Tue, Feb 19, 2019 01:55होमपेज › Kolhapur › स्वत:च्याच परिपत्रकाचा ‘महावितरण’ला विसर

स्वत:च्याच परिपत्रकाचा ‘महावितरण’ला विसर

Published On: Jun 22 2018 2:08AM | Last Updated: Jun 22 2018 12:20AMकोल्हापूर : सुनील सकटे 

विविध शासकीय कार्यालयांप्रमाणे महावितरण कंपनीतही बदल्यांचे राजकारण सुरू आहे. प्रशासनाच्या भोंगळ कारभाराने एका उपमहाव्यवस्थापकास निवृत्तीनंतर पंधरा दिवसांनी बदली आदेश  काढण्याचे प्रकरण ताजे आहे. असे असतानाच आता दस्तुरखुद्द मुख्यालय प्रकाशगड प्रशासनास आपणच काढलेल्या परिपत्रकाचा विसर पडल्याचे दिसून येते. सध्या राज्यात साहाय्यक अभियंता कनिष्ठ अभियंता यांची बदलीचे धोरण बंद असताना उपकार्यकारी अभियंत्यांच्या बदलीत साहाय्यक अभियंत्यांची बदली केली आहे. राज्यात केवळ एकाच  साहाय्यक अभियंत्यांची बदली का व कशासाठी, असा संतप्त सवाल अभियंत्यांतून केला जात आहे. 

महावितरण  कंपनीत रिस्ट्रक्चरिंगचे वारे वाहत आहेत. या पार्श्‍वभूमीवर प्रकाशगड मुख्यालयाने वर्ग तीन, वर्ग चार, साहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता या पदांवरील कर्मचारी, अधिकार्‍यांच्या बदल्या करू नयेत, असे स्पष्ट परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकामुळे महावितरणमध्ये बदल्यांचे राजकारण चांगलेच तापले आहे. एकीकडे असे वातावरण तापले असताना दस्तुरखुद्द प्रकाशगड मुख्यालयातूनच बदल्यांचा घोळ सुरू आह. एका वित्त व लेखा विभागातील एका उपमहाव्यवस्थापकाच्या बदलीचे प्रकरण गाजत आहे. संबंधित अधिकारी पंधरा दिवसांपूर्वी निवृत्त झाला आहे.असे असताना त्याच्या बदलीची ऑर्डर काढण्यात आली आहे. एखादा अधिकारी निवृत्त झाल्यानंतर बदली होतेच कशी, अशी चर्चा सुरू आहे. 

महावितरण कंपनीत अधिकार्‍यांच्या बदल्यांची ऑर्डर त्या त्या वर्गवारीत काढल्या जातात. उदा. कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता यांच्या प्रत्येक वर्गवारीनुसार स्वतंत्र काढली जातात. सध्या कनिष्ठ अभियंता आणि साहाय्यक अभियंता बदली करण्यास मनाई आहे. तसे परिपत्रक काढले आहे. असे असताना मुख्यालयातून उपकार्यकारी अभियंत्यांच्या बदलीसोबत एका साहाय्यक अभियंत्यांची बदली केली आहे. बदलीस मनाई असताना बदली करूनही दुसरा प्रकार म्हणजे, उपकार्यकारी अभियंत्यांच्या यादीत या साहाय्यक अभियंत्यांचे नाव समाविष्ट केले आहे. राज्यात केवळ एका साहाय्यक अभियंत्याची बदली केल्याने अभियंते अधिकार्‍यांत चर्चेचा विषय ठरला आहे.