कोल्हापूरच्या राजकीय फेरमांडणीची निवडणूक

Published On: Sep 12 2019 1:48AM | Last Updated: Sep 12 2019 1:48AM
Responsive image
file photo

कोल्हापूर : चंद्रशेखर माताडे


ऐन निवडणुकीच्या तोंडावर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी पक्षालाच सोडचिठ्ठी दिली. आता सतेज पाटील यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली असली तरी निवडणुकीच्या  तोंडावर पक्ष संघटना सावरण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली आहे. सैन्यात भरती झाल्या झाल्या त्यांना लढाईला तोंड द्यावे लागणार आहेे.

सतेज पाटीलही कसलेले मल्ल असल्याने ते पदाला न्याय देतील, याची खात्री पक्ष कार्यकर्त्यांना आहे. तर खासदार संजय मंडलिक यांनी प्रत्येक मतदारसंघनिहाय राजकीय भूमिका वेगळी राहणार हे त्यांनीच केलेल्या वक्‍तव्यातून स्पष्ट झाले आहे. महाडिक गटाची भूमिका महत्त्वाची ठरणार. तेही मतदारसंघनिहाय वेगवेगळी भूमिका घेतील, अशी चिन्हे आहेत. त्यामुळे गटातटातील संघर्षात जिल्ह्याच्या राजकारणाची फेरमांडणी होणार आहे. 

उत्तरला कडवा संघर्ष

कोल्हापूर शहराचा समावेश असलेल्या  कोल्हापूर उत्तरमध्ये कडव्या राजकीय संघर्षाची पार्श्‍वभूमी आहे. शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासमोर तुल्यबळ प्रतिस्पर्धी आज दिसत नसला तरी त्यांना कडवा राजकीय संघर्ष करावा लागेल. याची तयारी शिवसेनेतूनच सुरू आहे.  पक्ष संघटना क्षीरसागर यांच्याबरोबर नाही. त्यातच पालकमंत्री चंद्रकांत पाटील व क्षीरसागर यांच्यात जो राजकीय सामना झाला, तो निवडणुकीच्या तोंडावर उगाळण्यात कोण आहे, हे लपून राहिलेले नाही. माजी जिल्हाप्रमुख संजय पवारही शिवसेनेतून इच्छुक आहेत. 

युती न झाल्यास भाजपकडून महेश जाधव, चंद्रकांत जाधव व आर. डी. पाटील तयारीत आहेत. राष्ट्रवादीकडून नेहमीप्रमाणे आर. के. पोवार यांच्या नावाची चर्चा आहे. तर आदिल फरास हे राष्ट्रवादीकडून व तेथे न जमल्यास वंचित बहुजन आघाडीकडून इच्छुक आहेत. काँग्रेसकडून मधुरिमाराजे यांनी निवडणूक लढवावी व मालोजीराजे गटाचे पुनरुज्जीवन करावे, यासाठीच्या हालचाली सुरू आहेत; पण नव्या राजवाड्याच्या तटबंदीच्या आड काय ठरले ते अद्याप गुलदस्त्यातच आहे. 

दक्षिणला अस्तित्वाची लढाई

गेल्या विधानसभा निवडणुकीपासून सतेज पाटील विरुद्ध महाडिक गटात अस्तित्वाचा संघर्ष सुरू झाला आहे. लोकसभेला मदत करूनही विधानसभेला आपला घात केला, याची जबरदस्त  राजकीय किंमत चुकविण्यास सतेज पाटील यांनी महाडिक गटाला भाग पाडले आहे.विधान परिषदेच्या निवडणुकीत महाडिक गटाचे प्रमुख महादेवराव महाडिक यांना थेट आखाड्यात पराभवाची कडवट चव चाखायला लावून सतेज पाटील यांनी महाडिक गटाविरुद्धच्या विजयाची मुहूर्तमेढ रोवली. या संघर्षाच्या नाटकातील दुसर्‍या अंकात राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांना लोकसभेच्या आखाड्यात पराभूत करण्यात सतेज पाटील यांनी उघड भूमिका घेतली. दक्षिणमधून पराभवाचा वचपा काढण्यासाठी ते सज्ज होते; पण पक्षाच्या बंधनामुळे त्यांना आता पुतणे ऋतुराज पाटील यांच्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावावी लागणार आहे. अमल महाडिक या भाजपच्या विद्यमान आमदारांना पराभूत करण्यात त्यांनी कोणाकोणाची मदत होणार, हे महत्त्वाचे ठरणार आहे; मात्र याा मतदारसंघातील लढाई ही नेत्यांच्या अस्तित्वाची लढाई असणार आहे. 

करवीरला पारंपरिक वैर पुढे सुरू

नरके आणि पाटील घराण्यांचे दहा वर्षांचे राजकीय वैर परत एकदा करवीरमध्ये अनुभवायला मिळणार आहे. या मतदारसंघात महाडिक गटाची कसोटी लागणार आहे. कारण, ‘गोकुळ’च्या मल्टिस्टेटला विरोध करून आमदार चंद्रदीप नरके यांनी संघर्षाला बत्ती दिली.

त्याच्या पुढच्या अंकात महादेवराव महाडिक यांनी ‘गोकुळ’मध्ये नाचत आलेल्या चंद्रदीपना परत घरात बसविण्याची प्रतिज्ञा जाहीरपणे करत पी. एन. पाटील यांना आमदार करणारच अशी भूमिका जाहीर केली; पण शिवसेना-भाजप युती झाल्यावर भाजपचे नेते झालेले धनंजय महाडिक नरके यांच्या व्यासपीठावर जाणार, की पी. एन. पाटील यांचा प्रचार करणार, हे महत्त्वाचे ठरणार आहे; मात्र पारंपरिक वैर्‍यांतील या लढाईत इतरांची दखल घेण्यास अद्याप कोणी तयार नाही.

कागलला कडवा संघर्ष

राजकारणाच्या धबडग्यापासून स्वतःला लांब ठेवणार्‍या विक्रमसिंह घाटगे यांचे चिरंजीव समरजितसिंह यांनी मात्र या संघर्षात थेट उडी घेतली आहे. भाजपमध्ये प्रवेश करून म्हाडाचे अध्यक्षपद घेत त्यांनी दमदार राजकीय वाटचाल सुरू केली आहे.

त्यांचा सामना राजकारणातील हिंदकेसरी असा ज्यांचा उल्‍लेख केला जातो, त्या हसन मुश्रीफ यांच्याबरोबर होणार आहे. या मतदारसंघात नेहमीप्रमाणे संजय घाटगे, संजय मंडलिक यांच्या भूमिकेवरच येथील  लढत चुरशीची होणार आहे.

इचलकरंजीला तिरंगी सामना

दोन वेळच्या निवडणुकीत प्रकाश आवाडे यांना पराभूत करणारे भाजपचे आमदार सुरेश हाळवणकर हे हॅट्ट्रिक करणार, की विरोधक त्यांची हॅट्ट्रिक चुकविणार, याची चर्चा जोरात आहे. प्रकाश आवाडे हे आता अपक्ष म्हणून उतरतील; तर याच मैदानात राहुल खंजिरे हे काँग्रेसचे उमेदवार असतील.

 

खंजिरे यांच्या मागे जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांचा भक्‍कम पाठिंबा असेल; मात्र हाळवणकर-आवाडे-खंजिरे अशा तिहेरी लढतीत काँग्रेस मतांची विभागणी होण्याची शक्यता आहे; तर शिवसेनेची ताकदही मोठी असून ती हाळवणकर यांच्या मागे उभारणार का, यावरही राजकीय यशापयश अवलंबून आहे.

शिरोळलाही लढत तिरंगीच

शिरोळमध्ये गेल्या निवडणुकीत स्वाभिमानीला पराभूत करून शिवसेनेचे उल्हास पाटील यांनी इतिहास घडविला. त्यामागे शिरोळ तालुका बहुजन विकास आघाडीची ताकद होती. या आघाडीत सगळे नेते एकत्र आले होते. ते चित्र आता नाही. नाईक निंबाळकर, अशोकराव माने, रामचंद्र डागे, माधवराव घाटगे आदी मंडळी पाटील यांच्या पाठीशी ठाम होती. त्या पार्श्‍वभूमीवर  उमेदवारी मिळाली तरी उल्हास पाटील यांना कडवा संघर्ष करावा लागणार आहे. काँग्रेसकडून सा. रे. पाटील यांचे चिरंजीव गणपतराव पाटील इच्छुक आहेत. आता नाही तर कधीच नाही, अशा भूमिकेत ते आहेत. तर राजेंद्र पाटील यड्रावकर काय करतात, हेही महत्त्वाचे ठरणार आहे. स्वाभिमानीकडून पुन्हा एकदा सावकर मादनाईक हे इच्छुक आहेत. या ठिकाणी राजू शेट्टी हे काँग्रेस उमेदवारांना मदत करून लोकसभेतील मदतीचा पैरा फेडणार का, यावर राजकीय चित्र अवलंबून आहे. तर युती न झाल्यास अशोकराव माने यांच्या सूनबाई डॉ. नीता माने या भाजपकडून इच्छुक आहेत. वंचित आघाडीकडूनही या मतदारसंघात उमेदवार असेल. तो विजयाचे गणित घडवेल किंवा बिघडवेल, हे नक्‍की.

शाहूवाडीत पाटील विरुद्ध कोरे

शाहूवाडीतील पराभवाचा कलंक धुवून काढण्यासाठी विनय कोरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजप नेत्यांच्या ते जवळ असले तरी मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार असल्यामुळे युती झाली तर उमेदवारी मिळणार नाही, हे ओळखून कोरे यांनी काँग्रेसचे नेते अमर पाटील यांच्याशी संधान बांधले आहे. खरे तर, यशवंत एकनाथ पाटील आणि तात्यासाहेब कोरे हे पारंपरिक राजकीय दुष्मन; मात्र दुसर्‍या पिढीत हा संघर्ष संपताना दिसतो आहे. तर शिवसेनेचे आमदार सत्यजित पाटील सरुडकर हे मतदारांशी थेट संपर्क साधून आपली बाजू मजबूत करीत आहेत. या मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटना काय करणार, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

हातकणंगलेत अस्तिवाची लढत

दोन वेळचे आमदार असलेले शिवसेनेचे डॉ. सुजित मिणचेकर यांना पक्षसंघटनेतूनच आव्हान दिले जात आहे. त्यांच्या विरोधात आकाराम दबडे यांचे चिरंजीव संदीप दबडे यांनी दंड थोपटले आहेत. आता डॉ. मिणचेकर यांना उमेदवारी मिळाली तर पक्ष संघटना सोबत घेण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. युती न झाल्यास या मतदारसंघात अशोकराव माने हे भाजपकडून इच्छुक आहेत. सूतगिरणीची ताकद त्यांच्या मागे असल्याने ते तुल्यबळ उमेदवार आहेत. जनसुराज्य शक्‍ती पक्षाची या मतदारसंघात ताकद आहे. राजीव आवळे हे या पक्षाचे आमदार होते. आता त्यांच्यासह डॉ. मिलिंद हिरवे, अविनाश सावर्डेकर हे जनसुराज्यकडून इच्छुक आहेत; तर वंचित आघाडीकडून इंद्रजित माने इच्छुक आहेत. काँग्रेसकडून राजूबाबा आवळे यांना उमेदवारी मिळण्याची चर्चा आहे. या तालुक्यात महाडिक गटाची मदतही महत्त्वाची ठरणार आहे.

चंदगडला भाऊबंदकीतच लढत

चंदगडची लढत भाऊबंदकीतच होणार आहे. विद्यमान आमदार श्रीमती संध्यादेवी कुपेकर या इच्छुक नाहीत. त्यांच्या कन्या नंदिनी बाभूळकर इच्छुक असल्या तरी त्यांनी पक्ष कोणता ही भूमिका जाहीर केलेली नाही. मध्यंतरी त्या भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती; मात्र याच तालुक्यातील वजनदार नेते भरमू पाटील आणि गोपाळराव पाटील या भाजपमध्ये गेलेल्या मंडळींनी डॉ. बाभूळकर यांना भाजपमध्ये घेण्यास विरोध केला, तर राष्ट्रवादीकडून माजी आमदार नरसिंग गुरुनाथ पाटील यांचे चिरंजीव राजेश पाटील यांच्याबाबत चाचपणी केली. शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांचे ते मेहुणे असल्याने शिवसेनेकडूनही त्यांच्या नावाची चर्चा आहे. अगोदरच शिवसेनेत दाखल झालेले संग्रामसिंह कुपेकर यांच्यासह सुनील शिंत्रे, प्रभाकर खांडेकर हे शिवसेनेकडून इच्छुक आहेत. आता कोणत्या पक्षाचा कोण उमेदवार, याची चर्चा अद्याप सुरू नाही. कारण, उमेदवार इच्छुक असले तरी त्यांच्या पक्षाबाबत कोणतीही ठाम भूमिका नसल्याने राजकीय गोंधळाची परिस्थिती आहे. या ठिकाणी माजी आमदार श्रीपतराव शिंदे कोणाच्या पारड्यात वजन टाकणार, त्यावर बरेच काही अवलंबून आहे.

राधानगरी भुदगरडला पै-पाहुण्यांचा संघर्ष

राधानगरी भुदरगड मतदारसंघातून  राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळविण्यासाठी के. पी. पाटील व ए. वाय. पाटील या मेहुण्या-पाहुण्यातच संघर्ष सुरू आहे. शरद पवार यांच्यापर्यंत हा संघर्ष पोहोचला; मात्र कोणताही तोडगा निघाला नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा तालुका म्हणून याची ओळख आहे; मात्र येथील जागा शिवसेनेकडे आहे. त्यामुळे युती झाल्यास भाजपचा उमेदवार नसेल. प्रकाश आबीटकर शिवसेनेचे आमदार असले तरी काँग्रेस नेत्यांच्या ताकदीवर ते निवडून आले होते. आता ते नेते त्यांच्या मागे नाहीत. माजी आमदार दिनकरराव जाधव यांचे चिरंजीव सत्यजित जाधव यांनी आपल्या गटाचा मेळावा बोलावला आहे; तर अरुणकुमार डोंगळेही इच्छुक आहेत. माजी आमदार बजरंग देसाई यांचे चिरंजीव राहुल देसाई हे भाजपकडून इच्छुक असले तरी युती झाल्यास अपक्ष म्हणून लढायचे अशा भूमिकेत ते आहेत. त्यामुळे डोंगळे, देसाई, जाधव हे काँग्रेसचे नेतेच निवडणुकीत उतरणार असल्याने आबीटकर यांची अप्रत्यक्ष ताकद घटणार आहे.

विधानसभेच्या निवडणुकांचा नारळ फुटला आहे. मैदानाची तारीख जवळ येईल, तशा आखाड्यातील पैलवानांच्या जोड्या फायनल होत आहेत. या निवडणुकीत कोण कोणाला मदत करणार, यापेक्षा कोण कोणाला पाडणार, याचीच चर्चा रंगली आहे. कारण, पक्ष आणि नेते यांचा संबंधच राहिला नाही, अशी परिस्थिती असून या सगळ्या राजकीय गदारोळात जिल्ह्याची राजकीय फेरमांडणी होण्याचे संकेत आहेत.


 ट्रम्प यांना मारणार्‍यास 'इतक्या' कोटींचे बक्षीस!


झारखंडमध्ये मटणावरुन भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; नऊ गंभीर जखमी


हिंदू राष्ट्राची स्थापना करणाऱ्या नित्यानंदविरोधात इंटरपोलची नोटीस


महाविकास आघाडीसाठी सुरवातीला मीच पुढाकार घेतला : दलवाई


तान्हाजी चित्रपटात ‘या’ गावचा उल्लेख न केल्याने ग्रामस्थ संतप्त (video)


पुण्यातील नाईट लाईफवर आदित्य ठाकरेंकडून 'पुणेरी'उत्तर!


गोवा : वाळू व्यवसायिकांनी घेतली दिगंबर कामत यांची भेट


हिंगोली : तीन वर्षाच्या चिमुकलीचा खून करणार्‍या पित्यास जन्मठेपेची शिक्षा


धुळ्यात संशयास्पद मृत्यू, हात पाय बांधून विहिरीत टाकले


३० वर्षांपूर्वी करत होती 'त्याला' डेटिंग; ५२ व्या वर्षी केलं पाचव्यांदा लग्न!