Wed, Feb 26, 2020 02:57होमपेज › Kolhapur › गदा मानाची...परंपरा मामासाहेब मोहोळे घराण्याची!

गदा मानाची...परंपरा मामासाहेब मोहोळे घराण्याची!

Published On: Dec 29 2017 9:36AM | Last Updated: Dec 29 2017 9:36AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : एकनाथ नाईक 

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत दिली जाणारी मानाची चांदीची गदा कोल्हापूर जिल्ह्याने सर्वाधिक म्हणजे 16 वेळा पटकाविली आहे. यामध्ये दिनकर धयारी, गणपत खेडकर,चंबा मुतनाळ,दादू चौगुले, लक्ष्मण वडार (डबल महाराष्ट्र केसरी), युवराज पाटील, संभाजी पाटील, सरदार कुशाल, नामदेव मोळे, विष्णू जोशिलकर, आप्पालाल शेख, विनोद चौगुले या मल्लांचा यामध्ये समावेश आहे. कमी वयात महाराष्ट्र केसरीचा किताब मिळूवन विनोद चौगुले याने सन 1999 मध्ये कोल्हापूरच्या कुस्तीत चैतन्य आणले होते. गेली अठरा वर्षे कुस्तीपंढरी मानाच्या महाराष्ट्र केसरीच्या गदेच्या प्रतीक्षेत आहे. 

महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा आणि या स्पर्धेत बक्षीस म्हणून दिली जाणारी मानाची चांदीची गदा आपल्या खांद्यावर यावी. यासाठी अनेक मल्लांचे कसोशीने प्रयत्न सुरू असतात. वर्षानुवर्षे अनेक मल्ल तालमीत यासाठी घाम गाळतात आणि महाराष्ट्र केसरी स्पर्धेची तयारी करतात. पण, या स्पर्धेतील विजेत्यास दिली जाणारी मानाच्या चांदीच्या गदेला मोठा इतिहास आहेे. गदा मानाची... परंपरा मामासाहेब मोहोळे घराण्याची. गेली  36 वर्षे ही परंपरा घराण्याने जपली आहे.

कुस्तीमहर्षी मामासाहेब मोहोळे यांच्या कर्तृत्वाची आठवण चिरकाल राहावी. म्हणून त्यांचे चिरंजीव माजी खासदार अशोकराव मोहोळे व क्रिकेटपटू सदानंद मोहोळे हे त्यांच्या नावे मानाची ‘महाराष्ट्र केसरी’ किताबाची गदा बक्षीस म्हणून देत आहेत. तांबड्या मातीला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळावा म्हणून यशवंतराव चव्हाण, भाऊसाहेब हिरे, बाळासाहेब देसाई, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील यांच्याशी चर्चा करून सन 1953 मध्ये कुस्तीमहर्षी नामदेवराव तथा मामासाहेब मोहोळे यांनी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेची स्थापना केली. 
कुस्तीप्रेमी राजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी कुस्तीला राजाश्रय देऊन अनेक नामांकित मल्ल घडवून अनेक प्रेक्षणीय कुस्त्यांची मैदानेही भरविली.त्यानंतर ठेकेदारी कुस्तीच्या रूपाने कुस्ती जिवंत ठेवण्याचे काम येथील कुस्तीप्रेमी आणि तालमींनी केले.त्यामुळेच पै.सादिक, पै.रमजी, पै.बुटा, पै.बिद्दू ब्राह्मण, पै.लब्बू,पै.किंकर सिंग, पै. गुलाम, पै.कल्लू, पै.चागा, पै. गोबरबाबू, पै. गामा जगज्जेता, पै.एक्‍का गामा, पै. शहानवाज नानीवाला, पै. गुलाम मोईद्दिन, पै.ठिला, पै. कल्लू गामा, पै. गुलाम कादर, पै. हमिदा, पै.झोबिस्को पै. जिजा, पै. भोला असे नामांकित मल्ल कोल्हापूरच्या तांबड्या रांगड्या मातीत घडले आणि अनेकांना त्यांनी घडविले. 

कुस्तीची परंपरा महाराष्ट्रातील अनेकांनी जपली आणि पोसलीसुद्धा. कुस्तीच्या इतिहासातही मामासाहेब मोहोळे यांचा सिंहाचा वाटा आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सन 1961 ला सुरू झाली आणि पहिली गदा कोल्हापूरचे मल्ल दिनकर धयारी यांनी सांगलीच्या बिरजू यादव याला चितपट करून मिळवली. तेव्हा ही गदा कुस्ती परिषद देत होती. सन 1982 ला मामासाहेब मोहोळे यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी चांदीची गदा देऊन त्यांच्या कर्तृत्वाची आठवण जपली आहे. ही गदा पुणे येथील पानगंटी परिवारच बनवीत. या मानाच्या गदेची उंची अडीच फूट आहे. त्यावर नक्षीदार काम केले असून मामासाहेब मोहोळे यांचा फोटो आहे.