होमपेज › Kolhapur › पंधरा गुणांसाठी हजाराचा भुर्दंड !

पंधरा गुणांसाठी हजाराचा भुर्दंड !

Published On: Jan 18 2018 1:47AM | Last Updated: Jan 18 2018 12:43AM

बुकमार्क करा
नूल : अविनाश कुलकर्णी

गेल्यावर्षीपासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने कला शिक्षकांच्या मागणीवरून शास्त्रीय गायन, वादन, नृत्य व चित्रकला परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना श्रेणीनुसार तीन ते पंधरा गुण देण्याचा निर्णय जाहीर केला. या निर्णयाचे कलाशिक्षकांसह कलाकार विद्यार्थी, पालक आणि शाळांनीही स्वागत केले असले, तरी केवळ दहा गुणांसाठी या विद्यार्थ्यांना पुणे फेरी मारावी लागणार आहे. त्यासाठी सुमारे दोन-दोन हजारांचा भुर्दंड बसणार असल्याने बहुतांश पालकांनी आम्हाला ही गुणांची खैरात नको, अशी भूमिका घेतली आहे.  

राज्य परीक्षा मंडळाच्या धोरणानुसार विद्यार्थ्यांच्या गायन, वादन व नृत्य या विषयातील पाच परीक्षा प्रथम (अ) श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना गेल्या वर्षीपासून पंधरा गुण देण्यात येत आहेत, तर त्यापटीत उतरत्या क्रमाने तृतीय श्रेणी (क) प्राप्त विद्यार्थ्यांना तीन गुण दिले जातात. या तीन ते पंधरा गुणांसाठी काही विद्यार्थ्यांना पालकांसह पुणे दौरा करावा लागणार आहे. परीक्षा मंडळाने दिलेल्या परिशिष्ट ‘अ’ या फॉर्मवर रजिस्टर्ड कार्यालयातून अध्यक्ष किंवा सचिवांची स्वाक्षरी घ्यावी लागणार आहे.    

 
ज्या विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयातून संगीत, वादन, गायन, नृत्य आदींचे शिक्षण घेतले आहे केवळ त्याच विद्यार्थ्यांना या गुणांचा लाभ होईल; पण अन्य विद्यार्थ्यांना मात्र पुणे फेरी मारावी लागणार असल्याने पालकांनी आम्हाला ही खैरातच नको, अशी भूमिका घेतल्याचे चित्र दिसत आहे. 

केवळ चित्रकलाच
राज्यातील 99 टक्के शाळांमध्ये केवळ चित्रकला हाच विषय शिकवला जातो. प्रत्यक्षात कला विषयांतर्गत नृत्य, वादन व गायन यांचा समावेश असला, तरी त्या विद्यार्थ्यांची गंधर्व महाविद्यालयातून परीक्षा घेतली जात नाही, त्यामुळे विद्यार्थी स्वखर्चाने संगीत विद्यालयात जाऊन शिक्षण घेतात. अशा विद्यार्थ्यांना यापुढे परीक्षा शासनमान्य संगीत महाविद्यालयांतून द्यावी लागणार आहे. 

...अशा विद्यार्थ्यांचे हाल
गडहिंग्लज, आजरा व चंदगडसह सर्वच तालुक्यांतील विद्यार्थी संगीताचे शिक्षण संगीत विद्यालयांतून घेतात व त्यांच्या परीक्षा अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयातून घेण्यात येतात. याबरोबरच गायन समाज, पुणे ही संस्थाही या परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना प्रमाणित करते; पण गंधर्व महाविद्यालयाचे कार्यालय पुणे, मुंबई, नागपूरनंतर मिरज येथे आहे,  इतर विद्यालयांची कार्यालये पुणे, मुंबई  अशा महानगरांत आहेत.