Tue, Apr 23, 2019 01:42होमपेज › Kolhapur › महाराष्ट्र -कर्नाटक सीमेवर खुलेआम मटका

महाराष्ट्र -कर्नाटक सीमेवर खुलेआम मटका

Published On: Aug 06 2018 1:52AM | Last Updated: Aug 06 2018 12:57AMनानीबाई चिखली : वार्ताहर 

महाराष्ट्र कर्नाटक सीमेपासून हाकेच्या अंतरावर असणार्‍या निपाणी - राधानगरी राज्यमार्गावरील अनेक गावांमध्ये  बेकायदेशीर मटका व जुगार खुलेआम सुरू असून या बेकायदेशीर गोष्टींकडे स्थानिक पोलिसांचे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्यामुळे नागरिकांच्यातून संताप व्यक्त केला जात आहे .

यापूर्वीही या ठिकाणी जुगार व  मटका मोठ्या प्रमाणात सुरू होता. पण चार महिन्यांपूर्वी पोलिसांनी कारवाई केल्याने येथे  खेळला  जाणारा मटका बंद होता. जुगार व मटका चालवणारे केंद्र महाराष्ट्रात आणि खेळणारे  कर्नाटकातील असा प्रकार या ठिकाणी सुरू आहे. सर्व प्रकारचे बेकायदेशीर जुगार या ठिकाणी खेळले जात असल्याची चर्चा आहे. आठवड्याचा शेवटचा दिवस  असणार्‍या शनिवारी तर या ठिकाणी जत्राच  भरलेली असते. रस्त्याच्या दुतर्फा चारचाकी आणि दुचाकी वाहने लावण्यास जागा नसते अशी  परिस्थिती असते. क्रीडा मंडळाच्या नावावर  परवानगी असल्याचे  भासवले जाणार्‍या या क्लबला   स्थानिक  ग्रामपंचायतीचा परवाना नसल्याचे समजते. इमारतीला परवानगी नाही. या क्लबला परवानगी देण्यावरून सदस्यांमध्ये मतभेद निर्माण झाल्याचे व काहींनी राजीनामा देण्याचा पवित्रा घेतल्याच सांगितले जाते. 

या क्लब्सच्या परवान्याबाबतची स्थानिक ग्रा.पं. च्या परवान्याबाबतची कागदपत्रे प्रशासन आणि पोलिसांनी तपासली  तर खरे सत्य बाहेर येणार आहे. पण प्रशासन आणि पोलिसांनी या गोष्टीकडे अद्याप तरी दुर्लक्षच केले आहे. या केंद्रांतर्गत एजंटांचे जाळे मोठे असून सुमारे 40  एजंट विविध  गावांमध्ये मटका संकलनाचे काम करत असल्याचे समजते. जुगार, मटका खेळण्यासाठी निपाणीसह कर्नाटक परिसरातील लोक मोठ्या संख्येने या ठिकाणी येत असतात. निपाणी - राधानगरी राज्यमार्गावर एवढ्या मोठ्या प्रमाणात मटका आणि जुगार खेळणार्‍यांची वर्दळ सुरू असताना संबंधित यंत्रणा डोळेझाक का करत आहे? असा नागरिकांच्यातून संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. नव्याने सुरू झालेले जिल्हा पोलिस प्रमुख अभिनव देशमुख यांनी सांगितल्याप्रमाणे अवैध धंद्यांना चाप बसणार का? याकडे  ही या परिसरातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.