Tue, May 21, 2019 13:09होमपेज › Kolhapur › महावितरणच्या ‘कृषी संजीवनी’चा फुगा फुटला!

महावितरणच्या ‘कृषी संजीवनी’चा फुगा फुटला!

Published On: Dec 16 2017 2:06AM | Last Updated: Dec 16 2017 1:22AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : सुनील कदम

महावितरणने कृषिपंपांची वीज बिलांची थकबाकी वसूल करण्यासाठी जाहीर केलेल्या ‘कृषी संजीवनी’ योजनेचा अक्षरश: फुगा फुटला असून, या योजनेंतर्गत दीड टक्क्यांहून कमी म्हणजे केवळ 299 कोटी रुपयांची वसुली होऊ शकली आहे. त्यामुळे महावितरणला पुन्हा एकदा आर्थिक अरिष्टाचा सामना करावा लागणार आहे.

राज्यात एकूण 41 लाख कृषिपंपधारक शेतकरी असून त्यापैकी 38 लाख थकबाकीदार आहेत. महावितरणच्या दाव्यानुसार या 38 लाख शेतकर्‍यांकडे एकूण 10 हजार 890 कोटी रुपयांची थकबाकी आहे. थकबाकीवरील व्याजासह हा आकडा 20 हजार 235 कोटींवर जाऊन पोहोचला आहे. दुष्काळासह वेगवेगळ्या कारणांनी कृषिपंपांच्या वीज बिल वसुलीला अडथळे येत आहेत.

यावर उपाय म्हणून ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कृषिपंपांच्या थकबाकी वसुलीसाठी ‘मुख्यमंत्री कृषी संजीवनी’ योजना जाहीर केली होती. या योजनेनुसार थकबाकीदार शेतकर्‍यांनी आपली मूळ थकबाकी पाच समान हप्त्यांमध्ये भरायची होती. या योजनेसाठी 30 नोव्हेंबर ही शेवटची मुदत देण्यात आली होती.

महावितरणने कृषिपंपांची थकबाकी जरी 10 हजार 890 कोटी रुपये दाखविली असली तरी राज्यभरातील बहुतांश शेतकर्‍यांनी ती अमान्य केलेली होती. कारण राज्यभरातील हजारो शेतकर्‍यांनी आपल्या कृषिपंपांची वीज बिले चुकीची आणि वाढीव असल्याच्या तक्रारी केलेल्या आहेत. त्या तक्रारींचा निपटारा करण्यापूर्वीच शेतकर्‍यांना या योजनेत सहभागी होऊन थकबाकी भरण्याचे आवाहन करण्यात आलेले होते. मात्र, मुळात वीज बिलेच जर चुकीची असतील, वाढीव दराची असतील तर शेतकरी ती भरायला तयार होणे शक्यच नव्हते. त्यामुळे या योजनेच्या  यशस्वीतेची खात्री देता येत नव्हती आणि आता तसेच झाले आहे.

महावितरणचे असे म्हणणे आहे की कृषिपंपांच्या वीज बिलाची थकबाकी ही 10 हजार 890 कोटी रुपयांची आहे. मात्र, त्यांच्याच कार्यालयातून माहितीच्या अधिकारात प्राप्त झालेली आकडेवारी दर्शविते की एकूण थकबाकीपैकी जवळपास 3500 कोटी रुपयांची थकबाकी ही बोगस आहे. याचा अर्थ कृषिपंपांची खरी थकबाकी ही 6500 कोटी रुपयांचीच असली पाहिजे, अशी साशंकता या योजनेच्या सुरुवातीलाच अनेक शेतकरी व वीज ग्राहक संघटनेने व्यक्त केली होती. त्यामुळे महावितरणच्या या योजनेला अत्यंत अल्प प्रतिसाद मिळून शेवटी ही योजनाच वाया गेल्याचे स्पष्ट झाले आहे.

‘पुढारी’ने केला होता पर्दाफाश!

महावितरणने कृषी संजीवनी योजना जाहीर केल्यानंतर दै. ‘पुढारी’ने या योजनेत असलेल्या अनेक त्रुटी व महावितरणने केलेल्या गैरप्रकारांवर ‘कृषी संजीवनीतील गोलमाल’ या लेखमालेद्वारे प्रकाशझोत टाकला होता. त्याचप्रमाणे या योजनेच्या यशस्वीतेबद्दल साशंकता व्यक्त केली होती. या योजनेचा उडालेला फज्जा विचारात घेता दै.‘पुढारी’च्या भूमिकेला पुष्टी मिळाल्याचे दिसते.