होमपेज › Kolhapur › ब्लॉग : सामाजिक लोकशाहीचे प्रवर्तक : महात्मा फुले

ब्लॉग : महात्मा फुले सामाजिक लोकशाहीचे प्रवर्तक

Published On: Apr 11 2018 7:42AM | Last Updated: Apr 11 2018 7:58AMप्रा. डॉ. वि. ल. धारुरकर

भारतीय समाजसुधारणेच्या इतिहासात महात्मा जोतिराव फुले यांचे स्थान अद्वितीय आहे. त्यांनी सामाजिक सुधारणांचे नवे पर्व सुरू केले. पश्‍चिम भारतातील सामाजिक जागृतीमध्ये त्यांनी दिलेले योगदान महत्त्वपूर्ण आहे. संविधानासाठी आवश्यक अशा लोकशाही  मूल्यांच्या स्थापनेसाठी जोतिरावांनी अविरत संघर्ष आणि समर्पणही केले. महात्मा जोतिराव फुले हेे भारतीय संविधानाच्या सरनाम्यात  स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय समाविष्ट करणार्‍या डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांचे गुरू होते. कारण, सामाजिक सुधारणांना महात्मा  फुले यांनी नवी दिशा दिली. 

थॉमस पेन यांचा ‘ह्युमन राईट्स द एज ऑफ रिझन’ हा ग्रंथ वाचून त्यांना मानवी मूल्यांची जाणीव झाली आणि ते अस्वस्थ झाले. भारतात अशी लोकशाही विचारपूर्वक प्रस्थापित करण्याचा आग्रह त्यांनी धरला. त्यासाठी राज्यकर्ते आणि समाज या दोन्हींची मने वळवण्याचा प्रयत्न केला. ही मते प्रत्यक्ष कृतीतून तावून सुलाखून बाहेर काढली. महात्मा फुले यांच्या कार्याचे वेगळेपण वर्तमानात विशेष करून जाणवते. कारण, आज भारतीय लोकशाही एका विशिष्ट वळणावर उभी आहे. आपल्याला जात, पंथ, धर्म यांच्या पलीकडे जाऊन धर्मनिरपेक्ष लोकशाही मूल्यांची भारतीय संस्कृतीत अनुरूप स्थापना करायची आहे. महात्मा फुले यांचा हाच आग्रह होता की आमचा देश, समाज, धर्म बदलण्यासाठी आपण लोकशाही मार्गाने क्रांतिकारक दिशेने पावले टाकली पाहिजेत आणि सामाजिक न्यायबुद्धीने सर्वांना समान वागणूक दिली पाहिजे. शिक्षण हाच या परिवर्तनाचा आधार आहे, अशी त्यांची भूमिका होती.

अविद्येने केला अनर्थ
विद्या, मती, गती आणि अर्थ यांचा परस्पर संबंध महात्मा फुले यांनी विशद करून सांगितला होता. ‘शेेतकर्‍यांचा आसूड’ या त्यांच्या ग्रंथाच्या उपोद्घोषात त्यांनी सांगितले होते की, विद्येविना मति गेली, मतिविना गति गेली, गतिविना वित्त गेले, वित्ताविना क्षूद्र खचले, एवढे सारे एका अविद्येने केले. त्यामुळे शिक्षण नसल्यामुळे हा सगळा अनर्थ होतो हे त्यांनी ओळखले. समग्र परिवर्तनाचा आधार शिक्षण हाच आहे, शिक्षणाने माणूस बदलतो, शिक्षणाचा अधिकार हा सर्वांचा मानवी अधिकार आहे, हे महात्मा फुले यांनी ओळखले होते. त्यामुळेच इंग्लंडचा राजपुत्र भारतात आला असताना सर्वांना सक्‍तीचे आणि मोफत शिक्षण द्या, असा आग्रह महात्मा फुले यांनी त्या काळात धरला होता. भारतात आज सर्वांना शिक्षणाचा अधिकार प्राप्त झाला आहे. त्याचे प्रवर्तक म्हणून महात्मा फुले यांचा विशेष उल्‍लेख करावा लागेल. 

राजा राममोहन रॉय यांनी पश्‍चिम बंगालमध्ये जे काम केले त्याहीपेक्षा महत्त्वाचे काम महात्मा फुले यांनी केले. त्यामुळेच राजा राममोहन रॉय यांच्यापेक्षाही भारतीय समाजसुधारणेचे जनक म्हणून महात्मा फुले यांना गणले गेले पाहिजे. त्यांना किसान महात्मा ही पदवी लोकांनी दिली होती. त्यावेळी मुंबईत रेल्वे रुळांचे काम करणार्‍या तेलगू बांधवांनी एक संमेलन घेतले. त्याचे नेतृत्व अकण्णा अयण्णा वारू यांच्याकडे होते. या सर्व कार्यकर्त्यांनी महात्मा फुले यांचे महत्त्वाचे कार्य लक्षात घेऊन हा शेतकर्‍यांचा महात्मा म्हणजे किसान महात्मा, अशी उपाधी दिली. या उपाधीतून पुढे महात्मा जोतिराव हे बिरुद सर्वांनी स्वीकारले.  

अभूतपूर्व शैक्षणिक क्रांती
महात्मा फुले यांनी शिक्षणाची गंगा गरीब माणसांच्या दारापर्यंत पोहोचवली. 1848 पर्यंत महाराष्ट्रात क्षूद्र आणि स्त्रिया यांना शिक्षणाचा अधिकार नव्हताच. त्यांनी पुण्यातील भिडे वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. भारतात रात्रशाळा स्थापन करण्याचे श्रेयसुद्धा महात्मा फुले यांच्याकडे जाते. प्रौढ शिक्षणाचेसुद्धा ते प्रवर्तक आहेत. विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यनगरीत महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले या दोघांनी मिळून केलेले कार्य वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यांनी आपल्या घरातील पाण्याचा हौद सर्वांसाठी खुला केलाच, पण शिक्षणाची गंगाही खुली केली. या क्रांतिकारी कार्यामुळेच काही वर्षांपूर्वी पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यात आले. महात्मा फुले यांच्या या शैक्षणिक कार्याचा खराखुरा आधार त्यांच्या समताधिष्ठित विचारात दिसतो. 

कृषीजनसंवाद
महात्मा फुले यांनी ‘गुलामगिरी’, ‘शेतकर्‍याचा आसूड’ या ग्रंथांतून शेतकर्‍यांचे प्रश्‍न प्रभावीपणे मांडले. शेतकर्‍यांच्या समस्या मांडताना त्यांनी बड्या बागायतदार शेतकर्‍यांवर टीका करण्याचेही सोडले नाही. समाजातील प्रस्थापित रूढी, अंधश्रद्धेवरही कोरडे ओढून शेतकर्‍यांना त्यांच्या प्रश्‍नावरसुद्धा जागरूक केले. महाराष्ट्रात अहमदनगर, पुणे जिल्ह्यांत पहिले शेतकरी आंदोलन घडवून आणण्याचे श्रेयही महात्मा फुले यांना जाते. तसेच आज आपण ज्याला पाणलोट विकास क्षेत्र म्हणतो त्याच्या विकासाचे विचारही महात्मा फुले यांनीच प्रथमतः महाराष्ट्रात रुजवले, वाढवले. शेतकरी सुखी झाला तरच समाज सुखी होईल, हे त्यांच्या विचारांचे सूत्र होते. महात्मा फुले यांच्या विचारावर उदारमतवादी लोकशाही विचारांचा प्रभाव होता. हे विचार त्यांनी गव्हर्नर म्हणून काम करताना प्रत्यक्षात कृतीत आणलेले दिसतात. शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी अनेक महत्त्वाची पावले टाकली. त्यासाठी महात्मा फुले यांनी घेतलेल्या प्रशासकीय निर्णयांचे अजून सखोल संशोधन होणे गरजेचे आहे. 

सामाजिक लोकशाहीचे प्रवर्तक
महात्मा फुले हे सामाजिक लोकशाहीचे प्रवर्तक होते. त्यामुऴेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘वुई वेअर शूद्राज’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत असे म्हटले आहे की, या समाजपुरुषाने सामाजिक लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी शुद्रातिशुद्रांच्या कल्याणाचा पहिला विचार मांडला. महात्मा फुले यांनी आपला ‘गुलामगिरी’ हा ग्रंथ अमेरिकेन स्वातंत्र्यलढ्याचे प्रवर्तक अब्राहम लिंकन यांना समर्पित केला होता.

महात्मा फुले यांनी अमेरिकेच्या स्वातंत्र्यलढ्यातील आणि सामाजिक समतेच्या प्रवाहातील विचारवंताचे अध्ययन केले. लोकशाही मूल्ये आणि परंपरा ह्या समतेवर आधारलेल्या असल्या पाहिजेत, हे त्यांनी जाणले होते. जात,धर्म, पंथ, लिंग सर्व भेद टाळून सर्वांना शिक्षण दिले पाहिजे. तेच खर्‍या अर्थाने प्रगतीचा आधार आणि द्योतक आहे, हे महात्मा फुले यांनी ओळखले होते. त्यामुळे त्यांना भारतातील सामाजिक लोकशाहीचे आद्यप्रवर्तक असे म्हटले पाहिजे. भारतीय लोकशाहीत जी मूल्ये सांगितली आहेत, त्यांच्या प्रस्थापनेसाठी राजा राममोहन रॉय, महात्मा फुले, रामकृष्ण परमहंस, विवेकानंद, दयानंद सरस्वती या सर्वांनी केलेल्या कार्याची विशेष नोंद घेऊन आपल्या समाजरचनेत आणि एकूणच राष्ट्रीय संस्कृतीत वेगवेगळे बदल करून तिला प्रगतिपथावर नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.