोक्यात

‘कळंबा’तील जलचरांचे अस्तित्व आले धोक्यात

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर/कळंबा : प्रतिनिधी

कळंबा तलावातील मोठे मासे मृत्युमुखी पडत आहेत. तलाव प्रदूषणाबाबत आवाज उठवूनही महापालिका व ग्रामपंचायतीने सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे. कळंबा तलाव शंभरहून अधिक वर्षांपासून गावासह निम्मे शहर व उपनगरांतील पाण्याचा महत्त्वाचा स्रोत आहे. गाळ काढल्यानंतर यंदा तलाव पूर्ण क्षमतेेने भरला. तलावात मच्छीमारांनी विविध प्रकारची मत्स्यबीजे सोडली होती. त्या माशांची वाढ झाली आहे. मात्र, सध्या तलावाचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात होऊ लागले आहे. 

महापालिकेतर्फे तलावाच्या टॉवरजवळ नागरिकांनी पाळावयाच्या जाहीर सूचनांचा फलक लावण्यात आला होता. परंतु, अज्ञातांनी पळवून नेला आहे. कळंब्यासह उपनगरातील नागरिक दररोज जनावरे धुण्यासाठी व पोहण्यासाठी तलावावर नित्यनियमाने येतात, यामुळे शेण व मूत्र तलावातच विसर्जित होत आहे. तलावात गारवेलही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. 

स्मशानभूमीच्या बाजूला उभारलेल्या शेडसह संपूर्ण परिसर तळीरामांसाठी ‘ओपन बार’ बनला आहे. प्लास्टिक बॉटल व दारूच्या बाटल्या, कॅरिबॅगचा रोज खच पडलेला असतो. तलावास लागून कचर्‍याचे मोठे ढीग साचले असून, दुर्गंधी सुटली आहे. प्रदूषणामुळे जलचरांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. तलाव कायमस्वरूपी प्रदूषणमुक्‍त करण्यासाठी महापालिका, ग्रामपंचायत  कधी ठोस भूमिका घेणार, असा सवाल स्थानिक नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.