Sun, Mar 24, 2019 06:14होमपेज › Kolhapur › भक्तिमय वातावरणात महाशिवरात्री 

भक्तिमय वातावरणात महाशिवरात्री 

Published On: Feb 14 2018 2:52AM | Last Updated: Feb 14 2018 12:58AMकोल्हापूर : प्रतिनिधी

धार्मिक कार्यक्रमांनी शहर परिसरात महाशिवरात्री उत्साहात साजरी झाली. शिवरात्रीनिमित्त शहरातील सर्वच शिवमंदिरांत दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.  मंदिरांमध्ये रूद्रपठण, महारूद्राभिषेक, भजन, कीर्तन पालखी सोहळा संपन्न झाला. मंगळवारी पहाटे साडेचार पासून शहराला जाग आली होती. महाशिवरात्रीनिमित्त महाअभिषेक व अन्य धार्मिक कार्यक्रमांची सुरुवात झाल्याने शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

महाशिवरात्रीसाठी शहरातील सर्व शिवालये रोषणाईने उजळली होती. रंगरंगोटी, फुलांची सजावट, केळीचे खांब लावून सजलेल्या मंदिरातून शिवभक्तांसाठी सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. शहरातील महालक्ष्मी मंदिर परिसरात असलेल्या अतिबलेश्‍वर, काशी विश्‍वेश्‍वर, कपिलतीर्थ आदींसह उत्तरेश्‍वर, रावणेश्‍वर, चंद्रेश्‍वर, वटेश्‍वर, कैलासगडची स्वारी, लक्षतीर्थ, कोटीतीर्थ, सोमेश्‍वर, बाळेश्‍वर, चंद्रेश्‍वर आदी शिवमंदिरांत दर्शनासाठी भाविकांचा जनसागर उसळला होता. स्टँड परिसरातील वटेश्‍वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी रांग लागली होती. मंदिरांतर्फे द्वादशीनिमित्त बुधवारी महाप्रसाद होणार आहे. उत्तरेश्‍वर पेठेत शिवभक्तांचा जणू मेळाच भरला होता. महादेव मंदिरातही भाविकांचा ओघ दिवसभर सुरू राहिला. मंदिराच्या आवारात उभारण्यात आलेल्या पूजा साहित्यांची दुकाने व खेळण्यांची दुकाने यामुळे परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. आय टी आय, तपोवन परिसरातील अमरनाथ शिवालयात महारूद्राभिषेक करण्यात आला. कैलासगडची स्वारी येथे पहाटे धार्मिक विधी व महाभिषेक करण्यात आला, सायंकाळी भजन कीर्तनाचा कार्यक्रम झाला. कोल्हापूर जिल्हा खादी ग्रामोद्योग संघात प्रदीर्घ परंपरेनुसार महादेवाला अभिषेक करण्यात आला. 
श्री ऋणमुक्तेश्‍वर महादेव मंदिरात पहाटे महाभिषेक झाला. दिवसभर दर्शनासाठी मंदिरात गर्दी होती.सायंकाळी मंदिरातील उत्सव मूर्तीची महाशिवरात्रीनिमित्त पालखी मिरवणूक काढण्यात आली. याशिवाय शहरात ठिकठिकाणच्या महादेव मंदिरांतही भाविकांकडून महाभिषेक, पूजा, रूद्रपठण असे धार्मिक कार्यक्रम करण्यात आले. 
रेसकोर्स, पाण्याचा खजिना, टिंबर मार्केट, कदमवाडी येथील महादेव मंदिरांतही भाविकांची गर्दी होती.  

बालिंगे महादेव मंदिरातदर्शनासाठी गर्दी
दोनवडे : वार्ताहर
बालिंगे (ता. करवीर) येथील महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांनी  दर्शनासाठी गर्दी केली होती. सकाळपासून दर्शनासाठी रांग लागली होती.
सकाळी अभिषेक घालण्यात आला. पुजारी बाळासाहेब अतिग्रे व पुजार्‍यांनी घातला. महिलांनी रूद्रपठण, शिवमहिमन स्तोत्र आणि अकराव्या अध्यायाचे वाचन केले. यावेळी 150 वर महिलांनी सहभाग घेतला. महाभिषेक झाल्यानंतर दर्शनासाठी महिलांसह आबालवृद्धांनी गर्दी केली होती. दिवसभर भाविक दर्शनासाठी येत होते. सायंकाळी भजन व कीर्तन झाले. महादेव तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विविध धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन केले होते. रविवार दि. 18 रोजी महाप्रसादाचे आयोजन केले आहे. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महादेव तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केले आहे.

दोनवडेत महादेव मंदिर 
दोनवडे (ता. करवीर) येथे जुन्या गावाच्या मध्यभागी असलेल्या महादेव मंदिरात ग्रामस्थ व महिलांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. सकाळी पुजारी प्रवीण गुरव व गावातील युवकांनी  अभिषेक घातला. त्यानंतर महिला, तरुण व ग्रामस्थांनी दर्शनाला गर्दी केली. सायंकाळी भजन झाले.

 सोमेश्‍वर महादेव मंदिर 
जुना बुधवार पेठेतील लिंगायत समाजाच्या सोमेश्‍वर मंदिरात महाशिवरात्र उत्सवानिमित्त अ‍ॅडव्होकेट धनंजय पठाडे यांच्या हस्ते महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. लिंगायत समाज सोमेश्‍वर भक्त व फौजी ग्रुपच्या वतीने महादेवास महारूद्र अभिषेक व खिचडी वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. 

याप्रसंगी नगरसेवक नाना कदम, ऋतुराज क्षीरसागर, सामाजाचे अध्यक्ष सुनील गाताडे, नगसेविका बनछोडे, गणेश मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते. सुहास भेंडे यांनी आभार मानले.

कणेरी मठावर भाविकांची अलोट गर्दी
उजळाईवाडी : प्रतिनिधी
महाशिवरात्री दिनाच्या निमित्ताने कणेरी (ता. करवीर) येथील सिद्धगिरी मठावर भाविकांची अलोट गर्दी झाली असून मठावरील कारागिरी महाकुंभ कार्यक्रम पाहण्याची मोठी पर्वणीय लाभली आहे. 

मठाच्या वतीने पाच दिवसांचे कारागिरी महाकुंभचे आयोजन केले असून मंगळवारच्या तिसर्‍या दिवशी आदिवासी विभागाचे केंद्रीयमंत्री सुदर्शन भगत, अदृश्य काडसिद्धेश्‍वर स्वामीजी, स्वामी विद्यानंदजी  यांच्या प्रमुख उपस्थितीत पहाटे काकड आरती व विधीवत पूजा करण्यात आल्या.